सत्या नादेला
सत्य नादेला (जन्म : १९ ऑगस्ट, इ.स. १९६७ हैदराबाद-तेलंगणा) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. कंपनीच्या कारकिर्दीतील ते तिसरे सीईओ आहेत.
सत्या नाडेला यांचे शालेय शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील बी.एन. युंगधर हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते.
सत्य नादेला यांनी मणिपाल युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात बी.ई., अमेरिकेतील व्हिस्कॉनसीन युनिव्हर्सिटीमधून एम.एस. आणि शिकागो युनिव्हर्सिट बूथ स्कूल ऑफ बिझनेस येथून एम.बी.ए. केले. इ.स. १९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. इ.स. २०११ पूर्वी नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ऑनलाईन सेवेच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपाध्यक्ष म्हणून तसेच मायक्रोसॉफ्टच्या व्यापार विभागाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे.
२०११मध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड अँड एन्टरप्राईज विभागाची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर या विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून दाखवली. त्यामुळेच नादेला यांची फेब्रुवारी २०१४ मध्ये "मायक्रोसॉफ्ट‘च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली.