राजाराम शिंदे
राजाराम शिंदे (५ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - ) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्यअभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले. ’मंदार’ नावाच्या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.
निराधार विद्यार्थी संघटना, गरजू गिरणी कामगार संघटना, नाट्यमंदार नावाची नाट्यसंस्था वगैरे निर्माण करणारे राजाराम शिंदे हे राजाराम शिंदे कनिष्ठ महाविद्यालय नावाच्या शिक्षण संस्थेचे संस्थापक-संचालकआहेत.
राजाराम शिंदे यांनी ’दोन कोटीचा माणूस’ या नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे.
संस्था स्थापना
[संपादन]- राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. (४ एप्रिल १९६५)
- रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी ’रंगभूमी सहकारी गृहनिर्माण संस्था व ’रंगदेवता सहकारी पतसंस्था निर्माण केल्या
- चित्रमंदार ही चित्रपट निर्मिती संस्था (इ.स. २०१२)
राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य
[संपादन]- १९७८मध्ये राजाराम शिंदे हे चिपळूण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा २०-कलमी कार्यक्रम, रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे राबवला होता.
- चिपळूण तालुक्यासाठी त्यांनी मुंबईत ’ग्राम सुधारणा केंद्र’ ही संघटना स्थापन केली.
- नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या.
- राजाराम शिंदे हे महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर अनेक वर्षे सदस्य होते.
- मराठी रंगभूमीबरोबरच देशातील सर्व भाषांच्या रंगभूमींच्या संशोधनासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा ’यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल आणि रंगभूमी संशोधन केंद्र’ हा प्रकल्प उभारला आहे.
रामाराम शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- कांचनगंगा (नाटक)
- दोन कोटीचा माणूस (आत्मचरित्र)
राजाराम शिंदे यांनी रंगभूमीवर आणलेली विविध नाटककारांची नाटके
[संपादन]- अग्निदिव्य
- कधी घरी, कधी शेजारी
- घनश्याम नयनी आला
- चांदणे शिंपीत जा
- झोपा आता गुपचूप
- फुलाला सुगंध मातीचा
- भोवरा
- मंदारमाला
- मेघमल्हार
- वरचा मजला रिकामा
- सागरा प्राण तळमळला
- सौजन्याची ऐशी तैशी
- ही श्रींची इच्छा
सन्मान
[संपादन]- राजाराम शिंदे यांच्या विसाहून अधिक वर्षांच्या नाट्यअभिनयाच्या कारकिर्दीसाठी आणि रंगकर्मींसाठी केलेल्या संस्थाकीय कार्यासाठी, त्यांना सांगली येथे भरलेल्या ६९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.
- रवींद्र पिंगे यांनी ’राजाराम शिंदे माणूस मोठा जिद्दीचा’ या नावाचे शिंद्यांचे चरित्र लिहिले आहे.