विनायक जनार्दन कीर्तने
विनायक जनार्दन कीर्तने १८४० - १८ डिसेंबर, १८९१) हे एक मराठी नाटककार होते.
कीर्तने यांचे माध्यमिक शालेय शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले. १८६९ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या पहिल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कीर्तने हे एक होते. तथापि, कॉलेजचे शिक्षण मात्र त्यांनी अर्धवट सोडले, व त्यानंतर काही काळ मास्तरकी केली. पुढे इंदूरच्या युवराजांचे शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कालांतराने बडोदे संस्थानचे दिवाण झाले. पण तेथेही राजाशी न पटल्याने राजीनामा देऊन कीर्तने पुण्यात स्थायिक झाली. कीर्तने यांचे वंशज आजही पुण्यातच वास्तव्यास आहेत.
शाळकरी वयापासूनच कीर्तन्यांना लेखन वाचनाची गोडी होती. वयाच्या १२व्या वर्षीच त्यांनी लिहिलेल्या निबंधाची प्रशंसा झाली. त्यांच्या ग्रंथसंपदेत 'थोरले माधवराव पेशवे हे पहिले ऐतिहासिक आणि शेक्सपिअरच्या धर्तीचे शोकात्म नाटक होते. पौराणिक व भाषांतरित नाटकांच्या जमान्यात कीर्तने यांनी ऐतिहासिक कथनावर स्वतंत्र नाटक रचले. तेसुद्धा महाविद्यालयात शिकत असताना. ६० पृष्ठांच्या या नाटकात माधवरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचे ठळक चित्रण आहे. तथापि नाटक माधवरावांवर केंद्रित केल्याने इतर पात्रांची भूमिका दुय्यम दाखवली गेली. त्यामुळे नाटकाने अपेक्षित उंची गाठली नाही. असे असले तरी वेगळा विषय, वेगळी शैली आणि संगीताचा आधार न घेता स्वतंत्र नाट्यलेखनाचा पायंडा लेखकाने पाडून मराठी नाट्यसृष्टीला एक नवे वळण दिले. जयपाळ ' हे त्यांचे आणखी एक गाजलेले नाटक. तुकोजीराव होळकरांच्या आज्ञेने एका इंग्रजी 'ग्रंथाचे मध्य हिंदुस्थानचा इतिहास या नावाने भाषांतर केले, आणि छापले. 'मधुरा' ही एक त्यांची एक कादंबरी. तथापि ही कादंबरी अपूर्ण राहिली.