अनुदिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुदिनी किंवा जालनिशी- blog - weblog (वॆब‌लॉग) म्हणजे जालपानाच्या (WebPage) स्वरूपातील रोजनिशी diary or Journal) जी बहुतांशपणे सर्वांसाठी खुले असते(accessible). इंग्रजी ब्लॉग (blog) हा शब्द web आणि blog यांचे एकत्रीकरण असून जालावरील रोजनिशी असा त्याचा ढोबळ अर्थ सांगता येईल. मराठीत या अर्थाने जालनिशी किंवा अनुदिनी शब्द वापरला जातो. एकप्रकारे अनुदिनी म्हणजे वैयक्तिक/सामूहिक/सांस्थिक स्वरूपातील मते/विषय/बातम्या वा इतर कोणत्याही विषयावरील जालपान (WebPage) होय.


जालनिशीच्या संपादकास जालनिशीकार (इंग्रजीत bloggers) म्हणतात.

सर्वसामान्यपणे उलटकालगणतीप्रमाणे लिहिलेल्या नोंदी असे जालनिशीचे स्वरूप असते. यामुळे सर्वात नवीन लिखाण सर्वात वर दिसते. जालनिशीकार स्वतःचे अनुभव किंवा कोणत्याही विषयावरील विचार स्वत:च्या जालनिशीवर मांडतो. जालपानाचे स्वरूप असल्याने कोणतीही संपादने तत्काळ प्रकाशित होतात. बहुतांश जालनिशींवर प्रतिक्रियेची सुविधा असते. त्यामुळे वाचक आपल्या प्रतिक्रियाही तत्काळ देऊ शकतात. यामुळे लेखक-वाचक आदानप्रदान सहज व सुलभ होते. अनुदिनी अशा प्रकारे विचार, अनुभव व संपर्काचे माध्यम म्हणून काम करते.


अनुक्रमणिका

[संपादन] ओळख

महाजालाच्या प्रसारासोबत जालनिशीच्या संकल्पनेचा प्रसारही वेगाने झाला. अनुदिनींच्या लोकप्रियतेची कारणे म्हणजे

  • संपादनाचे स्वातंत्र्य
  • प्रकाशन करणे सहज सोपे आहे
  • वाचक ते लेखक आणि लेखक ते वाचक असा दुहेरी संवाद शक्य आहे.

बरेचसे अनुदिनीकार अनुदिनी स्थापनेचे कारण सांगण्यात उत्सुक नसले तरी आत्म-प्रकटन हाच ब-याच जालनिशींचा गाभा आहे असे दिसते. जालनिशीकार स्वतःचे अनुभव आणि विचार मांडण्यासाठीच वापरतात असे जर्मन आणि इंग्रजी भाषिक जालनिशीकारांच्या २९ तुलनात्मक संशोधनातून निष्पन्न झाले. [१] जालनिशी आणि पुस्तके यातील महत्वाचा फरक म्हणजे लोकप्रिय होऊ शकण्याचा वेग. जालनिश्यांचा हा गुण अनेकांना लिहिण्यास उद्युक्त करतो. जालनिशी बहुतेक वेळा सर्वांसाठी खुली असली तरी जालनिश्या खाजगी स्वरूपाच्याही असू शकतात. अशा जालनिश्यांवरील प्रवेश संकेताक्षरांनी (Password) निर्बंधित केला जातो.

[संपादन] इतिहास

ब्राड् फिट्झपॅट्रिक्, एक आद्य जालनिशीकार.

महाजाल प्राथमिक अवस्थेत असताना म्हणजे १९८३ -१९९० या काळात लेखन (Posting) वापरकर्त्यांच्या गटामंध्ये होई. ( ) या काळातील एकमेव अपवाद म्हणजे ब्रायन् रेडमन् चा (Brian E. Redman) स्वतंत्र जालमंच. यावर रेडमन् आणि त्याचे सहकारी महाजालाच्या प्रगतीवर लेख लिहित.

[संपादन] १९९० - २००१

पहिली प्रारंभिक स्वरूपाची अनुदिनी १९९०सालच्या मध्यात अवतरली. या अनुदिन्या महाजालावरच्या वह्या(On-line Diaries) अशा स्वरूपात होत्या. अनुदिन्यांचे सद्यस्वरूप प्रारंभीच्या या डायरींपासून विकसित झाले आहे. १९९३ सालचा Gaia's Forest Conservation Archives ही आजच्या स्वरूपातील पहिली अनुदिनी डॉ.ग्लेन बॅरी यांनी सुरू केली. ही अनुदिनी आजही (फेब्रु २००९) मध्येही कार्यरत आहे. जस्टिन् हॉल्, ब्राड् फिट्झपॅट्रिक्, जॉन् कॅरिमॅक् हे आरंभीच्या जालनिशीकारांपैकी काहीजण. १९९६ पासूनझांगा , , en:Movable Type, en:Blogger किंवा en:LiveJournal सारख्या जालिय सोई उपलब्ध झाल्या. यामुळे अनुदिन्या बनवणे सहजशक्य झाले. अशा स्वरूपामुळे एकट्या झांगावर अनुदिनीसंख्येने सुरूवातीच्या १०० पासून २००५ सालापर्यंत २ कोटी इतकी मजल मारली. इंग्रजी वेबलॉग (weblog) शब्द १९९७ साली पहिल्यांदा जॉन बार्गर यांनी वापरला; त्याचा ब्लॉग असा संक्षेप १९९९ साली पिटर् मेर्होल्झ (Peter Merholz) यांनी केला. याच काळात काही अनुदिन्यांचा पर्यायी माध्यमे म्हणून उदयास येऊ लागली. [२]

[संपादन] २००१-२००४

आज प्रख्यात असलेल्या अनेक अनुदिन्यांचा जन्म २००१च्या सुमारास झाला. (उदा: en:Political Wire , en:Instapundit, en:Little Green Footballs, en:MyDD) अशा प्रख्यात अनुदिन्यांवर रोज ७५००० इतक्या संख्यने अभ्यागतभेटी होतात. (Visitor Hits) ११ सप्टेंबर २००१ला झालेल्या दहसतवादी हल्ल्यांचे पडसादही अनुदिनीविश्वात उमटले होते. २००१च्या सुमारास पत्रकारिताविद्येच्या अभ्यासकांनी या नवीन गवेषणेचा अभ्यास करणे सुरू केले. २००२ सालच्या इराक युद्धामुळे युद्ध-निश्यांचा (War-Blogs) जन्म झाला. २००२ साली अमेरिकन सिनेटर स्ट्रॉम् थर्मंण्ड् en:Strom Thurmond यांच्या वांशिक स्वरूपाच्या काही टिपण्ण्याविरोधी मते अनुदिनीविश्वाने (Bloggosphere) लाऊन धरली. पारंपारिक माध्यमांनी या टिप्पण्या दुर्लक्षिल्या होत्या. अशा घटनांमुळे पर्यायी माध्यमे म्हणून अनुदिनीविश्वाचा दबदबा वाढू लागला.

अनुदिन्यांच्या लोकप्रियतेचा उद्योगजगतात शिरकाव होऊन उद्यमदिनी (corporate blogs) बनणेही सुरू झाले. इंग्रजी ब्लॉग शब्दाची अमेरिकन मेरिअम-वेब्स्टर शब्दकोशाने (en:Merriam-Webster) २००४ सालचा शब्द म्हणून निवड केली.

[संपादन] २००४-आजतागायत

पाश्चात्य जगतात अनुदिन्या २००४ सालापासून मतमतांतरे घडवणारे माध्यम होऊ लागले. २००४ साली आलेला सुनामी (en:December 2004 Tsunami) किंवा ऑगस्ट २००५चे कॅटरिना चक्रिवादळात अनुदिन्यांनी बातम्यांचा स्त्रोत म्हणून काम केले. पारंपारिक माध्यमांनी ही अनुदिन्यांची दखल घेणे सुरू केले. इंग्लंडमधील गार्डिअन (en:The Guardian) सारख्या प्रख्यात वृत्तपत्राने सप्टेंबर २००५ पासून निवडक जालनिश्यांची माहिती देणे सुरू केले. इतर वृत्तसंस्थेप्रमाणे जून २००६ साली बीबीसीने स्वतःच्या संपादकांच्या अनुदिन्या सुरू केल्या. जानेवारी २००५ मध्ये फोर्च्यून नियतकालिकाने उद्योगजगतासाठी महत्वाच्या असलेल्या ८ जा.नि.कारांची नावे अनुसूचित केली. (Peter Rojas, Xeni Jardin, Ben Trott, Mena Trott, Jonathan Schwartz, Jason Goldman, Robert Scoble, and Jason Calacanis.)

२००७ साली टिम् ओ रिअलीने अनुदिन्यांची आचारसंहिताही बनवली. यात त्याने सात कलमे घातली -

  • तुमच्या अनुदिनीवरिल तुमची मते व त्यावरिल टिप्पण्ण्यांची जबाबदारी घ्या. (Take responsibility not just for your own words, but for the comments you allow on your blog.)
  • अपशब्द झेलण्याबाबत तुम्ही किती सक्षम आहात हे जाहिर करा. (Label your tolerance level for abusive comments.)
  • निनावी टिपण्ण्या वगळण्याबाबत विचार करावा. (Consider eliminating anonymous comments. )
  • कडे दुर्लक्ष करा. (Ignore the trolls.)
  • एकमेकामधील टिपण्ण्यांचा संवाद जालाबाहेर घेऊन व्यक्तींशी थेट बोला. (Take the conversation offline, and talk directly, or find an intermediary who can do so. )
  • तुमच्या परिचयातील व्यक्ती जालनिशीवर मर्यादाभंग करत असेल वा वाईट वागत असेल तर तिला/त्याला थेट सांगा. (If you know someone who is behaving badly, tell them so)
  • तुम्ही प्रत्यक्ष जगतात जे कधीही बोलणार नाहीत त्या स्वरूपाची टिपण्णी जालावर करू नका, (Don't say anything online that you wouldn't say in person)

[संपादन] अनुदिन्यांमागचे तंत्रज्ञान

अनुदिन्यांसाठी en:Weblog Publishing System किंवा en:Content management system चा वापर केला जातो. वर्ड्प्रॆस्, सॆरॆंडिपिटी , न्यूक्लियस् CMS, मुव्हेबल टॅप सारख्या स्थळावर खाते उघडुन कोणत्याही नवख्या मनुष्यास सहजपणे जालनिशी सुरू करता येऊ शकते. यामागे PHP, CGI सारख्या संगणक भाषा असतात. अनुदिन्यांचे लेखाशिवाय सामान्यपणे दोनभाग असतात - blogrolls (लेख) व commenting (टिप्पण्ण्या). अनुदिन्यांमध्ये नवीन लेख सुरूवातीस (reverse chronological order) या स्वरूपात लेख प्रकाशित होतात.

बहुतांशी जालनिश्या टिप्पणी करण्यास परवानगी देतात. ही परवानगी दोन प्रकारची असते-

  • निनावी टिपण्ण्या स्वीकारार्ह असणारे ब्लॉग्स.
  • टिपण्ण्यांसाठी प्रवेश (Log-in) अनिवार्य असणारे ब्लॉग्स.

टिप्पण्या जालनिशीकारांकडून संपादित केल्या जाऊ शकतात. शिवीगाळ/अश्लिल स्वरूपाच्या टिपण्ण्या रोखणे किंवा स्पॅम (अनुदिन्यांवर अनेक टिप्पण्या लिहून केला जाणारा हल्ला) रोखणे ही याची प्रमुख कारणे.

स्थिरदुवे (Permanent Links / Permalinks) हे लेखांचे वा टिप्पण्यांचे कायमस्वरूपी जालीय पत्ते (URL) होत. इतर संकेतस्थळांना अनुदिन्यांच्या लेखाचे संदर्भ देण्यास हे कामी येतात.

