भूदृश्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणताही भूभाग संपूर्णतया एकसुरी नसतो, वेगवेगळ्या अधिवासांनी बनलेला असतो. अशा अधिवासांच्या साधारण हेक्टर अथवा जास्त क्षेत्रफळाच्या तुकड्यांना भूदृश्य म्हटले जाते.

भूदृश्यांचे प्रकार[संपादन]

गेल्या तीस वर्षात परिसर विज्ञानाची एक उपशाखा भूदृश्य विज्ञान –लॅन्डस्केप इकॉलाॅजी-विकसित झाली आहे. [१]कोणताही भूप्रदेश हा वेग-वेगळ्या प्रकारच्या भूदृश्यांची व जलदृश्यांची एक गोधडीच असते. उदाहरणार्थ, गडचिरोली जिल्ह्यातल्या वनप्रदेशात दाट जंगले, झाडोरा, शेतीची खाचरे, गावठाणे, रस्ते, ओढे, तळी यांच्या तुकड्या तुकड्यांनी पूर्ण प्रदेश साकारतो, तर कोंकण किनाऱ्यावर समुद्र, खाड्या, खडकाळ किनारा, वाळवंटे, खाजण, शेते, भाताची खाचरे, नारळ-पोपळीच्या बागा, आमराया यांचे तुकडे तुकडे एकास एक जुळलेले दिसतील. शास्त्रीय उपयोग पद्धतीप्रमाणे ओढे, तळी, समुद्र, खाड्या हे जलभागाचे वेगवेगळे प्रकार व भातखाचरे, माळराने, आमराया, लोकवस्त्या हे भूदृश्यांचे वेगवेगळे प्रकार समजले जातात.  या प्रत्येक प्रकाराचे अनेक तुकडे तुकडे असतील. उदा. सलग नारळ-पोफळींच्या बागा असलेले अनेक तुकडे, भातखाचरांच्या, माळरानांच्या तुकड्यांसमवेत विखुरलेले असतील किंवा नद्या-ओढे-तलाव वेगवेगळ्या जागी आढळतील. या एकेक तुकड्याला त्या त्या प्रकारच्या भूदृश्याचा अथवा जलदृश्याचा अंश अशी संज्ञा वापरतात. जसे तळ्यांनी व्यापलेल्या भंडारा जिल्ह्यात एखाद्या अभ्यास क्षेत्रात तळे या प्रकारच्या जलभागाचे १५-२० वेगवेगळे अंश असतील, किंवा एखाद्या शहरात दाट लोकवस्ती, विरळ लोकवस्ती, मैदाने या तीन प्रकारच्या भूभागांचे अनेक अंश असतील.

विचारात घेण्यास सोईस्कर असे भूभाग व जलभाग[संपादन]

  1. गवताळ रान : मुख्यत: गवताचे आच्छादन असलेला भूभाग
  2. झुडपी माळरान : विखुरलेली झुडपी असलेले रान
  3. झाडोरे माळरान : विखुरलेली झाडे असलेले रान
  4. झाड-झाडोरा : दाट झुडपे व थोडी झाडे असलेले रान
  5. जंगल : दाट झाडी असलेले रान
  6. शेती : हंगामी पिके पिकणारी जमीन
  7. बागायत : फळबागा (आंबा, संत्रे) अथवा रोपवने (सागवन, कॅशुरीना, निलगिरी)
  8. खडकाळ भूमी : उघडा-बोडका खडकाळ प्रदेश.
  9. दाट लोकवस्तीचा भाग
  10. विरळ लोकवस्तीचा भाग
  11. ओढे, नद्या
  12. कालवे
  13. नैसर्गिक तळी
  14. मनुष्यनिर्मित तलाव, धरणे
  15. खाड्या
  16. दलदलीचा प्रदेश
  17. समुद्र
  18. भूजल
  19. चिखलाट समुद्र किनारा
  20. वालुकायुक्त समुद्र किनारा
  21. खडकाळ समुद्र किनारा
  22. बाजारपेठ
  23. गुदामे
  24. कारखाने
  25. जैवविविधतेचे खास साठे, उदा. प्राणिसंग्रहालये, उद्याने
  26. पशुउत्पादक भूमी उदा : डेअऱ्या, पोल्ट्र्‌या.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "निसर्ग नियोजन- लोक सहभागाने". विकासपीडिया. १ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.