मुंबई मोनोरेल
मुंबई मोनोरेल | |
---|---|
स्थान | मुंबई |
वाहतूक प्रकार | जलद परिवहन |
मार्ग | २ |
मार्ग लांबी | २०.२१ कि.मी. |
एकुण स्थानके | १८ |
सेवेस आरंभ | ४ फेब्रुवारी २०१४ (पहिला टप्पा), ४ मार्च २०१९ (दुसरा टप्पा) |
मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) ही मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेली एक मोनोरेल प्रणाली आहे. ४ फेब्रुवारी २०१४ पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) ह्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरुवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा २०.२१ किमी लांबीचा संपूर्ण पहिला मार्ग मार्च २०१९ मध्ये पूर्ण झाला.
इतिहास
[संपादन]विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मध्ये भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली बांधण्याची परवानगी १३ ऑगस्ट, २००८ रोजी दिली.[ संदर्भ हवा ] बॉंबार्डिअर ट्रान्स्पोर्टेशन, रिलायन्स एनर्जी व हिताची मोनोरेल यांच्या आणि लार्सन अँड टूब्रो व मलेशियातील स्कोमी रेल यांच्या दोन संघांतून ११ नोव्हेंबर, २००८ रोजी लार्सन अँड टूब्रो व स्कोमी रेल या संघाला २०२९ पर्यंत मोनोरेल बांधण्याचे व चालवण्याचे २४६० कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले. मुंबई मोनोरेलचे बांधकाम तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण ह्यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू झाले. २६ जानेवारी २०१० रोजी १०८ मी.च्या मार्गावर परीक्षा-चलन पार पडले.
मार्ग
[संपादन]मुंबई मोनोरेलचा मार्ग मुंबईच्या पूर्व भागातील चेंबूर उपनगरापासून दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यत आखण्यात आला आहे. चेंबूरमधील मोनोरेलचे टर्मिनस स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या जवळ स्थित आहे ज्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलणे सुलभ होते. २०.२१ किमी लांबीचा हा मार्ग संपूर्णपणे उंचीवर असून प्रवाशांच्या सोईसाठी सरकते जिने व लिफ्टची सोय करण्यात आली आहे.
मार्ग | |||
---|---|---|---|
# | स्थानक नाव | उद्घाटन | जोडमार्ग |
१ | चेंबूर मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | चेंबूर रेल्वे स्थानक (हार्बर मार्ग) |
२ | व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
३ | फर्टीलाइझर टाउनशिप मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
४ | भारत पेट्रोलियम मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
५ | मैसूर कॉलनी मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
६ | भक्ती पार्क मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
७ | वडाळा डेपो मोनोरेल स्थानक | २ फेब्रुवारी २०१४ | नाही |
८ | गुरू तेग बहादुर नगर मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | गुरू तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक (हार्बर मार्ग) |
९ | अँटॉप हिल मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
१० | आचार्य अत्रे नगर मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
११ | वडाळा ब्रिज मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | वडाळा रोड रेल्वे स्थानक (हार्बर मार्ग) |
१२ | दादर (पूर्व) मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
१३ | नायगाव मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
१४ | आंबेडकर नगर मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
१५ | मिंट कॉलनी मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |
१६ | लोअर परळ मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | लोअर परळ रेल्वे स्थानक (पश्चिम मार्ग) |
१७ | संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक | ४ मार्च २०१९ | नाही |