कान्होजी आंग्रे समाधी
सरखेल कान्होजी आंग्रे समाधी तथा मृत्युपश्चात स्मारक महाराष्ट्रात अलिबाग येथे आहे.
प्रास्ताविक
[संपादन]मध्ययुगीन काळात विशेष व्यक्तींच्या मृत्युपश्चात स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकांना समाधी किंवा छत्री संबोधत असत. महाराष्ट्रात अशी अनेक छत्री स्मारके आहेत. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ उभारले गेलेले असेच एक छत्री स्मारक अलिबाग मध्ये आहे जे आंग्र्यांची छत्रीबाग म्हणून प्रसिद्ध आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]अलिबागच्या एस.टी.स्थानकापासून चालत ४०० मीटर अंतरावरील शिवाजी महाराज चौकात (काशी विश्वेश्वर मंदिरासमोर) हे ऐतिहासिक स्मारकाचे संकुल आहे.मुंबईच्या गेटवे आॅफ इंडियावरून लॉंचने मांडवा बंदर आणि मांडवा बंदर ते अलिबाग बस पकडून अलिबाग शहरात जाता येते. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून रेवस बंदर आणि तेथून रिक्षाने किंवा बसने स्मारकाकडे जाता येते. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी येथून सुद्धा खाजगी कार किंवा बसने अलिबाग शहरात जाता येते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
इतिहास
[संपादन]मराठा आरमाराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. त्याचा कळस सरखेल कान्होजी राजे यांनी चढविला. सरखेल कान्होजी राजे आंग्रे हे 'समुद्रावरचा शिवाजी ' म्हणून ओळखले जात.कान्होजीचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते.संभाजीराजांच्या मृत्यू नंतर मराठा साम्राज्याची धुरा छत्रपती राजाराम आणि राणी ताराबाई ह्यांच्याकडे आली. आंग्रे कुळातील मातब्बर योद्धांनी कोकण किनारपट्टीवर सर्व फिंरगी आणि जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देऊन स्वराज्याच्या आरमाराची कीर्ती पसरवली. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी इ.स.१७२९ पर्यंत स्वराज्याच्या आरमाराची धुरा सांभाळली.त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र सेखोजी,मानाजी, तुळाजी आणि संभाजी यांनी स्वराज्याच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवल्या.स्वराज्याच्या आरमारी इतिहासात आंग्रे घराण्याचे मोठे योगदान आहे.
छत्रीबाग
[संपादन]सरखेल कान्होजीराजे आंग्रे घराण्याची स्मारके आंग्र्यांची छत्री बाग म्हणून प्रसिद्ध आहेत. एक एकर क्षेत्रफळामध्ये आंग्रे घराण्यातील स्त्री पुरूषांची लहान- मोठी २२ स्मारके आहेत. सर्वात जुने आणि मोठे स्मारक सरखेल कान्होजीराजे आंग्रे ह्यांचे आहे. स्मारक जमिनीवर तीन टप्प्यांमध्ये रचलेले आहे. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणातील आहे. स्मारक सुबक आणि सौंदर्यपूर्ण स्थापत्याने अलंकृत आहे.जमिनीलगतचे एक मीटर उंचीचे जोते आधुनिक आहे. त्यावरील दोन टप्पे प्राचीन आहेत.दुसऱ्या टप्प्यावरून तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत.सर्वात वरच्या टप्प्यात अष्टकोनी भिंतीच्या आत मध्यभागी प्रतिकात्मकरित्या दोन पादुका आहेत.अष्टकोनी भिंतीच्या कोपऱ्यावर सुंदर कलाकुसर असलेले खांब आहेत. शिल्पकाम सुबक आणि अप्रतिम आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्याशिवाय कान्होजींच्या पत्नी मथुराबाई आंग्रे,पुत्र सेखोजी आंग्रे (१७ आॅगस्ट १७३३),मानाजी आंग्रे (४ आॅगस्ट १८९६), गजराबाई तानाजीराव आंग्रे (९ मार्च १८९७), आनंदीबाई मानाजीराव आंग्रे यांची स्मारके आहेत. स्मारकांवर शिलालेख आहेत.स्मारके वेगवेगळ्या काळात बनविलेली आहेत. त्यांची शैली वैविध्यपूर्ण आहे. तत्कालीन स्थापत्याचे स्थित्यंतर बांधकाम शैली, वेगवेगळे साहित्य, आणि छत्र्यांवरील भिन्न नक्षीकाम ह्यावरून समजते.काही स्मारकांवर राजस्थानी शैलीचा प्रभाव दिसून येतो. छत्रीबागेत एक तुळशी वृंदावन आणि शंकराचे मंदिर आहे. शंकराचे देवस्थान वर्तुळाकार असून आत नाजूक पिंडी आणि नंदीची मूर्ती आहे.आजही कान्होजींचे नववे वंशज रघुजी राजे आंग्रे आपल्या पूर्वजांच्या श्राद्धतिथीला त्या त्या समाधीची पूजा करून नैवेद्य अर्पण करतात. धार्मिक विधीसाठी विहिरीची सोयही उपलब्ध आहे.छत्रीबागेला राज्य पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि इसवी सन २००८ साली सरखेल कान्होजीराजे आंग्रे ह्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह हे स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.
संदर्भ
[संपादन]महाराष्ट्र टाईम्स शनिवार ३ जुलै २०२१.