एम. हिरियण्णा
एम. हिरियण्णा उर्फ म्हैसूर हिरियण्णा (७ मे, इ.स. १८७१, बर्गेपल्ली, कर्नाटक[१] - १९ सप्टेंबर, इ.स. १९५० म्हैसूर, कर्नाटक) हे स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृतचे प्राध्यापक, भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. ते दृढ अद्वैती मताचे होते. सुसंस्कृत स्वभाववाद कल्पनेचा विकास करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते होते.[२]) 'वर्तमानकाल' या भारतीय परिकल्पनेचा विशेषत्वाने अभ्यास करून पाश्चात्य तत्त्ववेत्ते आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड यांच्या 'वर्तमानकाल' या कल्पनेशी त्यांनी तुलना केली. भारतीय तत्त्वज्ञानातील सुखवाद सिद्धांताचाही असाच विशेष अभ्यास करून त्यात भर टाकणारे ते एकमेव अभ्यासक असावेत.[२])
आऊटलाईन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी आणि एसेन्शिअल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी हे त्यांचे दोन प्रमुख ग्रंथ आहेत. इंडियन फिलॉसॉफी ऑफ व्हॅल्यूज हा ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या आकस्मिक निधनामुळे होउ शकले नाही. या ग्रंथातील काही भाग त्यांच्या विद्यार्थ्यांनी आर्ट एक्सपीरियन्स, द क्वेस्ट आफ्टर परफेक्शन, इंडियन फिलॉसॉफीकल स्टडीज: भाग १ व भाग २ आणि आणि स्टडीज इन संस्कृत या शीर्षकांखाली प्रसिद्ध केले आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानाचे इतिहास लेखक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांचे खंड प्रकाशित झाल्यानंतर प्रोफेसर हिरियण्णा यांची पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या पुस्तकांनी स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम ठेवले आहे. या ग्रंथातून भारतीय दर्शनांवरील ग्रंथांचा अधिक मौलिक परिचय व मूलगामी दृष्टिही दिसून येतात, हीच त्यांच्या थोरवीची पुरेशी ग्वाही आहे. असे मत त्यांच्या ग्रंथांचे अभ्यासक जी. हनुमंत राव व्यक्त करतात.[३])
पणतीने रेखाटलेले चरित्रचित्र
[संपादन]आरती राव या प्रोफेसर एम. हिरियण्णा यांच्या नात असून त्यांनी हिरियण्णा यांच्याविषयी एके ठिकाणी[१] लेखन केले आहे. हे लेखन त्यांनी ०४ जुलै २०११ रोजी केले आहे. त्यात हिरियण्णा यांचे शब्दचित्र त्या रेखाटतात :
- "माझे पणजोबा प्रोफेसर एम. हिरियण्णा हे मोठे तत्त्ववेत्ते म्हणून म्हैसूर (तत्कालिन कर्नाटकातील खूप मोठा भाग असलेल्या) प्रांतात अतिशय सुप्रसिद्ध होते.ते प्रोफेसर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निकटचे मित्र आणि सहकारी होते. ते (माझे पणजोबा) संस्कृतचे प्रोफेसर होते तर राधाकृष्णन तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते. दोघेही म्हैसूर विद्यापीठात होते. आमचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील बर्गेपल्ली या छोट्या खेड्यातले. ‘एक अतिशय सुसंस्कृत, सभ्य आणि नम्र घराणे म्हणून ते पंचक्रोशीत नावाजलेले होते.”
- हिरियण्णा १९१० च्या दरम्यान बर्गेपल्लीहून म्हैसूरला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले आणि ते तेथेच स्थायिक झाले. तेथे त्यांनी एक मोठे घर बांधले. ते अनेक पिढ्यांचे प्रेरणास्थान बनले. ते त्याच्या हयातीतच एक दंतकथा बनून राहिले.’प्रत्यक्षाहून प्रतिमा थोर’ ही त्यांच्या बाबतीत सत्यकथा होती, असे सांगतात. एक तत्त्वनिष्ठ माणूस. १०० टक्के स्वतःला त्यांनी घडविले होते. त्यांनी बांधलेल्या घरात: ९६२ लक्ष्मीपूरम येथे आजही आम्ही राहातो. आमचे कुटुंब आणि आमचे घर नात्यागोत्यात आणि मित्रमंडळीत केवळ ‘९६२’ या नावाने प्रसिद्ध आहे.
