Jump to content

अर्नेस्ट स्टार्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्नेस्टहेन्री स्टार्लिंग हे ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक होते. ह्यांचा जन्म १७ एप्रिल १८६६ रोजी झाला आणि मृत्यू २ मे १९२७ रोजी झाला. त्यांच्या संशोधनामुळे मानवी शरीराची कार्ये विशेषतः शरीराच्या ऊतकांतील ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह ) द्रव पदार्थांचे प्रमाण कशा प्रकारे कायम ठेवले जाते तसेच अंतःस्रावी द्रवाचे नियंत्रक स्वरूपाचे कार्य, त्याचे हृदया-वरील यांत्रिक नियंत्रण समज-ण्यास मदत झाली. त्यांचे हे संशोधन त्या काळातील मह-त्त्वाचे संशोधन मानले जाते. स्टार्लिंग यांचा जन्म लंडन येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. स्टार्लिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण इलिंग्स्टन येथे झाले (१८७२—७९). त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण किंग्ज महाविद्यालयात घेतले (१८८०—८२). त्यांनी १८८२ मध्ये लंडनमधील गे रुग्णालयाच्या वैद्यकीय शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या शाळेत त्यांनी शिष्यवृत्ती मिळविण्याचा विक्रम नोंदविला. त्यांनी १८९० मध्ये एम्.डी. ही पदवी संपादन केली.

स्टार्लिंग यांनी गे रुग्णालयात १८८९—९९ या काळात इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. या काळात त्यांनी लसीका स्रावावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना रक्तवाहिन्या व ऊतक यांमधील द्रव पदार्थांचे वहन कसे होते, याबाबतचे स्पष्टीकरण मिळाले. या संशोधनाच्या आधारे त्यांनी १८९६ मध्ये ‘स्टार्लिंग सिद्धांत’ मांडला. या सिद्धांतानुसार लहान केशवाहिनीची भित्ती ही अर्धपार्य पटलासारखे काम करते. यातून लवण द्रव आरपार जाऊ शकतो. यासाठी जलस्थित प्रेरणा काम करते व त्याचे संतुलन राखण्याचे काम तर्षण दाब [⟶तर्षण] करतो. हा दाब द्रवातील प्रथिनांमुळे निर्माण होतो.

स्टार्लिंग यांनी लंडन विद्यापीठाच्या महाविद्यालयात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले (१८९९—१९२३). तेथे त्यांनी ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक सर विल्यम बेलिस यांच्याबरोबर संशोधन केले.त्यांना १९०२ मध्ये ‘सिक्रेटीन’ हा पदार्थ वेगळा करण्यात यश मिळाले. हा पदार्थ ग्रहणीच्या अधिस्तरीय कोशिकांपासून तयार होतो व नंतर तो रक्तात मिसळतो. सिक्रेटिनामुळे लहान आतड्यात अग्निपिंड स्राव अग्नि–पिंडनलिकेद्वारा आणला जातो, हे त्यांनी सिद्ध केले [⟶ अग्निपिंड]. स्टार्लिंग यांना हॉर्मोन या संज्ञेचे जनक मानले जाते. त्यांनी १९०५ मध्ये ही संज्ञा तयार केली. अंतस्रावी ग्रंथीतून स्रवणारा हा स्राव रक्तप्रवाहाद्वारा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत अतिशय कमी मात्रेत पोहचविला जातो, मात्र तो मोठ्या प्रमाणावर त्या अवयवाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतो. पहिल्या महायुद्धाच्या काळात शासनाच्या प्रोत्साहनाने विषारी वायूपासून करावयाच्या संरक्षणाबाबत त्यांचे संशोधन चालू होते. स्टार्लिंग यांनी हृदय-फुप्फुस मॉडेल ( प्रतिकृती ) तयार केले. १९१८ मध्ये या मॉडेलच्या अभ्यासावरून त्यांनी त्यांचा हृदयाबाबतचा नियम तयार केला. या नियमानुसार हृदयाच्या स्नायूच्या आकुंचनासाठी लागणारी प्रेरणा व स्नायूचे प्रत्यक्षात झालेले तनन यांचा थेट संबंध असतो. ⇨ वृक्काच्या कार्याबाबत त्यांनी १९२४ मध्ये संशोधन केले. यामध्ये वृक्कात रक्तातून पाणी, क्लोराइडे, कार्बोनेटे व ग्लुकोज वेगळे केले जातात आणि या पदार्थांचे वृक्क सूक्ष्मनलिकांत पुन्हा शोषण होते, असे त्यांना आढळले.त्यांनी मानवी शरीरक्रियाविज्ञानाबाबत सांगितलेली तत्त्वे नंतर झालेल्या संशोधनात बदलली, तरी देखील त्या तत्त्वाचा समावेश आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तकांत करण्यात आला आहे.

लंडनच्या रॉयल सोसायटीने फॉऊलरटन संशोधक प्राध्यापक ही शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांची १८९९ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. ते फिजिऑलॉजिकल सोसायटीचे सदस्य होते. त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन फिजिऑलॉजी (१९१२) या ग्रंथाच्या आजही आंतरराष्ट्रीय आवृत्त्या निघतात.

स्टार्लिंग यांचे किंगस्टन हार्बर ( जमेका ) येथे निधन झाले.