मिनोती आपटे
डॉ. मिनोती विवेक आपटे ( औरंगाबाद, २५ ऑगस्ट, १९५८) या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एक मराठी संशोधक आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विजयकुमार रघुनाथ फडके. ते लष्करात लेफ्टनंट कर्नल होते, तर मिनोती आपटे यांची आई डॉ. सुनंदा फडके या पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. मिनोती आपट्यांचे पती डॉ. विवेक आपटे हे रासायनिक अभियंता आहेत. त्याचा मुलगा तुषार आपटे हा संगीतकार आहे.
शिक्षण आणि कारकीर्द
[संपादन]डॉ. मिनोती आपटे यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी घेऊन जवळच्याच ससून रुग्णालयात काम केले, त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या व आता तेथील नागरिक आहेत. ऑस्ट्रेलियातील साऊथ वेस्टर्न सिडनी क्लिनिकल स्कूल या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या संस्थेत त्या वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. तसेच त्या इश्गहॅम इन्स्टिटय़ूट फॉर अप्लाइड रिसर्च या संस्थेच्या स्वादुपिंड संशोधन गटाच्या संचालक आहेत.
मिनोती आपटे या अल्कोहोलमुळे होणाऱ्या स्वादुपिंडाच्या कर्करोगातील उपचाराच्या तज्ज्ञ आहेत. 'पॅनक्रिएटॉलॉजी' या नियतकालिकाच्या त्या प्रमुख संपादक आहेत.
संशोधन
[संपादन]माणसाच्या पोटाच्या मागील बाजूस खोबणीच्या भागात असलेल्या स्वादुपिंड नावाव्या १५ सेंटीमीटर लांबीच्या स्रावक ग्रंथीतून इन्शुलिन, ग्लुकागॉन, पॅनक्रिएटिन पॉलिपेप्टाइड व इतर पाचक स्राव बाहेर पडत असतात. अशा या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर डॉ. मिनोती आपटे यांनी संशोधन केले असून अल्कोहोलमुळे होणाऱ्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्याची पद्धत आणि त्या स्वादुपिंडातील कर्करोगकारक पेशी वेगळ्या करण्याची रीत मिनोती यांनी शोधून काढली आहे.
स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्यानंतर फक्त सहा टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. या प्रकारचा कर्करोग इतका आक्रमक का असतो याचा शोध मिनोती आपटे घेत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह व इतर दुर्मीळ जनुकीय आजार स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे होऊ शकतात. स्वादुपिंडाचा कर्करोग नेमका कसा होतो याची पेशींच्या पातळीवरील प्रक्रिया त्यांनी अभ्यासली आहे, त्यातून आगामी काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगावर काही नवीन औषधे तयार करता येतील. त्यांच्या संशोधनामुळे त्या वैज्ञानिक संशोधनात प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
डॉ. मिनोती आपटे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- वैद्यकीय संशोधनासाठी, ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याचा ’वूमन ऑफ द ईयर २०१५’ पुरस्कार..
- ’ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हे पदक