Jump to content

अवघा रंग एकचि झाला (संगीत नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवघा रंग एकचि झाला हे एक मराठी संगीत नाटक आहे. डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि नाट्यसंपदा या संस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर असून दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे तर रघुनंदन पणशीकर हे संगीत दिग्दर्शक आहेत. प्रसाद सावकार, जान्हवी पणशीकर आणि स्वरांगी मराठे यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

या नाटकाचे इ.स. २०१३ पर्यंत ३००पेक्षा अधिक प्रयोग झाले होते.

नाटकाचे कथानक[संपादन]

अप्पा वेलणकर (प्रसाद सावकार) हे एक कीर्तनकार असून त्यांच्या कुटुंबात घडणारे प्रसंग या नाटकात आहेत. आपल्या किर्तनावर, पारंपारिक रचनांवर प्रेम करणाऱ्या अप्पांना नव्या पिढीचे विचार पटत नाहीत. त्यांची मुलगी मुक्ता हिला परजातीय तरुणाशी विवाह करायचा आहे. त्यांचा मोठा मुलगा ज्ञानेश अमेरिकेत आहे. नाटकात त्यांचा दुसरा मुलगा सोपान (अमोल बावडेकर) तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आपले जुने संगीत नवीन पद्धतीने जतन करायचे आहे. त्याला त्यात आजच्या पिढीचे बदलही करायचे आहेत. तोही अप्पांना आपले विचार पटवू शकत नाही.

आपल्या कीर्तनाच्या सीडी, कॅसेट्स तयार करण्यास अप्पा सोपानला नकार देतात. दोन पिढ्यांतील हे मतभेद नाटकात अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांत दिसतात. अमेरिकेहून जेनी नावाची मुलगी (स्वरांगी मराठे) या घरात येते. तिच्या येण्याने या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात आहे. तिला या घरातील मतभेद असह्य होतात. तिच्याच प्रयत्‍नाने अप्पा मुक्ताच्या विवाहास संमती देतात.

अप्पांची पत्‍नी (जान्हवी पणशीकर), अप्पांचे मित्र नाना (गौतम मुर्डेश्वर) ही नाटकातील अन्य पात्र आहेत. नाटकातील सर्व कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. प्रसाद सावकार यांनी अप्पांची व्यक्तिरेखा छानच साकारली आहे. अमोल बावडेकर यांनी सोपानची भूमिका प्रभावीपणे केली आहे. त्यांची गाणीही प्रेक्षकांना आवडतात. जेनी या अमेरिकन मुलीची या नाटकातली महत्त्वाची भूमिका स्वरांगी मराठे यांनी केली आहे. स्वरांगीने अमेरिकेहून आलेल्या मुलीचे उच्चार व अभिनय उत्तम साकारले आहेत. स्वरांगीचीही गाणी या नाटकात आहेत.