सुनील चिंचोलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; - २२ एप्रिल २०१८) हे शिवाजीराव भोसले यांचे विद्यार्थी होते. शाळा-काॅलेजचे पुरेसे शिक्षण झाल्यावर त्यांनी भोसल्यांना यांना विचारले की 'आता मी पुढे काय करू?' प्राचार्य भोसले यांनी त्यांना सज्जनगडचा रस्ता दाखवला.

सुनीलने सज्जनगडावर वीस वर्षे राहून साधना आणि अध्ययन केले. त्याची परिणती म्हणून ते समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचे प्रचारक झाले. त्यांनी दासबोधावर कीर्तने आणि प्रवचने करायला सुरुवात केली, आणि त्याचवेळी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली.

रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील शिकवण सशक्त राष्ट्र उभारणीसाठी आजही उपयुक्त आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी अगदी कमी किंमतीत दासबोधाची आवृत्ती काढण्याची चिंचोलकरांची खूप इच्छा होती. चिंचोलकरांच्या मृत्यूनंतर डाॅ. अशोक कामत यांनी चांगला कागद. चांगली छपाई, चांगली मांडणी, चांगली पुस्तक-बांधणी यांसह हा ग्रंथ फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून दिला आणि आपल्या मित्राची इच्छा पूर्ण केली. या ग्रंथाच्या शेवटी विस्तृत शब्दकोश दिला आहे.

लेखक आणि वक्ता दोन्ही गुण एकाच व्यक्तीत असणे हा तसा दुर्मिळ योग. हा योग समर्थव्रती सुनील चिंचोलकर यांच्यामध्ये पाहायला मिळत होता. १९७२ पासून संतचरित्रांचा अभ्यास हाच त्यांचा ध्यास आणि श्वासही होता. लेखन, प्रवचन हे सुनील चिंचोलकर यांनी व्रत म्हणून अखंडपणे जोपासले होते. त्याचा प्रत्यय प्रस्तुत ग्रंथातून येतो. श्रीसमर्थ रामदासस्वामी हे सुनीलजींचे प्रेरणास्थान आणि ग्रंथराज दासबोध हा त्यांचा प्राण होता. विविध उपक्रमांमधून लोकांपर्यंत त्यांनी हे विचार पोहोचवले. तरीही त्यांना असे वाटत होते की, कोणतातरी मोठा प्रकल्प करायला हवा त्या प्रेरणेतून संपूर्ण दासबोध ग्रंथ अर्थ विवरणासह लिहिण्याचा संकल्प आकाराला आला. कोणतेही काम असो ते समर्थनिष्ठेने पार पडणे हे सुनीलजींनी घेतलेले व्रतच होते. त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस पुस्तकांचे लेखन केले आहे. ते लेखनही व्रत म्हणूनच त्यांनी केले होते. रामदासस्वामींचे चरित्र आणि कार्य तरुणांच्या मनामनात रुजवण्यासाठी ते सर्वतोपरी अखंडपणे अखेरपर्यंत कार्यरत राहिले होते.

समर्थविचारांचे प्रसारकार्य हे कधी थांबत नसते हे 'ग्रंथराज दासबोध ' या ग्रंथावरून दिसून येते. दुर्दैवाने सुनील चिंचोलकरांकडून हे कार्य पूर्ण होऊ शकले नसले तरी त्यांची मानसकन्या सौ. हर्षदा जोशी यांनी तितक्याच निष्ठेने त्यांचा आकस्मिक देहान्त झाल्यानंतर ग्रंथाचे कार्य अत्यंत उत्तमरीत्या पूर्ण केले आहे.

अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वाचक अशा सर्वांना अर्थ आणि विवेचनासह दासबोध समजावून देणारा 'ग्रंथराज दासबोध' हा ग्रंथ मोलाचा आहे.

समर्थ भक्तीतून सुनील चिंचोलकरांनी समर्थांची शिकवण लोकांपर्यंत जावी यासाठी विविध प्रकारची ग्रंथरचना सोप्या मराठीत केली. ते ग्रंथ आणि अन्य पुस्तके (एकूण ३२) अशी :-

  • आजच्या संदर्भात दासबोध
  • कल्याणा, छाटी उडाली
  • आद्यतम क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके
  • ग्रंथराज दासबोध खंड १
  • दहा संत चरित्रे
  • दासबोधाचे मानसशास्त्र
  • दासबोधाच्या पहिल्या तीन दशकांवर अभ्यासपूर्ण विवेचन-मार्गदर्शन असलेला बृहद्‌ग्रंथ (५१८+१४ पृष्ठे, काॅन्टिनेन्टल प्रकाशन). (पुढील खंडाचे लेखन श्रीमती हर्षदा प्रशांत जोशी करत आहेत.)
  • दासबोधातील कर्मयोग : दासबोध विवरण भाग १ ते ५
  • दासबोधातील भक्तियोग
  • दासबोधातील ज्ञानयोग
  • दैनंदिन जीवनात दासबोध
  • मनाच्या श्‍लोकातून मनःशांती
  • मला दासबोधीच लाभेल बोध
  • पत्रांतून व्यक्त झालेले विवेकानंद
  • पत्रे समर्थांची
  • परिव्राजक विवेकानंद
  • मंत्र यशाचा
  • मानवतेचा महापुजारी : स्वामी विवेकानंद
  • विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (पुस्तक आणि ऑडिओ बुक)
  • वेणा पावली पूर्णविराम
  • शिवाजी आणि रामदास
  • शिष्य समर्थांचे
  • सज्जनगडचा इतिहास
  • सदगुरू आणि सद्‌शिष्य
  • समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद
  • श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन
  • श्री समर्थ कथा सुगंध (हे पुस्तक मोफत मिळते!)
  • समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
  • संस्कारांचे मोती
  • साधक की अंतर्यात्रा (हिंदी)
  • सार्थ श्रीदासबोध
  • Stories Of Samarth Ramdas (इंग्रजी)