Jump to content

ईव्हो आन्द्रिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ईव्हो आन्द्रिच हे युगोस्लाव्हिकन साहित्यिक होत. कविता, कादंबरी, कथा, ललित गद्य अशा साहित्यप्रकारांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित आहे. विशेषतः लघुकथा आणि कादंबरी या कथनात्म साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे युगोस्लाव्हिक साहित्यविश्वात प्रसिद्ध कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे.

आन्द्रिच यांनी क्रोएशिअन, सर्बियन, बोस्नियन या तीनही भाषांमध्ये साहित्यनिर्मिती केली असून त्यांना १९६१ मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ते युगोस्लाव्हिकन  साहित्यिक म्हणून नोबेल पारितोषिकाचे पहिले मानकरी होत.

आन्द्रिच यांचा जन्म ऑस्ट्रिया-हंगेरियन साम्राज्याचा भाग असलेल्या बॉझ्निया प्रांतातील ट्रव्निक जवळील डोलाक या गावी एका गरीब क्रोएशिअन कुटुंबात झाला. आन्द्रिच दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आन्द्रिच यांच्या आईवर कौटुंबिक जबाबदारी आली. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना व्हीसेगार्ड येथे त्यांच्या काकांकडे पाठविले. त्यामुळे आन्द्रिच याचे आरंभीचे शालेय शिक्षण पोलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे झाले. शालेय जीवनातच युवा बोस्निया या पुरोगामी राष्ट्रवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. दक्षिण स्लाव्हिक लोकांच्या ऐक्यासाठी लढा देत संबंधित संघटनांचे सदस्य त्यांनी घेतले. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

आन्द्रिच यांना क्रोएशिअन सांस्कृतिक व शैक्षणिक संघटनेकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यावर त्यांनी झाग्रेब येथे उच्चशिक्षण घेतले. येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. परंतु पहिल्या महायुद्धाच्या उद्रेकामुळे त्यांनी पुढील शिक्षण व्हिएन्ना, क्रॅको आणि ग्रात्स या विद्यापीठांमध्ये घ्यावे लागले. दक्षिण स्लाव्हिक इतिहास आणि साहित्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. ग्राझ विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली. ‘तुर्की नियमांच्या प्रभावाखाली बोस्नियामधील आध्यात्मिक जीवनाचा विकास’ हा त्यांच्या प्रबंधलेखनाचा विषय होता. पहिल्या महायुद्धानंतर नव्याने उदयास आलेल्या युगोस्लाव्हियाच्या मुत्सद्दी सेवेत दूतावास, उप-परराष्ट्र मंत्री, राजदूत (जर्मन) आदी महत्त्वपूर्ण पदांवर आन्द्रिच कार्यरत होते. याच काळात युगोस्लाव्हियाचा प्रतिनिधी म्हणून इटली, रूमानिया, ऑस्ट्रिया आदी राष्ट्रांना त्यांनी भेटी दिल्या. हा कार्यभार सांभाळत असताना त्यांचे सर्जनशील लेखन मात्र सतत सुरूच राहिले.

आन्द्रिच यांनी शालेय जीवनातच काव्यलेखनाला आरंभ केला. १९११ मध्ये बोसान्स्का विला  या वर्तमानपत्रात त्यांचे सुरुवातीचे काव्य प्रकाशित. पुढे गद्य व पद्य अशा दोन्ही प्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले. १९१४ पूर्वीच त्यांना कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. याच काळात क्रोएशिअन राइटर्सने प्रकाशित केलेल्या हृवात्स्का म्लादा लिरिका या संग्रहात आन्द्रिच यांच्या सहा कविता प्रकाशित. एक्स पोन्तो  (इं.शी. प्रिझन मेडिटेशन्स) या मुक्त गीतकाव्यामुळे त्यांना विशेष मान्यता मिळाली. या काव्यामध्ये जीवन, त्याचा न उमगलेला अर्थ व त्यामुळे निर्माण होणारे दुःख हे उत्कटतेने व्यक्त झाले आहेत. १९२० मध्ये नेमिरी या काव्यसंग्रहात तुरुंगातील अनुभव, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कवीमनावर उमटणारे पडसाद, देवाच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न, निसर्गातील विविध रूपे प्रकर्षाने शब्दबद्ध झाली आहेत.