माझ्या अनुदिनीचा जालीय संदर्भ/दुवा कोणीकोणी घेतला आहे ही माहिती माग (Trackback / Pingback) सोईमुळे जालनिशीकारास समजते. जालनिशीच्या लोकप्रियतेचा अंदाज या सोईमुळे जालनिशीकारास येतो.

भरण (Feed) अनुदिनीवरील मजकूर एकसंध स्वरूपात देतो. ही सोय जालनिशींच्या वाचकांना नवनवीन लेखाचा सुगावा देते. RSS newsfeed readable आणि गुगलचा FeedBurner या यातील लोकप्रिय सोई आहेत.

जालनिशीहजेरी (Blogroll) म्हणजे इतर अनुदिन्यांच्या जालिय पत्त्यांची यादी. सामान्यपणे अनुदिनीकार स्वतःस आवडणा-या इतर अनुदिन्यांची यादी येथे साठवतो. ही यादी वाचकांस उपलब्ध असते.

जालनिशी विविध लेखांचा संग्रह असतो. वाचकांच्या सोईसाठी जालनिशीकार लेखांना बिल्ले (Tag Cloud / Tag ) लावतो. बिल्ल्यांमुळे लेखाचे वर्गीकरण होते. उदा. प्रवास, अध्यात्म, पाककृती अशा विविध विषयांवर लिखाण करणारा जालनिशीकार त्यात्या विषयांचे बिल्ले लेखांना लाउन वर्गीकृत करू शकतो. वर्गीकरण कसे असावे हे जालनिशीकार ठरवतो. त्यामुळे निव्वळ अध्यात्म विषयाला वाहिलेल्या अनुदिनींवर जालनिशीकार आपल्या इच्छेप्रमाणे हटयोग, भक्तीगीते, अनुभव असे बिल्ले लाऊन वर्गीकृत करू शकतॉ.

[संपादन] प्रकार

[संपादन] मजकूराप्रमाणे

  • कलानिशी (Artblogs): कला आणि संस्कृती
  • शिक्षणनिशी (Edublogs) : शिक्षण, अध्यापन, अध्ययन यावरील.
  • उद्यमनिशी (Corporate blog): कंपन्यांच्या स्वतःच्या जालनिश्य. स्वतःच्या उत्पादनाचा प्रसार, त्यावरिल चर्चा, सुधारणेबद्दलच्या टिप्पण्या जाणून घेण्यासाठी कंपन्या यांचा वापर करतात.
  • तज्ज्ञनिशी (Expert blog) : कोणत्याही एका ज्ञानविषयावर नवनविन कल्पना, संशोधन यावरील
  • गंमतनिशी (Funblog): विनोदविषयक
  • रोजगारनिशी (Joblog): नोकरीविषयक.
  • ज्ञाननिशी (Knowledge Blog): ज्ञानव्यवस्थापनेसअठी वापर २ प्रकार - विशिष्ट विषयावरिल व्यक्तीगत जालनिशी किंवा विशिष्ट विषयावरिल सामुदायिक जालनिशी.
  • रहस्यनिशी (Mystery blog): गुन्हे, त्यावरिल कथा.
  • साहित्यनिशी (Litblog): साहित्याची समिक्षा टिप्पणी वा परिक्षण याविषयी.
  • संचयनिशी (Metablog): इतर जालनिश्यांची वा संकेतस्थळांची यादी.
  • स्थळनिशी (Place Blogs): स्थळवर्णन.
  • घासाघिसनिशी (Bargain Blog): जुन्या नव्या वस्तू विकण्यासाठीचा ग्राहकांमधील ऑनलाईन बाजार.
  • टंबल-ब्लॉग्स(Tumblelog): निशीकाराने जालभ्रमण करत असताना सापडलेल्या चित्र, दुवे, मजकूर आणि व्हिडिओ यांचा संग्रह.
  • निवडणूकनिशी (Election blog): निवडणूकीवरील जालनिशी. ही संकल्पना पाश्चात्य जगतात लोकप्रिय आहे. २००८ सालच्या अमेरिकी अध्यक्षीय निवडीत याचा खूप वापर दिसला.
  • युद्धनिशी(Warblog): युद्धस्थळी आलेल्या अनुभवांचे वर्णन. २००२च्या इराकयुद्धाने या प्रकाराचा जन्म झाला.
  • विज्ञाननिशी(Science Blog): विज्ञान, संशोधनाला होणारा अर्थपुरवठा आदी विषयांशी संबंधित.
  • अनुदिनीनिरिक्षक(Blog Watch): संस्था, कंपन्या वा प्रसारमाध्यमे यांच्यावरील टिकाकाराच्या टिपण्ण्या.
  • सल्लागारनिशी: सल्ला देणारे ब्लॉग्स - जसे फोर् चिक्स् मरियु किड्स्

