Jump to content

जायसी मलिक मुहंमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदीतील पद्मावत  ह्या प्रख्यात काव्याची रचना करणारा सूफी कवी. ‘जायसी’ ह्या त्याच्या उपनावावरून तो रायबरेली जिल्ह्यातील जायस नगरात राहणारा असावा असे दिसते. त्याच्या जीवनाबाबत तसेच कालाबाबत निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध आणि त्याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. साधारणतः पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो विद्यमान होता, असे मानले जाते. ‘मलिक’ ह्या त्याच्या उपाधीवरून त्याचे पूर्वज इराणातून भारतात आले असावेत, असे म्हणले जाते. त्याच्या वडिलांचे नाव अशरफ होते व ते शेती करीत. जायसीने सैयद अशरफ यांना गुरू मानले आहे पण सैयद अशरफ जहांगीर चिश्ती ‘शिमनानी’ नावाचे जे प्रख्यात साधक फैजाबाद जिल्ह्यातील कछोछा येथे रहात होते, ते १४०१ मध्येच मृत्यू पावले. तेव्हा त्यांचे वंशज शेख मुबारक यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यामुळे सैयद अशरफ यांना जायसीने गुरू म्हणले असावे, असे अनुमान आहे. जायसीने उल्लेखिलेले महदी गुरू शेख बुर्हान मात्र जायसीचे प्रत्यक्ष गुरू असावेत.


जायसी एका डोळ्याने आंधळा, एका कानाने बहिरा, लंगडा व कुरूप होता पण स्वभावाने तो अत्यंत नम्र, सज्जन आणि दानशूर होता. उत्तरायुष्यात तो लखनौ जिल्ह्यातील अमेठी राज्यात फकीर होऊन राहत असे आणि मंगरा नावाच्या घनदाट जंगलात आपली साधना करीत असे. ह्या जंगलातच कुणा शिकाऱ्याची गोळी लागून त्याला मृत्यू आला. जायसीचे उपलब्ध ग्रंथरचना पद्मावत, अखरावट, आखिरी कलाम, महरी बाईसी, चित्रावत (चित्ररेखा) आणि मोस्तीनामा (मसालनामा) ही होय. यांशिवाय इतरही बरीच रचना त्याच्या नावावर सांगितली जाते पण ती आज तरी उपलब्ध नाही. जायसीच्या अमर कीर्तीचा आधारस्तंभ म्हणजे त्याचे पद्मावत  हे खंडकाव्य. त्याचा रचनाकाल हिजरी सन ९४७ (सु. १५४०) असा स्थुलमानाने मानला जातो. चितोडचा राजा रतनसेन आणि सिंहलद्वीपची राजकन्या पद्मिनी यांच्या प्रणयकथेवर हे काव्य आधारलेले आहे. अलाउद्दीनचा चितोडला पडलेला वेढा व पद्मिनीचा जोहार या ऐतिहासिक घटना ह्या काव्यात आधार म्हणून घेतलेल्या आहेत तथापि ऐतिहासिकतेपेक्षा जायसीने आपल्या प्रतिभासामर्थ्याने ह्या कथेला दिलेले रूप अतिशय सरस व सुंदर आहे. ह्या सर्व काव्यास आध्यात्मिक रूपकाचा घाट देण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे.


या काव्यावर सूफी सिद्धांत व भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैत मताचा खूपच प्रभाव पडलेला आहे. यातील मुख्ये पात्रे भारतीय असून अलंकार व प्रतीकेही भारतीयच आहेत. हे काव्य फार्सी लिपीत व मस्नवी शैलीत लिहिलेले असले, तरी त्याची भाषा अवधी हिंदी असून तिचे लोकजीवनाशी अतूट नाते आहे. ते चौपाई दोह्यांत लिहिले असून दोह्यांची एकूण संख्या ६५३ आहे. प्रेम, विरह, सौदर्य, मांगल्य इ. भावभावनांचा प्रवाही आणि प्रासादिक भाषेत रम्य आविष्कार त्यात आढळतो. एक प्रकारे हिंदू व इस्लाम धर्मातील कटुता, एकांगीपणा आणि अतिरेकी अभिनिवेश टाळून परस्परांचा स्नेहपूर्ण असा जो एकोपा प्रस्थापित होत होता, त्याचे पद्मावत  हे प्रतीक आहे, असे म्हणले पाहिजे. माणसातील प्रेमभाव सर्व बाह्य भेदांतीत असू शकतो, हेच जायसीने या काव्याद्वारे दाखविले आहे. सूफी काव्यांत जायसीचे पद्मावत  सर्वश्रेष्ठ असून हिंदीत रामचरित मानसच्या खालोखाल त्याला मानाचे स्थान आहे.


अखरावटमध्ये इस्लामी धर्मग्रंथांनुसार सृष्टिरचनेबाबतची माहिती तसेच सूफी सिद्धांताचे वर्णन आले आहे. आखिरी कलाम  इस्लाम धर्मातील पौराणिक कल्पनेवर (कियामत कल्पनेवर)  आधारित आहे. महरी बाईसीमध्येही आखिरी कलामसारखाच उपदेश व प्रतिपादन आहे. चित्रावत  वा चित्ररेखामध्ये चंद्रपूरची राजकन्या चित्ररेखा आणि कनौजचा राजपुत्र प्रीतमकुंवर यांची प्रेमकथा वर्णिली आहे. एका लोककथेच्या आधारे जायसीने त्याची रचना केली. हिंदी साहित्यात पद्मावतमुळेच जायसीचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पद्मावत  ह्या काव्याच्या हिंदीत अनेकांनी संपादित व सटीक आवृत्या प्रसिद्ध केल्या.