Jump to content

उराली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारताच्या बहुतांशी केरळमधील एर्नाकुलम व कोट्टयम् जिल्ह्यांत व तमिळनाडूमधील कोईमतूर जिल्ह्यांत राहणारी एक भारतीय आदिवासी जमात आहे.त्यांची लोकसंख्या सुमारे २,५९७ आहे.(१९६१ च्या जनगणनेनुसार).

वर्णन

[संपादन]

काळा रंग, खुजी पण धडधाकट शरीरप्रकृती, काळे डोळे, जाड भुवया व ओठ, पाठीमागे निमुळती असणारी डोक्याची कवटी व केसाळ शरीर ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये होत. तमिळ व मलयाळम् भाषा ते बोलतात. मदुरेच्या राजाने ह्यांना केरळमध्ये आणले, असे त्यांच्या दंतकथांवरून वाटते. कोईमतूरच्या उरालींमध्ये सात कुळी आहेत. कुळी बहिर्विवाही आहेत. शेजारच्या मुथुवन, मलई अरयन, कणिकरन इ. जमातीबरोबर त्यांचे रोटीबेटी व्यवहार होतात. पूर्वी ह्या जमातीत मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती; तथापि सध्या पितृसत्ताक कुटुंबपद्धती त्यांनी स्वीकारली आहे. उराली जंगलात राहतात. जंगलातून काळे माकड, डुक्कर इ. प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात. त्यांच्यापैकी पुष्कळजण सध्या शेतमजुरी, गोपालन इ. उद्योग व नोकरी करू लागले आहेत.

विवाह व इतर परंपरा

[संपादन]

या जमातीत आते-मामे-भावंडांत विवाह होतात. साटेलोटेविवाह समाजमान्य आहे. त्यामुळे तीनचार बहिणी असणाऱ्याने तीनचार विवाह केल्याची व एखाद्यास बहीण नसल्याने त्याचे लग्‍न न झाल्याचीही उदाहरणे आढळतात. पलायनविवाहाची उदाहरणेही आहेत. बालवयातही मुलींचे विवाह केलेले आढळतात. विवाहाच्या बाबतीत मुलाच्या आईवडिलांकडून पुढाकार घेतला जातो. वधूमूल्य देण्याची पद्धत आहे. विवाहाच्या वेळी वधूच्या गळ्यात ताली बांधणे, हा महत्त्वाचा विधी असतो. बहुपत्‍नीविवाह समाज संमत असून प्रत्येक पत्‍नीला स्वतंत्र झोपडी असते. मेहुणीविवाह व देवरविवाह समाजात मान्य आहेत. प्रथम ऋतुप्राप्ती, मासिकपाळी व बाळंतपण ह्या अवस्थांत स्त्रियांना स्वतंत्र झोपडीत ठेवण्यात येते. जमातीच्या प्रमुखाला यजमान, कानी, वेळन इ. नावे आहेत. हे पद वंशपरंपरागत असते. ह्या प्रमुखाला जादूचे पूर्ण ज्ञान असते, असा या जमातीत समज आहे.

उत्सव

[संपादन]

उराली वर्षातून दोन महत्त्वाचे उत्सव साजरे करतात. ‘भाई नोंदु’ हा उत्सव भाई महिन्यात (डिसेंबर-जानेवारी) साजरा करतात. त्यावेळी सर्व घर स्वच्छ करून लिंब किंवा आघाड्याची पाने घराच्या छपरावर ठेवतात. व्यासी महिन्यात (मार्च-एप्रिल) विहिरीजवळ एक मोठा हौद बांधतात. त्या हौदातील पाण्यात मीठ टाकून फुलांनी सजविलेल्या जनावरांना ते खारट पाणी पाजतात. मृताला ते तेलामधाने स्‍नान घालून नव्या कापडात गुंडाळतात. प्रेताच्या चेहऱ्यावर तीन नाणी विशिष्ट प्रकारे डकवितात. स्मशानभूमीत गाईचे किंवा म्हशीचे दूध काढून ते प्रेताच्या मुखात घालतात आणि प्रेताला पुरतात. अशौच बारा दिवस पाळून तेराव्या दिवशी ते जमातीच्या लोकांना जेवण देतात.

संदर्भ

[संपादन]
  • Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.
  • मराठी विश्वकोश