हावडा ब्रिज
हावडा ब्रिज (बांग्ला: হাওড়া ব্রিজ; अधिकृत नाव: रवींद्र सेतु) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा पूल कोलकाता शहराला हावडा ह्या उपनगरासोबत जोडतो. कोलकात्यामधील सर्वात लोकप्रिय खुणांपैकी एक असलेला हावडा पूल इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान बांधला गेला. जगप्रसिद्ध बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या आदराप्रिथ्यर्थ १९६५ साली हावडा पूलाचे नाव बदलून रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावरा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ४० लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात. हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक ह्या पूलाच्या पश्चिम टोकाजवळच स्थित आहे. ह्यामुळे हावडा पूलाला कोलकात्याचे प्रवेशद्वार असेही संबोधतात. हावडा स्थानकाहून कोलकात्याला जाण्यासाठी केवळ हावडा पूलाचाच वापर केला जातो.
रचना
[संपादन]हावडा ब्रिज आधारभूत कंसाकृती कमान (कॅन्टिलिव्हर) ह्या रचनेचा असून दोन टोकांवरील टेकू सोडल्यास नदीपात्रात कोणतेही खांब किंवा आधार नाहीत. पूलाची एकूण लांबी ७०५ मीटर्स इतकी असून दोन टेकूंमधील अंतर १५०० फूट आहे. पुलाची रुंदी ७१ फूट असून दोही बाजूस १५ फूट रुंदीचे पदपथ (फुटपाथ) आहेत. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २५ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला ज्याचा पुरवठा टाटा स्टील कंपनीने उपलब्ध करून दिला.