रेल्वे वाहतूक
रेल्वे वाहतूक हे प्रवासी व माल वाहतूकीचे एक माध्यम आहे. ही वाहतूक रेल्वे ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या रूळांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेतः सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी इंजिन. इंजिन कोळसा, डिझेल इत्यादी इंधने वापरून चालवले जाते तसेच विद्युतशक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे रस्ता वाहतूकीपेक्षा रेल्वे वाहतूकीमध्ये कमी घर्षण विरोध आढळतो.
जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतूकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात ग्रीसमध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये युरोपातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे. अठराव्या शतकात युनायटेड किंग्डममध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे औद्योगिक क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतूकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रूळांचा गेज (दोन रूळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मीमी) वापरला जावू लागला.
रेल्वे वाहतूकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. जपान) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. भारतात रेल्वेवाहतूकीची संपूर्ण मक्तेदारी भारतीय रेल्वे ह्या सरकारी कंपनीकडे आहे.
नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे आजच्या घडीला जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युतौर्जेवर चालतात. २००६ साली जगातील २५ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये द्रुतगतीने जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील शिंकान्सेन व जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस). ह्या द्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात.
हेही पाहा [संपादन]
- भारतातील रेल्वे वाहतूक (इंग्लिश विकिपीडिया)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |