इंद्रध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु ही पर्यायी नावे आहेत. इंद्राच्या ध्वजास अथवा इंद्राच्या सन्मानार्थ ध्वजाचा मान देऊन पूजन केल्या जाणाऱ्या सुशोभित काठीस इंद्रध्वज असे म्हणतात. या काठीपूजन उत्सवास शक्रोत्सव असे संबोधले जात असे.

स्वरूप आणि रचना[संपादन]

रामायणात ध्वजाचे स्वरूप पताकेप्रमाणे असावे, असा संकेत रामाने त्याची घडी करून डोक्याखाली घेतलेल्या त्याच्या भुजाच्या वर्णनावरून मिळतो. कालिदासाच्या रघुवंशावर ‘शिशुहितैषिणी‘ नामक टीका लिहिणाऱ्या चरित्रवर्धनाने ध्वजस्तंभ हत्तीच्या आकाराप्रमाणे (म्हणजेच भव्य) चौकोनी स्तंभ असल्याचे सूचित केले आहे.[१] तो म्हणतो "गजाकारं चतुःस्तंभं पुरद्वारे प्रतिष्ठितं। पौराः कुर्वन्ति शरदि पुरुहूत महोत्सवं॥". इंद्रध्वजाच्या सहाव्या शतकातील स्वरूपाची माहिती मुख्यत्वे वराहमिहिराच्या बृहत्संहितेतून येते. प्राचीन भारतातील इंद्रध्वज महोत्सव लेखाच्या लेखिका नीला कोर्डे यांच्या उद्‌धृतांनुसार मम्मटाच्या ‘काव्यप्रकाश‘ या काव्यशास्त्रविषयक ग्रंथातील द्वितीय उल्लासात ‘‘इन्द्रार्था स्थूणा इन्द्रः‘‘ (इंद्रारासाठी असलेला स्तंभ म्हणजेच इंद्र) असा उल्लेख आहे. नगरद्वारात किंवा राजद्वारात हा ध्वजदंड उभारला जाई. तो शत्रूच्या दिशेने झुकविण्यात येत असे, ध्वज उभारताना त्याला आधार देण्यासाठी आठ दिशांना आठ दोऱ्या बांधण्यात येत. या ध्वजाला सात छोट्या ध्वजा बांधण्यात येत. त्या नंदा, उपननंदा, जया, विजया, दोन वसुंधरा व शक्रमाता अश्या एकूण सात असत.[१] वराहमिहिरानुसार हा ध्वज इंद्रास विष्णूकडून प्राप्त झाला; तो इंद्राने त्या ध्वजाला माळा, घुंगरू, घंटा, छत्र व रत्‍नादी आभूषणांनी सुशोभित करून तो युद्धात त्याच्या ८ चाकांच्या रथावर उभारला, त्याचा ध्वज तेजस्वी, सूर्याप्रमाणे देदीप्यमान दिसत होता.[१]

इंद्रध्वजासाठी लागणारा वृक्ष अरण्यातून आणावा लागे. वराहमिहिर म्हणतो - उद्यान देवतालय पितृवन वल्मीकमार्ग चितिजाताः।कुब्जोर्ध्वशुष्क कण्टकिवल्लीवन्दाक युक्ताश्च ॥१३॥ बहुविहगालय कोटरपवनानल पीडिताश्च ये तरवः। येच स्युः स्त्रीसंज्ञा न ते शुभाः शक्रकेत्वर्थे ॥१४॥ वराहमिहिरानुसार उद्यान, मंदिर, श्मशान (पितृवन), मातीचा ढिगारा (वल्मीक), रस्ता (मार्ग), यज्ञभूमी (चिति) येथे उत्पन्न झालेले, ठेंगणे (कुब्ज), वर सुकलेले (ऊर्ध्वशुष्क) काटेरी वेलींनी (कण्टकिवल्ली) वेढलेले, ज्या वृक्षांच्या ताण्यातून स्वतंत्र वृक्षाचा अंकुर फुटला आहे (वन्दाक) असे, अनेक पक्ष्यांचे निवासस्थान (बहु विहग + आलय) व घरटी (कोटर) असलेले, वारा व अग्नीने पीडित (पवन + अनलपीडिताः) तसेच स्त्रीलिंगी नावे (स्त्रीसंज्ञा- उदा. कदली बदरी) असलेले वृक्ष शक्रकेतु म्हणजे इंद्रध्वज बनविण्यास अशुभ आहेत.[१]

पुरातत्त्व[संपादन]

मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड प्रभागाच्या सागर जिल्ह्यातील एरण येथे उत्खननात मिळालेल्या नाण्यात इंद्रध्वजाची चित्र असलेल्या नाण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात भाजे येथील लेण्यांमध्ये हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या साहाय्यकाच्या हातात एक ध्वज दर्शविला आहे आणि तो इंद्रध्वज असल्याचा काही इतिहास तज्‍ज्ञांचा कयास आहे.

