नारो आप्पाजी खिरे
कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) (जन्म?, मृत्यू: ६ मार्च १७७५) नाव नारायण होते. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. नारो आप्पाजी रामभक्त होते.
कारकीर्द
[संपादन]छत्रपती शाहू महाराजांनी सन १७१९ मध्ये नारो आप्पाजी यांची इंदापूर प्रांतात मुतालिक म्हणुन नेमणूक केली. तेव्हापासून १७३२ पर्यंत तरी निदान नारो आप्पाजी साताऱ्यास वास्तव्य करीत होते.
पुढे थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी मराठी साम्राज्याची सूत्रे पुण्याहून हलविण्यास सुरुवात केली आणि आपले मुख्य ठाणे साताराऐवजी पुणे केले. पुढे आपल्या कर्तृत्वाने व हुशारीने नारो आप्पाजी यांनी पेशवाईत मोठा लौकिक मिळविला. १७५० मधे नानासाहेब पेशव्यांनी पुणे प्रांताचे सर-सुभेदार म्हणून त्यांची नेमणूक केली. श्रीमंत नारो आप्पाजींनी स्वराज्याची पुनर्भूमिगणना करून जमीनमहसुलांत क्रांती घडविली. तसेच जमाखर्चाचे बाबतीतही त्यांचा हात धरणारा दुसरा मोठा अधिकारी नव्हता. पुणे शहराची वाढ करून व्यापार उदीम वाढविणे, नवीन पेठा बसविणे तसे कात्रज धरणाचे काम नारो आपाजींच्या देखरेखीखालीच झाले. कित्येक प्रसंगी न्यायनिवाडे करणे, जहागिरींच्या हिशोबांचे फडशे पाडणे, महत्त्वाच्या सडकांवर सावलीसाठी झाडे लावणेची व्यवस्था करणे ही कामेही पेशव्यांनी त्यांचेकडून करवून घेतली. सन १७६३ मध्ये पुण्याचा केलेला बचाव व पुण्याची पुनर्रचना, पुरंदर भागातील कोळ्यांचा बंदोबस्त, नारायणरावाचे खुनानंतर पुण्याचा बंदोबस्त, हैदर अल्लीच्या फंदाफितुरांचा बंदोबस्त, अनेक प्रसंगी परकीय वकिलांशी केलेल्या मसलती अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या कर्तबगारीची साक्ष देतात. पुणे शहराची रचना हीच त्यांची मुख्य कृती असली तरी इतर व्यवहारांतही ते निस्पृह, कर्तबगार व राज्यहितास जपणारे अधिकारी होते.