Jump to content

ठाणे मध्यवर्ती तुरुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठाणे शहरातील मध्यवर्ती तुरुंग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ठाणे शहरातील ज्या मध्यवर्ती भागात तुरुंग आहे तो पूर्वी किल्ला होता. तो पोर्तुगीजांनी १७३० मध्ये बांधला. २८ डिसेंबर १७४४ रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच त्याचे रूपांतर तुरुंगात केले. ठाण्याच्या या जेलमध्ये कैदी ठेवण्याची क्षमता १ हजार १०५ एवढी असताना प्रत्यक्षात दुपटीहून अधिक कैदी येथे असतात.

स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

[संपादन]

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या किल्ल्यामध्ये अनेकांना ठेवण्यात आले होते. त्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, दत्ताजी ताम्हणे, साने गुरुजी आदींचा समावेश आहे. चापेकर बंधू, महादेव रानडे, जॅक्सनचा वध केलेले अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना याच तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. तुरुंगाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान लक्षात घेऊन, या तुरुंगात दरवर्षी १७ एप्रिल हा दिवस हुतात्मा दिन म्हणून आवर्जून पाळण्यात येतो.

कैदी करत असलेली कामे

[संपादन]

तुरुंगातील कैद्यांना सुतारकाम, विणकाम, कलात्मक वस्तू बनविणे, बेकरी, लॉण्ड्री आदी कामे सांगण्यात येतात. त्याचा मोबदलाही त्यांना मिळतो. कुशल, अकुशल व मेहनतीची कामे अशा तीन प्रकारांत श्रमाची विभागणी केली असून कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तू विकण्यासाठी जेलजवळच शोरूमही बनविण्यात आले आहे.

खुल्या कारागृहाचा दर्जा

[संपादन]

ठाणे तुरुंगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४.२६ एकरचे क्षेत्र खुल्या कारागृहासाठी वापरले जाणार आहे. तसे झाल्यास, काही कैद्यांकडून शेतीही करून घेण्यात येईल.