शक्रोत्सव[संपादन]

महाभारतात आदिपर्वात शक्रोत्सव साजरा करण्यासाठी इंद्र चेदी राज उपरिचरास सुचवतो असे वर्णन आहे. राजा आपल्या तपोबलाने इंद्रपद प्राप्त करील, अशी इंद्रास भीती वाटली. म्हणून इंद्राने उपरिचराला चेदी देश, वैजयंतीमाला व साधूंच्या रक्षाणार्थ वेळूची काठी दिली. इंद्राच्या या उपकाराचे स्मरण म्हणून वर्षप्रतिपदेच्या दिवशी उपरिचराने त्या काठीला वस्त्र वेढून गंध-पुष्प इत्यादिकांनी तिची पूजा केली. तेव्हापासून हा उत्सव राजे व इतर लोक साजरा करतात. असा उल्लेख महाभारतातील आदिपर्वात येतो.[२][३] तर खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे इंद्राला राग येऊन तो गोकुळावर पावसाची अतिवृष्टी करतो. गोवर्धन पर्वताचा आसरा घेऊन कृष्ण गोकुळातील प्रजेला आणि गोधनाला वाचवतो, असा उल्लेख आहे. कृष्ण त्यानंतर तेथे गोकुलोत्सव सुरू करतो.[४]

बृहदसंहितेनुसार इंद्रध्वज महोत्सवात राजाबरोबरच सर्व प्रजाजनही उत्साहाने भाग घेत. इंद्रध्वजाची यष्टी (दंड) नगरात आणली जात असता नगर पताकांनी व तोरणांनी सजवावे, आनंदित जन तिथे असावेत आणि चौकात नट, नर्तक व गायक यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करावे, असे म्हटले आहे.[१]

शक्रोत्सव ऋतू आणि तिथी[संपादन]

महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्षप्रतिपदेस करण्याचे सुचवले गेले आहे तर इतर ग्रंथातून उत्सव मुख्यत्वे भाद्रपद ते चैत्र या कालावधीत साजरा केला जात असल्याचे संकेत मिळतात. बृहत्संहितेत भाद्रपद शुक्ल अष्टमीला इंद्रध्वजाची यष्टी नगरात आणावी असे म्हटले आहे. परंतु त्याचा पूजनविधी मात्र द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत सांगितला आहे आणि पाचव्या दिवशी म्हणजे कृष्ण प्रतिपदेला विधिपूर्वक पूजन करून ध्वज विसर्जित करावा असे सांगितले आहे. बृहत्संहितेत भाद्रपदात इंद्रध्वज महोत्सव होत असल्याचे सांगितले असले तरी महाभारताचे ‘खिल‘ (Supplement) मानल्या गेलेल्या हरिवंशाच्या ‘विष्णूपर्व‘ नामक अध्यायात मात्र हा उत्सव शरद ऋतूत होत असल्याचा उल्लेख पुढील श्लोकात आढळतो- तयोः प्रवृत्तयोरेवं कृष्णस्यच बलस्य च।वने विचरतो मासौ व्यतियातौ स्म वार्षिकौ ॥१॥व्रजमाजग्मतुस्तौ तु व्रजे शुश्रुवतुस्तदा। प्राप्तं शक्रमहं वीरौ गोषांश्चोत्सवलालसान्‌ ॥२॥ अर्थ- (वैशंपायन म्हणतो) ‘‘अशा प्रकारे वनविहार करणाऱ्या कृष्णाचे आणि बलरामाचे वर्षाऋतूतील दोन महिने (म्हणजेच श्रावण आणि भाद्रपद) निघून गेले. नंतर ते दोघेजण व्रजात (गोकुळात) आले. त्या वेळी ‘इंद्राचा महोत्सव आहे,‘ असे त्या दोघा वीरांनी ऐकले. सर्व गोपाळ उत्सवाविषयी उत्सुक असलेले त्यांना दिसले. कालिदासाच्या रघुवंशावर ‘शिशुहितैषिणी‘ नामक टीका लिहिणाऱ्या चरित्रवर्धनाने रघुवंशातील ‘पुरुहूतध्वज‘ (पुरुहूत = इंद्र) या शब्दाचे स्पष्टीकरण करताना इन्द्र महोत्सव शरदऋतूत साजरा होत असल्याचा उल्लेख केला आहे.[१]

जैन आणि बौद्ध धर्मातील इंद्रध्वज आणि उत्सव उल्लेख[संपादन]

जैन-ग्रंथांमध्ये इंद्रध्वज पूजा नमूद केलेली दिसते, परंतु ही इंद्रध्वज पूजा जनसामान्य करताना नव्हे तर उत्सवादरम्यान इंद्रादि देवता नंदीश्वरास जाऊन जैन प्रतिमांचे पूजन करतात असा उल्लेख येतो.[५]

संस्कृत साहित्यातील उल्लेख[संपादन]

वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांडात आकाशातून उड्डाण करणाऱ्या हनुमानाच्या शेपटीस "लाङ्गलंच समाविद्धं प्लवमानस्य शोभते | अम्बरे वायुपुत्रस्य शक्रध्वज इवोच्छ्रितः" या श्लोकातून इंद्रध्वजाची उपमा दिली आहे.[६] नीला_कोर्डे यांच्या माहितीनुसार अश्वघोषाच्याबुद्धचरित‘ या महाकाव्यात सर्वार्थसिद्धीने म्हणजेच सिद्धार्थाने (गौतम बुद्धाने) राज्यत्याग केल्याचे ऐकून शोक अनावर होऊन भूमीवर कोसळणाऱ्या शुद्धोदन राजाला उत्सवानंतर खाली उतरवण्यात आलेल्या इंद्रध्वजाची उपमा दिली आहे. (बुद्धचरित, सर्ग (श्लोक क्र. ७३). रघुवंशात दिलीपाचा पुत्र रघू गादीवर आलेला पाहून प्रजाजनांना इंद्रध्वज दर्शनाचा आनंद झाल्याचे म्हटले आहे. (रघुवंश सर्ग ४ श्लोक क्र. ३) भासाच्या ‘मध्यमव्यायोग‘ या नाटकात भीमाला हिडिंबेकडे बळी म्हणून नेताना घटोत्कचाने त्याला पाशांनी बांधले असता तो ‘‘दोऱ्यांनी गच्च बांधलेल्या इंद्रध्वजाप्रमाणे शोभून दिसत होता‘‘ (अंक १, श्लो. क्र. ४७) असे म्हटले आहे. शूद्रकाच्या ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकात तर या महोत्सवाचा दोन वेळा उल्लेख आला आहे. या नाटकातील चेट विदूषक मैत्रेयाला ‘इन्द्रमहकामुक काक‘ म्हणजे ‘‘इंद्रध्वज महोत्सवात बळी मिळण्याची इच्छा करणारा कावळा‘‘ म्हणतो. (मृच्छकटिक अंक ५) याच नाटकाच्या दहाव्या अंकात चारुदत्ताला वधस्तंभाकडे नेणारे चांडाल ‘‘इंद्रध्वज विसर्जनासाठी नेला असता पाहू नये,‘‘ असे विधान करतात. (मृच्छ. अंक १० श्लो. क्र. ७) [१]

पुराणांमधील उल्लेख[संपादन]

  • इन्द्रध्वज ब्रह्मवैवर्त्त ४.२१
  • भविष्य ४.१३८.४९ , ४.१३९.१
  • भागवत १०.४४.२३
  • मत्स्य २४२.९, २४२.२४
  • वराह १६४.३९ ,१६४.४०
  • विष्णूधर्मोत्तर २.१५४.१३, २.१५५.५, २.१५६.१, २.१५७.१, २.१६०.१०
  • हरिवंश २.१५.४ , २.१६.१+, ३.२६.१५
  • वाल्मीकि रामायण ४.१६.३७, ४.१७.२ , ५.४८.२४
  • महाभारत - आदिपर्व १७२.३ , वन्पर्व ४२.८ , १४६.७० , उद्योग्पर्व ५९.१५ , भीष्म्पर्व ११९.९१ , द्रो्णपर्व १०५.११ , शल्यपर्व ४.१६, १७.५३ , सौप्तिकपर्व ६.१६

आधुनिक काळातील उत्सव[संपादन]

विक्रमोत्सव[संपादन]

वर्षप्रतिपदेस उज्जैन येथे विक्रमोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यादरम्यान इंद्रध्वजाचेही पूजन केले जाते.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f g नीला_कोर्डे. "प्राचीन भारतातील इंद्रध्वज महोत्सव". Archived from the original on 2008-09-17. "प्राचीन भारतातील इंद्रध्वज महोत्सव"-नीला_कोर्डे यांचा लेख दिनांक ४ सप्टेंबर २०१५ भाप्रवे सकाळी ०७ वाजून २८ मिनीटे वाजता
    बृहत्संहितेतील ‘इन्द्रध्वजसम्पदध्यायः‘ नावाच्या अध्यायात श्लोक क्र. १ ते ६८ रोजी पाहिले
    .
    |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ * https://archive.org/stream/Mahabharat_201411/01_Adi_Parva_part-1-adhyaya-1-64#page/n156/mode/1up
  3. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand2/index.php?option=com_content&view=article&id=4830&catid=24:khand2&Itemid=617
  4. ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-51-27/2013-03-06-06-10-12?start=32
  5. ^ https://books.google.co.in/books?id=QAtiBQAAQBAJ&pg=PA106&dq=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C&hl=en&sa=X&ved=0CBwQ6AEwAGoVChMI_-CU4b7cxwIVBI2UCh0ynQLg#v=onepage&q=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C&f=false
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2007-07-23. 2015-09-04 रोजी पाहिले.
  7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-05. 2015-09-04 रोजी पाहिले.