मराठी ट्विटर संमेलन
'मराठी ट्विटर संमेलन' हा ट्विटररवरील [१] मराठी समुदायाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची कल्पना सर्वप्रथम मराठी वर्ड [२] या मराठी भाषेतील जुने शब्द वापरात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या ट्विटर हॅंडलने जाहीर केली.
ट्विटरवर एखाद्या भाषेच्या होणाऱ्या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्यात आले. कविता, कथा, ब्लॉग, बोलीभाषा, पुस्तक परिचय, लेखक परिचय, सध्याचे वाचन, कविवर्य मंगेश पाडगावकर, विश्वकोश, मराठी भाषेला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड या विषयांवर चर्चा घडवण्याचे या संमेलनाचे ध्येय आहे. [३] त्यादृष्टीने या संमेलनामध्ये #ट्विटरसंमेलन या मुख्य हॅशटॅगसहित #माझीकविता, #माझेविचार, #माझीकथा, #माझीबोलीभाषा, #माझाब्लॉग, #साहित्यसंमेलन, #पुस्तकपरिचय, #लेखकपरिचय, #सध्यावाचतोय असे आणखी १२ हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. [४] या मराठी ट्विटर संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. [५] [६] त्याचप्रमाणे याच कालावधीत पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर संमेलनाचा उल्लेख करून या संमेलनाची स्तुती केली. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थितांना ट्विटर संमेलनाच्या १२ हॅशटॅगची माहितीसुद्धा दिली.