विदिशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विदीशा या पानावरून पुनर्निर्देशित)

विदिशा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर विदिशा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

हेलिओडोरसचा स्तंभ[संपादन]

विदिशा हे सांचीपासून ९ किलोमीटरवर व भोपाळपासून ५४ किलोमीटरवर आहे. या गावात इंडो-ग्रीक राजा अ‍ॅन्टिअल्किडास याचा राजदूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे. हेलिओडोरस हा शुंग राजा भागभद्र याच्या दरबारात होता. तो विष्णूभक्त होता असे समजले जाते. भारतात मंदिर स्थापत्य हे गुप्त काळापासून म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून पाहायला मिळते. परंतु या स्तंभावर असलेल्या उल्लेखानुसार इ.स.पूर्व पहिल्या शतकातदेखील इथे विष्णूमंदिर होते असे सिद्ध होते. या स्तंभाला इथले लोक खंबाबाबा असे म्हणतात.

उदयगिरी लेण्या[संपादन]

विदिशाहून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी उदयगिरी लेणी आहेत. त्या गुंफांत असलेली शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इसवी सनाच्या पाचव्या शतकात, गुप्‍तकाळात या गुंफा खोदल्या गेल्या. इथे असलेले भूवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे. भूदेवीला पाताळातून बाहेर आणणारा हा विष्णूचा वराह अवतार इथे अतिशय ठसठशीतपणे आणि रेखीव असा कोरलेला आहे. डावा पाय किंचित दुमडून शेषावर ठेवलेला आणि उजवा पाय ताठ असलेल्या अशा आसनात हा वराह उभा असून डाव्या खांद्यावर भूदेवी दिसते. पाठीमागील भिंतीवर या वराहाचे अभिवादन करणाऱ्या विविध देवदेवता कोरलेल्या आहेत.

या गुंफांजवळच गुप्‍त सम्राट दुसरा चंद्रगुप्‍त आणि कुमारगुप्‍त यांचे शिलालेख आहेत.