१९२० नंतर त्यांच्या कथानात्म लेखनाला आरंभ. १९२० मध्ये त्यांची पुट अलीया जेर्झेलिया (इं. शी.- The Journey of Ali Djerzelez) ही पहिली लघुकादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीतील अनुभवविश्व प्रामुख्याने बोस्नियातील असून त्यात त्यांनी मानवी अस्तित्वाच्या समस्या मांडल्या आहेत. त्यांचा प्रिपोव्हेत्के-१ (१९२४) हा पहिला लघुकथासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाला सर्बियन रॉयल अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर प्रिपोव्हेत्के-२ (१९३१) आणि प्रिपोव्हेत्के-३ (१९३६) हे लघुकथासंग्रह प्रकाशित झाले. यानंतर न्यू शॉर्ट स्टोरीज (१९४८), पॅनोरामा (१९५०), फेसेस (१९६०) आणि हाऊस ऑन इट ओन (मरणोत्तर, १९६६) आदी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आन्द्रिच यांची ट्रॅव्हनिका क्रॉनिकल (१९४५, इं. शी. बॉस्नियन स्टोरी, १९५९), ना ड्रिनी कुप्रिया (१९४५, इं.शी. द ब्रिज ऑन द ड्रीना, १९५९), गोस्पोजिका (१९४५, इं. भा. द वूमन फ्रॉम सारायेव्हो, १९६६) ही कादंबरीत्रयी प्रकाशित आहे. त्यांनी सदर कादंबऱ्यांचे लेखन दुसऱ्या महायुद्धकालीन परिस्थितीत केले. प्रस्तुतच्या कादंबऱ्या बोस्नियाच्या इतिहासावर आधारलेल्या आहेत. ट्रॅव्हनिका क्रॉनिकल ही ऐतिहासिक कादंबरी युरोपियन वास्तवादी कादंबरीच्या प्रारूपावर आधारित आहे तर ब्रिज ऑन द ड्रीनामध्ये बोस्नियामधील तुर्की काळातील घडामोडींचे चित्रण केंद्रस्थानी आहे. पुलाच्या उत्पत्तीविषयक अनेक लोककथांचा उल्लेख प्रस्तुत कादंबरीत आला आहे. या कादंबरीत्रयीनंतर आन्द्रिच यांची प्रोक्लेता अवलीजा (१९५४, इं. भा. The Damned Yard) आणि त्यांच्या मृत्यूनंतर १९७७ मध्ये आलेली ओमर पाशा लाटास  या कादंबऱ्या महत्त्वपूर्ण आहेत.

आन्द्रिच यांनी कथानात्मक साहित्यासोबत अनेक निबंध आणि लेख लिहिले. हे लेख त्या त्या वेळी विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. त्यांच्या मृत्यूनंतर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या या लेखांचे The Artist and His Work, History and legend, आणि Paths, Faces, Landscapes हे तीन निबंधसंग्रह प्रकाशित झाले. आन्द्रिच यांच्या या निबंधांमधून व लेखांमधून विसाव्या शतकातील सांस्कृतिक जीवनाचे अनेक पैलू प्रतिबिंबित झाले आहेत. विशेषतः युगोस्लाव्ह लेखक, वूक कराडिय़ा, पेटार पेट्रोव्हिएज नेजेगो, पेटार कोसिए, अँटून गुस्ताव मॅटॉ, सिमो मटावल्ज आणि गोय्या, चोपिन यावरील निबंधांचा यात समावेश आहे.

एकूणच, आन्द्रिच यांच्या साहित्यात विविध देश व प्रामुख्याने बोस्नियाचे चित्र प्रतिबिंबित झालेले दिसते. तेथील लोकसमूहाचे वास्तव आणि प्रदेश हीच त्यांच्या साहित्यकृतींची पार्श्वभूमी आहे. अनुभवांचे सखोल निरीक्षण, ठळक चित्रण आणि मानसशास्त्रीय विश्लेषण ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ही वैशिष्ट्ये त्याच्या कथनात्मक साहित्यात प्रकर्षाने जाणवतात. आन्द्रिच यांनी मानवाची स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली केविलवाणी धडपड आणि तिचे विश्वाशी असलेले नाते यांचे चित्रण ओघवत्या शैलीतून केले आहे. त्यांच्या साहित्याचे जवळजवळ ३३ भाषांमधून अनुवाद झाले आहेत. नोबेल पारितोषिकाच्या निवड समितीने आन्दिच यांच्या महाकाव्यात्मक शैलीचा गौरव करून द ब्रिज ऑन द ड्रीना  या कादंबरीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे.

आन्द्रिच यांचे बेलग्रेड, युगोस्लाव्हिया (आताचे सर्बिया) येथे निधन झाले.