अर्चना गिरीश कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्चना कामत (१७ जून, २०००) एक भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. २०१८मध्ये तिने वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली होती.[१] आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या भारताच्या टेबल टेनिस संघाचा ती भाग आहे. २०१९मध्ये कटक येथे झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत तिने ज्ञानशेखरन सत्यन याच्यासोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.[२]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

अर्चना कामतने नऊ वर्षांची असतानाच टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. तिचे पालक गिरीश आणि अनुराधा कामत हे बंगळुरूमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. बालपणी त्यांनी तिला संगीत, नृत्य आणि कला क्षेत्रांशी ओळख करून दिली. परंतु अर्चनाने नेहमीच टेबल टेनिसमध्ये प्रावीण्य मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. तिचा भाऊ अभिनव याने तिच्यातील टेबल टेनिससाठीचे कौशल्य टिपले आणि तिला त्यासाठी अधिक गांभीर्याने सराव करण्यासाठी प्रोत्साहित केले. पुढे ती २०१३ च्या भारतीय उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपची विजेती ठरली.

२०१८मध्ये तिने दुर्गापूर येथे झालेली कनिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा जिंकली.[३] पुढे तिने तिच्या कारकीर्दीत आणखी मोठी मजल मारत, २०१९ची वरिष्ठ महिलांची भारतीय राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. मग तिच्या आईवडिलांनी तिला टेबल टेनिस खेळणे एक पेशा म्हणून  सुरू करण्यास प्रोत्साहित केल्याचे ती सांगते. तिची आई अनुराधा कामत यांनी त्यांचे नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम सोडून दिले, जेणेकरून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अर्चनासोबत जाता यावे.[1] अर्चना ही भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे, असं कौतुक भारतीय राष्ट्रीय टेबल टेनिस संघातील तिचे वरिष्ठ खेळाडू अचिंता शरद कमल आणि जी. साथियन करतात. अर्चना एक आक्रमक टेबल टेनिस खेळाडू आहे. भारताचे टेबल टेनिस प्रशिक्षक बॉना थॉमस यांना वाटते की अर्चना टेबलाभोवती अतिशय चपळ आहे, जर तिने कामगिरीत सातत्य राखले तर ती आणखी खूप यशाची शिखरे गाठेल.

व्यावसायिक यश[संपादन]

अर्चनाने २०१३ मध्ये भारतीय राष्ट्रीय उपकनिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा जिंकत लवकरच क्रीडाविश्वात तिचा ठसा उमटवला. या यशाच्या मागोमाग तिने राष्ट्रीय कनिष्ठ टेबल टेनिस स्पर्धाही २०१८ मध्ये जिंकली. एका वर्षानंतर २०१९मध्ये तिने वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा जिंकली. यामुळे ती भारतीय राष्ट्रीय टेबल टेनिस संघाचा भाग होण्यास आणि आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पात्र ठरली. वरिष्ठ महिलांच्या श्रेणीत जाण्याचा एक अर्थ हासुद्धा होता की तिला टेबलवर अधिक चपळ व्हायचे होते आणि कौशल्य अधिक धारदार करायचे होते. अर्चनाला वाटते की खेळात खूप बदल झाले आहेत आणि आता खेळाडूंना सर्वोच्च पातळीवर उत्तमरीत्या खेळण्यासाठी तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. त्यासाठीच आता तिने स्वतःची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने अधिक कठोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षण सुरू केले आहे. यादरम्यान कुठलीही दुखापती होऊ नये, हेसुद्धा तिला महत्त्वाचे वाटते. २०१८ मध्ये ब्युनोस आयरिस येथे झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरत उपांत्य फेरी गाठणे आणि ४था क्रमांक पटकावणे, हा तिच्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्यांपैकी एक क्षण होता. [1] टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत तिची जी. सथियनसोबतची जोडी अभेद्य आहे. २०१९ मध्ये कटक येथे झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत या भारतीय जोडीने सुवर्णपदक पटकावले.[2] अर्चना कामत सध्या भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हे मानांकन सुधारण्यास ती उत्सुक आहे. २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.

पदके[संपादन]

  • भारतीय राष्ट्रीय उपकनिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा (मुलींची एकेरी) २०१३
अर्चना गिरीश कामत
वैयक्तिक माहिती
Full name अर्चना गिरीश कामत
Citizenship भारतीय
जन्म १७ जून २०००
Sport
खेळ टेबल टेनिस

मध्ये १ सुवर्णपदक

  • राष्ट्रीय कनिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा (मुलींची एकेरी) २०१८मध्ये १ सुवर्णपदक
  • भारतीय राष्ट्रीय महिलांची टेबल टेनिस स्पर्धा (महिलांची एकेरी) २०१८मध्ये १ सुवर्णपदक

संदर्भ[संपादन]

https://www.bbc.com/marathi/india-55950014 [1]

https://www.ittf.com/2019/07/22/sathiyan-gnanasekaran-archana-girish-kamath-add-indian-success/ [2]

https://scroll.in/field/866131/junior-table-tennis-championships-archana-kamath-manav-thakkar-bag-titles [3]

https://19in19.deccanherald.com/archana-kamath?id=3 [4]

https://www.hindustantimes.com/other-sports/archana-kamath-brings-offence-to-the-table/story-xjpgyDdo3ajmbsL0TSJUAN.html [5]

  1. ^ "BBC News मराठी".
  2. ^ "Sathiyan Gnanasekaran and Archana Girish Kamath add to Indian success". International Table Tennis Federation (इंग्रजी भाषेत). 2019-07-22. 2021-02-20 रोजी पाहिले.
  3. ^ Staff, Scroll. "Junior Table Tennis Championships: Archana Kamath, Manav Thakkar bag titles". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-02-20 रोजी पाहिले.