हिरियण्णा यांचे सहकारी प्राध्यापक एन. शिवराम शास्त्री यांनी सांगितलेली आठवण आरती राव नमूद करतात. त्या पुढे लिहितात, -
- "एन. शिवराम शास्त्री म्हणतात," प्रोफेसर हिरियण्णा हे अत्यंत नेटके आणि शिस्तबद्ध आयुष्य जगले. त्यांच्यामुळे मला नेहमी ‘कान्ट’ची आणि ‘तत्त्ववेत्याच्या येरझाऱ्या"ची आठवण होते. ते जणूकाही साधुच होते. त्यांचा पोशाख अतिशय साधा, नेटका, स्वच्छ असे. ते अतिशय तत्पर आणि अचूक राहात. आलेल्या पत्रांना वेळेत उत्तरे देत, दिलेला शव्द पाळीत आणि जो शब्द पाळणे शक्य नसे तो कधीही ते देत नसत. त्यांची प्रत्येक कृती अतिशय प्रमाणबद्ध आणि परिपूर्ण असे. साधी पेन्सिल टोकदार बनविणे ते प्रत्यक्ष लेखन करणे – हे अतिशय आखीवरेखीव असे."
ग्रंथलेखन
[संपादन]- Outlines of Indian Philosophy (येथे मोफत उपलब्ध)
- The Essentials of Indian Philosophy (येथे मोफत उपलब्ध)
- The Quest After Perfection (मोफत उपलब्ध)
- Indian philosophical studies
- Popular essays in Indian philosophy
- The mission of philosophy
- The Twofold way of life
- The Ethics of the Upaniṣads
- Indian aesthetics
- The Main aspects of Indian aesthetics
- Indian conception of values
- Reviews
- Art Experience
- Sanskrit Studies
- Tales From Sanskrit Dramatists
मराठी भाषांतर
[संपादन]हिरियण्णा यांच्या सर्व पुस्तकांपैकी 'आऊटलाईन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी' या ग्रंथाचे मराठी भाषांतर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. भा.ग. केतकर यांनी "भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा" या नावाने केले आहे. पुणे विद्यापीठाने हा ग्रंथ जानेवारी १९७३ मध्ये प्रसिद्ध केला. या भाषांतरामुळे भारतीय तत्त्वज्ञानाबाद्द्लचा एक वेगळा दृष्टीकोन मराठीत आला आणि या ग्रंथामुळे मराठी सारस्वतात भर पडली आहे. पहिल्या आवृत्तीनंतर या पुस्तकाचे मुद्रण न झाल्याने हे पुस्तक आता दुर्मिळ झाले आहे.[४]
बाह्यदुवे
[संपादन]- हिरियण्णा यांचे छायाचित्र Archived 2016-04-22 at the Wayback Machine.
- Mysore Hiriyanna
- पुस्तके उपलब्ध महाजालस्थळ
संदर्भ
[संपादन]- ^ a b http://www.indianmemoryproject.com/tag/prof-m-hiriyanna/
- ^ a b जी. हनुमंत राव, "हिरियण्णा, एम.", खंड ३, पान ३०९, मराठी तत्त्वज्ञान महाकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, प्रकाशन काळ १९७४, प्रमुख संपादक प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर
- ^ जी. हनुमंत राव, हिरीयण्णा, एम. खंड ३, पान ३०९, मराठी तत्त्वज्ञान महाकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, प्रकाशन काळ १९७४ प्रमुख संपादक प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर
- ^ प्रोफेसर एम. हिरीयण्णा , भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा, (Outlines of Indian Philosophy), अनुवाद : प्रा. भा. ग. केतकर,(मूळ प्रकाशक : जॉर्ज, ॲलन अँड अनविन, लंडन) प्रकाशक : पां. स. सावंत, कुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७, मुद्रक : ग. ज. अभ्यंकर, उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७, मुद्रणस्थळ : पुणे विद्यापीठ मुद्रणालय, गणेशखिंड, पुणे ४११००७, प्रथमावृत्ती : जानेवारी १९७३, प्रती: अकराशे, मूल्य: बावीस रुपये,सर्व हक्क : पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७