चिमणी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] चित्रदालन
मराठी नाव : चिमणी (मादी), चिमणा (नर)
हिंदी नाव : गौरय्या
संस्कृत नाव : कलविंक, चटक, ग्रामचटक, गुजराथी नाव : चकली
इंग्रजी नाव : House Sparrow
शास्त्रीय नाव : Passer domesticus
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा आणि पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात तर मादी मातकट तपकिरी रंगाची वरून काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा, चोच फिकट तपकिरी रंगाची अशी असते.
हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, कळ्या, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य घेण्यास समर्थ आहे. वर्षभर वीण हंगाम असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापुस, पिसे, मिळतील त्या वस्तु वापरून घराचे छत, वळच्णीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढर्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात.