गर्भधारणा व गर्भबाहुल्य
अंड (स्त्री-प्रजोत्पादक पेशी) आणि शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी) यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. विविध प्राण्यांमध्ये गर्भधारणेचा काळ वेगवेगळा असतो. मानवामध्ये तो २९० दिवसांच्या आसपास असतो. कधीकधी एकाच वेळी एकापेक्षा अधिक गर्भ तयार होऊ शकतात. त्या प्रकाराला ‘गर्भबाहुल्य’ असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत मानवी गर्भधारणेचे आणि गर्भबाहुल्याचे वर्णन केले आहे. इतर प्राण्यांतील गर्भधारणेचे वर्णन भ्रूणविज्ञान नोंदीत केलेले आहे. अंडज प्राण्यांच्या गर्भधारणेचे वर्णन अंडे या नोंदीत केलेले आहे
प्रत्येक ऋतुचक्राच्या (एका मासिक पाळीपासून पुढच्या मासिक पाळीपर्यंतच्या काळाच्या) मध्यकाळी अंडाशयातून एक अंड बाहेर पडते व ते अंडवाहिनीमार्गे गर्भाशयाकडे जात असताना त्या वाहिनीच्या पार्श्वटोकापाशीच त्याची व शुक्राणूची गाठ पडून त्या दोघांच्या केंद्रकांचा (पेशींतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजांचा) संयोग झाला म्हणजे ‘गर्भधारणा’ अथवा ‘निषेचन’ (फलन) झाले असे म्हणतात. हा संयोग होताना अंड आणि शुक्राणूमध्ये अनेक भौतिक व रासायनिक बदल घडून येतात. शुक्राणूच्या संयोगामुळे अंडाच्या पुढील वाढीला प्रेरणा मिळते. अंडाच्या बाह्य स्तरातील कणीय (कणयुक्त) आणि पुटिका (सूक्ष्म पिशवीसारख्या भागातील) द्रव्याची हालचाल सुरू होऊन त्याच्या विद्युत्विसरण (एकमेकांत मिसळणे) आणि श्यानता (दाटपणा) या गुणधर्मांत बदल होऊन तेथे अनेक एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) तयार होतात.
अंडाचा स्पर्श होताच शुक्राणूच्या डोक्यावरील अग्रपिंडाचे (एक प्रकारच्या उंचवट्याचे) विघटन होऊन त्याचे तंतूत रूपांतर होते व तो तंतू अंडाच्या बाह्यस्तराचा भेद करून अंडात शिरतो. जेथे शुक्राणू अंडात प्रवेश करतो तेथे उंचवटा निर्माण होऊन शुक्राणूचा अग्रपिंड अंडात शिरतो. शुक्राणूचा उर्वरित मध्य आणि पुच्छ भाग अपकृष्ट (ऱ्हास) होऊन त्यांचे अभिशोषण होते.
शुक्राणू व अंडाणू यांच्या केंद्रकांचा संयोग होऊन त्या दोघांचेही गुण गर्भात उतरतात. तेच आनुवंशिक गुणधर्म होत.
प्रत्येक प्राण्याच्या कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) विशिष्ट संख्या असलेली गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात. मानवी कोशिकांमध्ये त्यांची संख्या ४६ असते. यांपैकी ४४ सामान्य व दोन लिंग लक्षणे असलेली गुणसूत्रे असतात. पुरुषामध्ये दोन लिंग गुणसूत्रांपैकी एक X प्रकारचे व दुसरे Y प्रकारचे (X पेक्षा आकारमानाने लहान असलेले) गुणसूत्र असते. स्त्रीमध्ये दोन्ही लिंग गुणसूत्रे X प्रकारचीच असतात.
अंड आणि शुक्राणू यांचा विकास होत असताना एकूण गुणसूत्रांची संख्या निम्मी होते [→ भ्रूणविज्ञान]. म्हणजे प्रत्यक्ष गर्भधारणेच्या वेळी अंड आणि शुक्राणूमध्ये तेवीसच गुणसूत्रे असतात. त्यांपैकी अंडाच्या गुणसूत्रांमध्ये २२ साधारण (सामान्य) गुणसूत्रे आणि एक X गुणसूत्र असते. शुक्राणूच्या गुणसूत्रांमध्ये २२ सामान्य व एक Y किंवा २२ सामान्य व एक X अशी मिळून २३ गुणसूत्रे असतात.