लालजी देसाई
लालजी देसाई {इ.स. १९२६ - १३ जानेवारी, इ.स. २००९) हे मराठी गायक होते.
लालजींचे खरे नाव वासुदेव होते. बालगंधर्वांची गायकी गाणारे लालजी अशी त्यांची ओळख होती. शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नसतानाही लालजींनी बालगंधर्वांची पदे ऐकून आत्मसात केली होती. बालगंधर्वांना दैवत मानणारे लालजी यांनी मराठी संगीत रंगभूमीवरही गंधर्व गायक म्हणून नावलौकिक मिळवला होता.
आपल्या जोहार मायबाप या प्रसिद्ध गाण्याचेच नाव त्यांनी आपल्या आत्मचरित्राला दिले. आरवलीचा वेतोबा हे त्यांचे देवस्थान आणि श्रद्धास्थान होते. त्यांच्या आत्मचरित्रात त्या देवतेचा उल्लेख वारंवार येतो.
पुलंचा लालजींच्या संदर्भातला एक किस्सा
[संपादन]'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग चालू होता. लालजी देसाई त्यांचे नाटकातील काम संपवून घाईघाईने घरी जायला निघाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न होते. विंगेत उभे असलेल्या पु.ल.देशपांडे यांनी अंधारातच लालजींचा हात पकडला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, "उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे"...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दूरदर्शनवर मुलाखती
[संपादन]लालजी देसाई यांच्या दूरचित्रवाणीवर अनेक मुलाखती झाल्या. त्यांतील एका मुलाखतीत ते प्रांजळपणे सांगून मोकळे झाले की, 'मी कुणाकडे गाणं शिकलो नाही. आवाज सांभाळण्यासाठी कुठली पथ्येही मी पाळत नाही. सतत रियाझही नाही. एकच करतो ते म्हणजे फक्त माझ्या दैवताचं म्हणजे बालगंधर्वांचं पूजन'.
नाट्यकारकीर्द
[संपादन]वाऱ्यावरची वरात नाटकाच्या आधी दुसऱ्या नाटकात काम करण्यासाठी पु.ल. देशपांडे यांनी लालजींना बोलावले होते. आपण गाणं चांगलं गाऊ पण अभिनय म्हणजे महाकठीण, असे लालजींना वाटत होते. तरी पुलंच्या आग्रहाखातर हे तिथे गेले आणि तिथे गेल्यावर विजया मेहता, अरविंद देशपांडे यांच्यासारखे दिग्गज पाहिल्यावर लालजींची इतकी भंबेरी उडली की ते तालीम सोडून घरी पळून आले.
लालजी देसाई यांची भूमिका असलेली नाटके
[संपादन]- वाऱ्यावरची वरात
लालजी यांनी गायलेली नाट्यगीते
[संपादन]- कांते फार तुला
- जोहार मायबाप जोहार
- दे मज देवा जन्म हा
- धावत येई सख्या यदुराया