अरियकुडी रामानुज अय्यंगार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली. त्यांनी संगीताचे शिक्षण प्रारंभी मलयप्पा अय्यर यांच्याकडे, नंतर गुरुकुल पद्धतीने दोन वर्षे नम्मकल नरसिंह अयंगार यांच्याकडे व आठ वर्षे रामनाड श्रीनिवास अयंगार यांच्याकडे घेतले. वयाच्या विसाव्या वर्षानंतर मैफलींमध्ये गाऊन व्यवसायास प्रारंभ केला. त्यागराजाच्या शिष्यपरंपरेतील प्रमुख गायक म्हणून ते ओळखले जात. अरियकुडींची आवाजी भरदार, बहुरंगी व स्वरसंवादांनी संपन्न होती आणि विशेष म्हणजे ही स्वरसंवादांची अनुकूलता त्यांच्याबाबत अखेरपर्यंत टिकून होती.

अरियकुडींचा लवचीक, घुमारेदार, खणखणीत आवाज सुंदर आलापक्रिया आणि झिलईदार रचनांचा आविष्कार यांमुळे त्यांच्या मैफली अत्यंत वेधक होत. त्यांत कर्नाटक संप्रदायाचे निर्मळ व परिपूर्ण प्रतिबिंब उमटलेले दिसे. त्यांचे गायन पारंपरिक कचेरी पद्धतीचे होते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गानशैली ‘अरियकुडि शैली’ म्हणून ओळखली जात असे व ती जाणकारांप्रमाणेच सामान्यांमध्येही प्रिय होती. त्यांनी त्यांचे गुरू रामनाड श्रीनिवास अयंगार यांच्या अभिजात रचना लोकप्रिय केल्या.

बिलहरी व कानडा रागांमध्ये त्यांनी दोन तिल्लाने संगीतबद्ध केले आहेत. त्यांच्या सु. तीस ध्वनिमुद्रिका आहेत. अरुणाचल रवीच्या रामनाटकम्च्या तसेचतिरुप्पावैममधील आंडाळच्या गीतांची त्यांनी दाक्षिणात्य संगीतरचनेमध्ये बांधणी केली. धन्नमल, बी. राजम् अय्यर यांच्यासारखे संगीतकार शिकवून तयार केले. ‘संगीत रत्‍नाकर’ (१९३४), ‘संगीत कलानिधी’ (१९३८), ‘आस्थानविद्वान, म्हैसूर दरबार’ (१९४१), ‘गायकशिखामणी’ (१९४७) यांबरोबरच राष्ट्रपती पुरस्कार (१९५२) व ‘पद्मभूषण’ (१९५७) या पदव्या व मानसन्मान त्यांना लाभले.