मुद्रण
मुद्रण, अर्थात छपाई, (इंग्लिश: Printing, प्रिंटिंग ;) म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रति बनवण्याची प्रक्रिया होय. सहसा मुद्रण व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
छपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते. तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले. छपाई करण्यासाठी मजकूराचा एक साचा घडवला जात असे. या साच्याला शाई लावली जात असे. हा साचा कागदावर दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रति मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. तसेच चर्चने छपाईवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु हे शक्य झाले नाही व छपाईचे तंत्र सर्वदूर पसरत गेले.
तंत्र [संपादन]
- छपाई मध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावर शाईचा रुळ फिरवला जातो. रुळावरील शाई प्रतिमा ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने प्रतिमेला लागते. ही शाई लागलेली प्रतिमा कागदावर दाबली जाते. त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, स्क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलिफ छपाई म्हणतात. यात खिळे वापरून छपाई करणारे लेटर प्रेस आणि फ्लेक्सोग्राफी हे आता कालबाह्य झालेले प्रकार येतात.
- छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रिन द्वारे छपाई वगरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हंटले जाते.
- तिसऱ्या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्हयुअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात. छपाई एका विशिष्ट शाईचा वापर करून केलेली असते.
छपाईतील प्रतिमा,शाईचे असंख्य लहान लहान ठिपके अथवा बिंदु जवळ जवळ येऊन तयार होते. हे बिंदु किती दाट अथवा विरळ असतात त्यावर छपाईचा भडकपणा किंवा फिकेपणा ठरतो. उदाहरणार्थ एक सेंमी लांब आणि एक सेंमी. रुंद चौरसात छपाईचे सर्व बिंदु एकमेकाला खेटून आणि भरगच्च असतील तर तो चौकोन भडक दिसतो. या उलट बिंदु विरळ असतील तर ती छपाई फिकी दिसते. या भडक छपाईला लाईन छपाई तर नियंत्रितपणे विरळ छपाईला हाफ टोन छपाई म्हणतात. पुस्तके, वर्तमानपत्रे यातील शीर्षके आणि मुख्य मजकूर लाईन छपाईत येतात. छायाचित्रे आणि इतर सजावटीत हाफटोनचा उपयोग करतात. छायाचित्रांची छपाई नीट न्याहाळल्यानंतर त्यातली जाळीदार नक्षी लक्षात येईल. बिंदूंची घनता डॉट्स पर स्क्वेअर इंच (डीपीआय) अशा परिमाणात मोजतात.
यांत्रिक छपाई [संपादन]
आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत.
- शिफ्ट फेड यंत्र - या यंत्रावर कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे एकाच जागेवर बदलत राहून छपाई होते. शीट फेड यंत्रामध्ये कोरे कागद रचून यंत्राच्या एका बाजूला ठेवले जातात. याच प्रकारच्या स्वयंचलित यंत्रांमध्ये एकेक कागद हवेच्या आकर्षणाने उचलला जातो आणि साच्याखाली सारला जातो. साच्यावरील शाईची प्रतिमा कागदावर उमटते व छपाई होते. छपाई झाल्यावर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला ते कागद एकमेकावर रचले जातात. शीट फेड यंत्रावर छपाईचा वेग कमी असतो. तसेच एका वेळी कागदाच्या एकाच बाजूला छपाई होऊ शकते.
शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा कागद किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. वर्तमानपत्राचा कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो.
- रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी यंत्र असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. जर्मनीत तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रति छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रीळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते.
संगणकीय छपाई [संपादन]
संगणकीय, अंकीय किंवा डिजिटल छपाई
छोट्या प्रमाणात छपाई करण्यासाठी डिजिटल छपाई चा उपयोग केला जातो. यासाठी बहुदा ए४ प्रकारचा कागद वापरात येतो. यासाठी निरनिराळी तंत्रे वापरली जातात.
- ब्ल्यु प्रिंट - वास्तूविशारद इमारतींचे नकाश्यांच्या प्रति काढण्यासाठी ब्ल्यु प्रिंट वापरात. यात अमोनियाचा व इतर रसायनांचा वापर करून प्रतिमा कागदावर उमटवली जाते.
- डेझी व्हिल - यामध्ये अक्षरे डकवलेले एक चाक असते. हे चाक सदैव फिरते असते. आवश्यकतेनुसार ते कागदाला टेकते व अक्षर उमटते.
- डॉट मॅट्रिक्स - खिळ्यांचा एक संच एका कॉइल मध्ये ठेवलेला असतो. या संचातील खिळे आवश्यकतेनुसार विद्युतचुंबकीय शक्तीद्वारे शाईच्या रिबिनवर आपटतात आणि छपाई होते.
- लाईन छपाई - यामध्ये अक्षरे डकवलेले एक पट्टीका असते. आवश्यकतेनुसार ते कागदाला टेकते व अक्षर उमटते. एकावेळी संपूर्ण ओल छापली जात असल्याने हे छपाई वेगवान असते.
- हिट ट्रान्सफर - उष्णतेचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या कागदावर प्रतिमा उमटवली जाते. फॅक्स यंत्रात याचा उपयोग दिसून येतो.
- इंक जेट - शाई एका जेट नळीतून कागदावर फवारून छपाई केली जाते.
- इलेक्ट्रोग्राफी - टोनर किंवा शाई कागदावरचा विशिष्ट भाग विद्युतचुंबकीय भारित करून ओढली जाते आणि उष्णतेने चिकटवली जाते.
- लेझर - लेझर किरणांद्वारे एक एका बिंदूचे रेखन करून छपाई केली जाते.
- फोटो कॉपी
परिणाम [संपादन]
धार्मिक [संपादन]
धार्मिक ज्ञान पूर्वी बदलत्या समाजानुसार बदलते असे. परंतु छपाईमुळे ते एकाच काळात बंदिस्त झाले.
सामाजिक [संपादन]
ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला.
पर्यावरण [संपादन]
छपाईत कागद वापरला जात असल्याने छपाईचे पर्यावरणावर वृक्षतोडीमुळे गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई शिसे या धातू पासुन बनवलेली असल्याने त्याचेही प्रदुषण होते.