Jump to content

सुकर्णो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुकर्णो

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१८ ऑगस्ट १९४५ – १२ मार्च १९६७
पुढील सुहार्तो

जन्म ६ जून, १९०१ (1901-06-06)
सुरबया, पूर्व जावा, डच ईस्ट इंडीज
मृत्यू २१ जून, १९७० (वय ६९)
जाकार्ता, इंडोनेशिया
अपत्ये मेगावती सुकर्णोपुत्री
धर्म सुन्नी इस्लाम
सही सुकर्णोयांची सही
सुकर्णो कुटुंब आणि जवाहरलाल नेहरू

अचमद सुकर्णो (६ जून १९०१ - २१ जून १९७०) हे इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म ०६ जून १९०१ या दिवशी जावा बेटावरील सुरावाया येथे झाला. त्यांनी बांडुंगमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली पदवी संपादन केल्यावर सुकर्णो राजकारणात सक्रीय झाले आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यावेळी तेथे डच लोकांचे राज्य असल्याने सत्ताधाऱ्यांनी १९२९ साली सुकर्णो यांना अटक करून त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. अटकेत असतांनाही सुकर्णो यांनी गुप्तपणे आपले कार्य सुरूच ठेवले. राज्यकर्ते डचांना या कारवाया समजल्यावर त्यांनी सुकर्णो यांना हद्दपार करून सुमात्रा बेटावर नजरकैदेत ठेवले.

दुसऱ्या महायुद्धात जपानी सेनेने सुकर्णो यांची सुटका केली. १९४५ साली इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाले आणि सुकर्णो देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. सुकर्णो साम्यवादी विचारांचे समर्थन करीत. मार्क्सचा साम्यवाद आणि स्थानिक रीतिरिवाज यांचा मेळ घालून सुकर्णो यांनी मरहेनिझम नावाची स्वतंत्र प्रणाली विकासीत केली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून सुकर्णो यांनी १९५६ साली गाईडेड डेमॉक्रसी नावाची नवीन पद्धत रुजविण्यास सुरुवात केली. यानुसार देशात सर्वसमावेशक एकच पक्ष राहू देण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला. परिणामतः सुकर्णो हे स्वतःच १९६६ पर्यंत इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान राहिले.

लोकशाही स्वीकारलेल्या देशात सुकर्णो एकछत्री हुकुमशाही पद्धतीने राज्य कारभार चालवू लागल्याचे लक्षात येताच इंडोनेशियाच्या सैन्याने त्यांचा विरोध करण्यास सुरुवात केली. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंग्लंड या देशांनी सुकर्णो विरोधी लोकांना बाहेरून मदत देणे सुरू केले. १९६५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने इंडोनेशियाचा बहिष्कार केला. त्याच वर्षी इंडोनेशिया मधल्या सैन्यात बंडाळी माजली, बंडखोर सैन्याने लाखावर कम्युनिस्टांचे शिरकाण करून सुकर्णो यांची सत्तेवरील पकड सैल केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे सुकर्णो यांनी अखेर ११ मार्च १९६६ रोजी आपल्या पदाचा राजिनामा दिला. जनरल सुहार्तो यांनी इंडोनेशियाची सत्ता आपल्या हातात घेतली. सुकर्णो यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेत असतांनाच २१ जून १९७० रोजी सुकर्णो यांचे निधन झाले.