अनंत वामन वर्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंत वामन वर्टी
जन्म नाव अनंत वामन वर्टी
जन्म डिसेंबर २, इ.स. १९११
सावदे, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र डॉक्टरी, नाटक, साहित्य,
विनोद, तत्त्वज्ञान, इतिहास
साहित्य प्रकार विनोदी, इतिहास संशोधनपर
प्रसिद्ध साहित्यकृती राणीचा बाग, टाल डुप्पो वांगी माडू (कथासंग्रह)
वडील वामन वर्टी
अपत्ये चंद्रहास

डॉ. अ.वा. वर्टी (२ डिसेंबर, इ.स. १९११ - मृत्युदिनांक अज्ञात) हे व्यवसायाने डॉक्टर असून मराठी भाषेतील एक विनोदी लेखक होते.

जीवन[संपादन]

वर्टी यांचा जन्म २ डिसेंबर, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील सावदे येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी नाशिक नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते काम त्यांनी इ.स. १९७१पर्यंत केले. अ.वा. वर्टी हे बॅडमिंटनपटू होते. ब्रीज या खेळाचीही त्यांना आवड होती. परंतु त्यांना साहित्यामध्ये विशेष रस होता. वर्टी यांच्या लेखनात कथानकांची विविधता दिसून येते. तसेच मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण दिसते. कथेचा चमत्कारपूर्ण शेवट करून वाचकावर ते खास परिणाम साधत.

कार्य[संपादन]

इ.स. १९५३ साली गांवकरी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या अमृत या मासिकाचे संपादकपद त्यांनी घेतले. या मासिकासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आणि ते मासिक नावारूपास आणले. इ.स. १९६० साली त्यांनी स्वतःचे श्रीयुत हे अमृत मासिकाच्या धर्तीवरचे नवीन मासिक सुरू केले. ते इ.स. १९६७ सालापर्यंत सुरू होते. या शिवाय त्यांनी चंद्रहास नावाचे प्रकाशनही सुरू केले. या प्रकाशनातर्फे अनेक कथासंग्रह प्रकाशित केले गेले. डॉ. वर्टी यांनी सार्वजनिक वाचनालय, नाशिक, नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक जिमखाना, सांस्कृतिक महामंडळ, सारस्वत सभा अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली होती. नाशिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन ते करत असत. त्यांच्या नांवाने दर वर्षी डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार दिला जातो.

लेखन[संपादन]

डॉ. वर्टी यांनी प्रामुख्याने विनोदी कथा लिहिल्या. त्यांच्या कथांची संख्या ५००हून अधिक आहे. त्यांचे २१ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कथांशिवाय ‘अभिनय’, ‘नवा धर्म’, ‘कठपुतळ्या’, ‘हेरंब’, ‘वाघीण’ या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले. यातील ‘नवा धर्म’ ही कादंबरी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारी आहे. त्यांच्या ‘तिसरी इच्छा’ व ‘सुलूचा रामा-इडली डोसा’ या दोन एकांकिका गाजल्या होत्या. राणीचा बाग हे नाटक अतिशय गाजले. हे नाटक इ.स. १९४७ साली लिहिलेल्या वर्टींच्या ‘अभिनय’ या कादंबरीवर आधारित होते. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑगस्ट, इ.स. १९४९ रोजी पुण्यातील भानुविलास थिएटर येथे झाला होता. तत्कालीन मुंबई इलाख्यात सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाला लाभला होता. मो.ग. रांगणेकर संचलित नाट्यनिकेतन या संस्थेतर्फे या नाटकाचे प्रयोग केले गेले. नाटकाचे ३०० पेक्षाही जास्त प्रयोग झाले. नाट्य-अभिनेते प्रभाकर पणशीकरही या नाटकात काम करत असत. इ.स. १९५७ साली राज्य नाट्यस्पर्धेत एकाच वेळी मराठी, गुजरातीकानडी भाषांमधून या नाटकाचे प्रयोग सादर झाले. हा एक विक्रमच आहे.

साहित्य[संपादन]

वैद्यकीय[संपादन]
 • आपले शरीर
 • तुम्ही आणि तुमचे अन्न
 • वैद्यकातील महान शोध


संशोधनपर[संपादन]
एकांकिका[संपादन]
 • तिसरी इच्छा
 • सुलूचा रामा-इडली डोसा
कादंबऱ्या[संपादन]
 • अभिनय
 • कठपुतळ्या
 • कामसेना
 • नवा देव
 • नवा धर्म
 • पतिव्रता
 • पुनर्जन्म
 • रुपेरी स्वप्न
 • वाघीण (याच नावाच्या कादंबऱ्या इंद्रायणी सावकार आणि प्रा. व.बा. बोधे यांनी लिहिल्या आहेत.)
 • हेरंब
नाटक[संपादन]
 • राणीचा बाग
कथासंग्रह[संपादन]
 • अकरावा गडी
 • अखेरचा आघात
 • अल्लामिया देनेवाला (बापूसाहेबांच्या कथा)
 • ए गुलबदन
 • गडगडाट
 • टालडुप्पो वॉंगिमाडूऽ
 • दंतकथा
 • पाऊस! पाऊस!
 • पोलिसी खाक्या
 • म.चा मा.टवे
 • मंत्र्याचा मंत्री
 • मुमताज
 • विनोद : एक व्याख्यान (ललित)
 • सायराबानू आणि इतर विनोदी कथा
 • सुलूचा सर्व्हंट
लघुनिबंध संग्रह[संपादन]
 • परिपाक (भाग १, २)
 • पिसारा

पुरस्कार[संपादन]

वर्टी यांच्या ‘टॉमी’ या कथेस इ.स. १९३७ मध्ये किर्लोस्कर मासिकाच्या लघुकथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले होते. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिकाच्या कथास्पर्धेत ‘मुमताज’ या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले होते.

 • सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार - राणीचा बाग
 • इंदूर साहित्य सभा पुरस्कार - राणीचा बाग
 • नाशिक येथे त्यांच्या सन्मानार्थ एका रस्त्यास डॉ. अ.वा. वर्टी यांचे नाव दिले आहे.
 • नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
 • मालेगाव कॅम्प(नाशिक जिल्हा) इथल्या (MSG College)महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.ए.यू. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०१० साली (१) डॉ. अ.वा. वर्टी-व्यक्ती आणि वाङ्‌मय, आणि (२)नाटककार वर्टी-एक शोध हे दोन शोधनिबंध लिहिले गेले होते.

बाह्य दुवे[संपादन]