परब्रह्मोपनिषद
हे अथर्ववेदीय उपनिषद आहे. यात एकूण २० मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये परब्रह्मप्राप्तीसाठी संन्यासधर्माचे विस्तृत विवेचन केलेले आहे. उपनिषदाचा शुभारंभ महाशाल शौनकाच्या प्रश्नाने झाला आहे. महाशाल शौनकाने महर्षी पिप्पलाद यांना विचारले आहे की जगात उत्पन्न होणारे सगळे पदार्थ त्यापूर्वी कुठे असतात? भगवान हिरण्यगर्भ यांनी या पदार्थांचे सृजन कोणत्या प्रकारे केले आणि वस्तुतः ते कोण आहेत? महर्षी पिप्पलादांनी ह्या प्रश्नाचे विवेचन केले आहे आणि आणि त्या परमसत्तेचा - जी सृष्टीचे आदिकारण आहे - त्या परमसत्तेस जाणण्यासाठी अष्टकपाल-अष्टांगयोगाचा आश्रय घेण्यास सांगितलेले आहे. पुढे जाऊन संन्यास धर्माचे प्रभावशाली वर्णन केलेले आहे; ज्यामध्ये संन्यासी बाह्य यज्ञोपवीत आणि शिखेच्या ऐवजी आंतरिक यज्ञोपवीत आणि शिखा धारण करतो. सोबतच हे सांगितलेले आहे की ज्याने अग्नीमय-ज्ञानमय शिखा आणि यज्ञोपवीत धारण केलेले आहे तोच खराखुरा साधक आणि मुक्तीचा अधिकारी बनू शकतो. शेवटी प्रपंचमय शिखा आणि यज्ञोपवीताचा परित्याग करून प्रणव ओंकारब्रह्मरूप शिखेचा आणि यज्ञोपवीताचा आधार घेऊन मोक्षाधिकारी बनण्याचा निर्देश दिलेला आहे.