प्रभाकर पणशीकर
जन्म |
प्रभाकर विष्णू पणशीकर मार्च १४, इ.स. १९३१ मुंबई, महाराष्ट्र |
---|---|
मृत्यू |
जानेवारी १३, इ.स. २०११ पुणे, महाराष्ट्र |
इतर नावे | पंत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाट्य अभिनेता, दिग्दर्शन, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९५५ - इ.स. १९९५ |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख नाटके | तो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, बेईमान |
पुरस्कार |
संगीत नाटक अकादमी पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार जागतिक मराठी परिषद पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार |
वडील | गोपाळराव(विष्णूशास्त्री) पेंढारकर |
आई | राधाबाई गोपाळराव पेंढारकर |
पत्नी | विजया कुलकर्णी |
अपत्ये | जान्हवी पणशीकर, रघुनंदन पणशीकर |
प्रभाकर पणशीकर तथा पंत (मार्च १४, इ.स. १९३१; मुंबई, महाराष्ट्र - जानेवारी १३, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले.
प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.
जन्म आणि सुरुवातीचा काळ
[संपादन]पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णूशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते.
लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च इ.स. १९५५ ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
तो मी नव्हेच
[संपादन]इ.स. १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली.
नाट्यसंपदा
[संपादन]पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.
मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषतः ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स. १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले.
‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अश्रुंची झाली फुले’, ’कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला.
प्रभाकर पणशीकरांची भूमिका असलेली नाटके
[संपादन]- अश्रूची झाली फुले
- इथे ओशळला मृत्यू
- जेव्हा गवताला भाले फुटतात
- तो मी नव्हेच
- थॅंक यू मिस्टर ग्लाड
- भटाला दिली ओसरी
- विचित्रलीला
पणशीकरांची प्रमुख नाट्यनिर्मिती
[संपादन]- अंधार माझा सोबती
- अश्रूची झाली फुले
- संगीत कट्यार काळजात घुसली
- किमयागार
- संत तुकाराम
- पुत्रकामेष्टी
- संगीत मदनाची मंजिरी
- संगीत सुवर्णतुला
मानसन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- आचार्य अत्रे पुरस्कार
- उत्तुंग पुरस्कार
- कलाश्री पुरस्कार
- डॉ. काशीनाथ घाणेकर स्मृति पुरस्कार
- नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार
- जागतिक मराठी परिषद पुरस्कार
- नटवर्य दत्ताराम पुरस्कार
- दीनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार
- नवरत्न पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार
- नाट्य दर्पण- वर्षाचा मानकरी
- नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृति पुरस्कार
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार
- महाराष्ट्रभूषण पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार. नंतर ह्या पुरस्काराचे 'प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले.
- नटसम्राट बालगंधर्व स्मृति पुरस्कार
- रत्नप्पा कुंभार पुरस्कार
- विष्णूदास भावे सुवर्ण पदक
- राजेश्री शाहू सुवर्ण पदक
अधिक वाचन
[संपादन]- तो मी नव्हेच लेखक - प्र.के.अत्रे.)
- तोच मी (लेखक - पभाकर पणशीकर).
- आठवणीतील मोती (लेखक - प्रभाकर पणशीकर)
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |