Jump to content

मीनप्पा व्यंकटेश केलवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीनप्पा व्यंकप्पा केलवाड ऊर्फ गोविंदशर्मा (जन्म : कृष्णापूर-हैदराबाद, इ.स. १८६३; - हैदराबाद, इ.स. १९२०) हे एक मराठी संगीतज्ञ व आद्य संगीत लिपिकार होते. ते मूळचे रायचूरजवळच्या कनगिरीचे. मीनप्पांनी संगीत लेखन पद्धतीला आधुनिक वळण दिले. त्यांचे शिक्षण बडोद्याला झाले. योगीश्वर वामनबुवांकडून त्यांनी माणसाचे मस्तक तपासून त्याची योग्य लक्षणे जाणण्याची विद्या आत्मसात केली. आजोबा व गुरू यांचे संगीतप्रेमही मीनप्पांमध्ये उतरले. बडोद्याचे गायक-वादक मौलाबक्ष धिस्सेरखॉंकडे ते प्रथम गायन व आवाज बिघडल्यानंतर वादन शिकले.

म्हैसूर महाराजांच्या संगीत कचेरीचे ते निमंत्रित सल्लागार होते. त्यांनी अनेक वर्षे लिहिलेली रोजनिशी खूप उद्‌बोधक आहे. तिच्यात मौलाबक्षांनी मीनप्पांच्या संगीतलिपीवरून स्फूर्ती घेतली होती असा उल्लेख आहे.

मीनप्पांच्या हस्ताक्षरात अनेक पुस्तके आहेत, पण त्यांपैकी इ.स. १९०७ साली प्रकाशित झालेले ’गांधर्वोपनिषद्‌-भाग १ : मूलाधार’ हे एकच पुस्तक छापले गेले. त्या पुस्तकात गायनाचार्यमाला हा संगीतज्ञांच्या रेखाचित्रांचा समूहही घातला होता. ’मूलाधार’चे मुख्य महत्त्व म्हणजे त्यातील स्वर-ताल-लय बारकाईने दाखवणारी संगीत लिपी होय. ही संगीतलिपी काटेकोर असून तिच्या क्लिष्टतेमुळे मागे पडली.