[संपादन] स्वरूपाप्रमाणे

  • मोब्लॉग
  • फोटोब्लॉग
  • व्हिडिओ ब्लॉग

[संपादन] संचालकांप्रमाणे

  • व्यक्तीगत
    • व्यक्तीगत आवडीनिवडी/ मते दर्शिवण्यास उपयोगात आणले जाणा-या जालनिश्या
    • एखाद्या विषयास वाहिलेलीव्यक्तिगत जालनिशी.
  • महामंडळे/उद्योग-निश्या
    • व्यावसायिक उद्देशांसाठी वापरण्यात येना-या जालनिश्या
    • संघटना, क्ल्ब किंवा बिगर व्यावसायिक संस्था यांच्या जालनिश्या. [३]


[संपादन] समस्या

  • स्पॅम हल्ले: एखाद्या लोकप्रिय अनुदिनीवर विरोधी मताच्या गटाकडून स्पॅम हल्ले करून ती बंद पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
  • अनुदिनीच्या स्वरूपामुळे अनुदिनीकाराच्या व्यक्तीमत्वाबाबत निष्कर्श काढणे संभव असते. कारण बहुतेक वेळा आपले आयुष्य अनुदिनीकार लोकांसमोर मांडत असतो.
  • एखाद्या अनुदिनीच्या लोकप्रियतेचा फायदा एखादी कंपनी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेऊन शकते.

[संपादन] मराठी अनुदिनीजगत

भारतीय जालनिशींची संख्या दहा लाखावर [४] असली तरी यात इंग्रजी भाषीक अनुदिन्यांची संख्या जास्त आहे. मराठी भाषेतील अनुदिनीजगत जागतिक भाषांच्या तुलनेत छोटे असले तरी सक्रियपणे ब्लोंगिंग होणा-या भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. आजघडीला (फेब्रु २००९) मराठीत किमान १२०९ अनुदिन्या अस्तित्वात आहेत. [५] पाककृती, साहित्य, कविता, प्रवासवर्णन, ललितलेख हे मराठी अनुदिनीकारांचे आवडते विषय असल्याचे दिसते. मराठीत ज्योतिष, पाककृती अशा एका विषयाला वाहिलेल्या अनुदिन्याही आहेत.

[संपादन] बाह्यदुवे

[संपादन] संदर्भ

  1. Neuberger, Christoph / Christian Nuernbergk / Melanie Rischke: Weblogs and Journalism: compete, complement or integration? In: Media Perspektiven, 2 / 2007, p. 96-122. Online: http://www.media-perspektiven.de/uploads/tx_mppublications/02-2007_Neuberger.pdf
  2. http://andrewsullivan.theatlantic.com/
  3. ((Literature | Author = Christian Hauschke, Sarah and Nadine Ullmann Lohre | title = Libworld. Biblioblogs globally | Aggregate Plant LIBREAS number = 10/11 (3 / 4 - 2007) | pages = 3 | = http://opus.bsz-bw.de/fhhv/volltexte/2008/8/pdf/002hau.pdf Online))
  4. http://www.hindu.com/2006/11/14/stories/2006111403801902.htm
  5. http://marathiblogs.net/ च्या मुखपृष्टावरिल संख्या. या स्थळाशी निगडित नसलेल्या अनुदिन्या जमेस धरून काढलेली आकडेवारी.