गुरुदास बॅनर्जी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गुरुदास बॅनर्जी (२६ जुलै १८४४–२ डिसेंबर १९१८)
[संपादन]भारतीय विधिज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्याच्या (कोलकाताच्या) नारकेलडंग या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव सोनामणी होते. शालेय शिक्षण जन्मगावीच पूर्ण करून १८६५ साली गुरुदास हे कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून एम. ए. झाले. सर्व शालेय व विद्यापीठीय परीक्षांत त्यांनी प्रथमक्रमांक मिळविला होता. एम. ए.च्या परीक्षेत ते गणित विषयात पहिले आल्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले होते. काही काळ कलकत्त्यातच अध्यापकाचे काम करीत असता त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला व बी. एल. ही पदवी संपादन केली. नंतर १८७७ मध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ लॉज (LL. D.) ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांची कायदा व गणित या विषयांचा अधिव्याख्याता म्हणून बेऱ्हमपूर महाविद्यालयात नेमणूक झाली. अध्यापनाबरोबरच कलकत्ता येथील उच्च न्यायालयात वकिली करण्याची सवलतही त्यांना देण्यात आली. १८७८ मध्ये टागोर व्याख्यानमालेतील ‘हिंदू लॉ ऑफ मॅरेज अँड स्त्रीधन’ या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्याने आजही मौलिक ग्रंथ म्हणून मानली जातात.
कार्य
[संपादन]रुदास यांनी त्या काळात तांत्रिक आणि कृषिविषयक शिक्षणाची गरज ओळखून विद्यापीठातून तंत्रविद्या व कृषी यांच्या स्वतंत्र शाखा असाव्यात, यासाठी प्रचार केला. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे, असा आग्रह धरणारे ते बहुधा पहिलेच विचारवंत ठरतील. धर्म आणि नीतिशिक्षणाचा अंतर्भाव शिक्षणात असावा; परंतु त्यात विशिष्ट धर्माचा पुरस्कार न करता मानवतावादी दृष्टिकोन राखावा, असे त्यांचे मत होते.
गुरुदास हे उच्च न्यायालयात ख्यातनाम वकील म्हणून प्रसिद्ध होते. १६ जानेवारी १८८९ रोजी कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. तसेच त्याच वर्षी विधी आयोगाचे सदस्य, १८९० साली कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू, १८९४ साली केंद्रीय पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष इत्यादी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. १९०४ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला.
गुरुदास यांनी हिंदू लॉ ऑफ मॅरेज अँड स्त्रीधन , ए फ्यू थॉट्स ऑन एज्युकेशन, द एज्युकेशन प्रॉब्लेम इन इंडिया (इंग्रजी), तसेच शिक्षण, ज्ञान आणि कर्म (बंगाली) ही ग्रंथे लिहिली.
गुरुदास यांचे कलकत्ता येथे निधन झाले.