राजा गोसावी
राजा गोसावी | |
---|---|
राजा गोसावी | |
जन्म |
राजा गोसावी २८ मार्च, १९२५ |
मृत्यू |
०१ मार्च १९९८ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | भ्रमाचा भोपळा |
वडील | शंकर गोसावी |
राजा गोसावी - पूर्ण नाव - राजाराम शंकर गोसावी (जन्म:Phaltan, Satara मार्च २८, १९२५ - ०१ मार्च १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्यअभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बाळ गोसावी यांच्या पत्नी होत.
राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. नंतर ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाची तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले ,त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ आणि ’लाखाची गोष्ट’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती.
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
विनोदाचा राजा
[संपादन]मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खऱ्या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत ’राजा गोसावीची गोष्ट' हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवलकर, दामुअण्णा मालवणकर यांच्यासमवेत अनेकानेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती.
मृत्यू
[संपादन]राजा गोसावी यांना मेकअपच्या खोलीतच चेहऱ्याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला (२८-२-१९९८).
राजा गोसावी यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)
[संपादन]- उधार उसनवार (भीमराव वाघमारे)
- एकच प्याला (तळीराम)
- कनेक्शन
- करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे)
- कवडीचुंबक (पंपूशेट)
- घरोघरी हीच बोंब (दाजिबा)
- डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर)
- तुझे आहे तुजपाशी (श्याम)
- नटसम्राट (गणपतराव बेलवलकर)
- नवरा माझ्या मुठीत गं
- नवऱ्याला जेव्हा जाग येते (गोविंदा)
- पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण)
- प्रेमसंन्यास (गोकुळ)
- भाऊबंदकी (नाना फडणीस)
- भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज)
- भ्रमाचा भोपळा (कचेश्वर)
- मेंढरं (प्रेस फोटोग्राफर)
- या, घर आपलंच आहे (गौतम)
- याला जीवन ऐसे नाव (नाथा)
- लग्नाची बेडी (अवधूत, गोकर्ण)
- वरचा मजला रिकामा (दिगंबर)
- शिवसंभव (इसामियॉं)
- संशयकल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या)
- सौजन्याची ऐशी तैशी (नाना बेरके)
- हा स्वर्ग सात पावलांचा (डॉ. गात)
राजा गोसावी यांचे चित्रपट
[संपादन]- अखेर जमलं
- अवघाची संसार (१९६०)
- आंधळा मागतो एक डोळा
- आलिया भोगासी
- उतावळा नवरा
- कन्यादान (१९६०)
- काका मला वाचवा
- कामापुरता मामा (१९६५)
- गंगेत घोडं न्हायलं
- गाठ पडली ठकाठका
- गुरुकिल्ली (१९६६)
- चिमण्यांची शाळा (१९६२)
- देवघर
- दोन घडीचा डाव
- पैशाचा पाऊस (१९६०)
- बाप माझा ब्रह्मचारी (१९६२)
- येथे शहाणे राहतात (१९६८)
- लग्नाला जातो
- लाखाची गोष्ट
- वरदक्षिणा (१९६२)
- वाट चुकलेले नवरे (१९६४)
- सौभाग्य
- हा खेळ सावल्यांचा
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- नटसम्राट मध्ये ’गणपतराव बेलवलकरांची’ भूमिका करण्याचा मान
- १९९५ साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |