Jump to content

भास्कर पांडुरंग कर्णिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर पांडुरंग कर्णिक (७ डिसेंबर, इ.स. १९१३: करूळ, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - मृत्यू:३१ जानेवारी, इ.स. १९४३:पुणे, महाराष्ट्र) हे भारतीय क्रांतिकारक होते.

शिक्षण

[संपादन]

त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी, तर माध्यमिक शिक्षण गुलबर्गा येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. केले आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.

अर्धा ट्रक बॉम्ब

[संपादन]

देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. अश्या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते. या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.

फरासखान्यात मृत्यू

[संपादन]

कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले याचा पोलिसांनी शोध घेतला, आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. आणल्यानंतर कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली. त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे कर्णिकांकडून मोठी माहिती मिळेल असे वाटणाऱ्या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.