हेन्री दुसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरा हेन्री (५ मार्च, ११३३ - ११८९) हा ११५४–११८९ च्या दरम्यान इंग्लंडचा राजा होता.

दुसऱ्या हेन्रीची पस्तीस वर्षांची राजवट तीन कारणांकरता लक्षणीय मानली जाते. पहिले म्हणजे पहिल्या विल्यमने १०६६ मध्ये स्थापलेले इंग्लंडवरील नॉर्मन घराण्याचे राज्य जवळपास वीस वर्षांच्या अवकाशानंतर दुसऱ्या हेन्रीने पुन्हा नॉर्मन घराण्याकडे आणले. वास्तविक पाहता दुसरा हेन्री केवळ आईकडून नॉर्मन घराण्याचा वंशज होता. त्यामुळे त्याला ॲंजू घराण्याचा प्रतिनिधी मानावे लागेल. परंतु त्याच्या आईचे त्याच्या वडलांशी कधीच पटले नाही, व केवळ पुरूष वारसदार नसल्यामुळे आपल्या वडिलांच्या, म्हणजे पहिल्या हेन्रीच्या, हातून राज्य निसटले याची तिला कायम खंत होती. त्यामुळे लहान वयापासूनच दुसरा हेन्री नॉर्मन घराण्याचा वारसदार म्हणून वाढला व तसे स्वतःकडे पाहू लागला. दुसऱ्या हेन्रीच्या कारकिर्दीतील दुसरी लक्षणीय गोष्ट म्हणजे त्याच्या हातून घडलेला इंग्लंडचा विस्तार. हेन्रीच्या पुर्वी केवळ आजच्या नॉर्मंडी व इंग्लंड भागात असलेले इंग्रजी राज्य हेन्रीच्या हुकुमतीखाली स्पेनपासून स्कॉटलंडपर्यंत पसरले. इंग्लंड या काळाच्या आधी व नंतर कधीच इतका मोठा नव्हता. हे राज्य युरोपमधील तत्कालीन राज्यांच्या तुलनेत इतके मोठे होते की कधीकधी त्यास ॲंजेवीन साम्राज्य, म्हणजे ॲंजूचे साम्राज्य, म्हणून देखील संबोधले जाते. दुसऱ्या हेन्रीच्या राजवटीची तिसरी विशेष बाब ही त्याच्यात आणि इंग्लंडमधल्या ख्रिस्ती धर्माच्या सर्वात श्रेष्ठ प्रतिनिधीत झालेला वाद होय. दुसरा हेन्री आणि कॅंटरबरीचा आर्चबिशप थॉमस बेकेट यांच्यातला हा वाद इतका विकोपास गेला की त्याचा शेवट बेकेटच्या प्रसिद्ध हत्येत झाला. या वादाच्या मुळाशी इंग्लंडच्या मातीवर रोमच्या पोपचा कायदा श्रेष्ठ की इंग्लंडच्या राजाचा हा प्रश्न होता. म्हणजेच ऐहिक राज्य ख्रिस्ताने सांगितलेल्या आणि पोपने मान्यता दिलेल्या तत्त्वांवर आधारित असावे की सामान्य राजेरजवाड्यांनी मानलेल्या तत्त्वावर या पुढे युरोपमध्ये ज्वलंत स्वरूप धारण केलेल्या प्रश्नाला दुसऱ्या हेन्रीच्या इंग्लंडमध्ये तोंड फुटले.

अनेक बेकायदेशीर संततीशिवाय दुसऱ्या हेन्रीस चार मुले आणि चार मुली अशी आठ कायदेशीर अपत्ये होती. आपल्या मृत्यूनंतर राज्याचे काय या काळजीमुळे दुसऱ्या हेन्रीने आपल्या थोरल्या मुलाचा (याचेही नाव हेन्री) राज्याभिषेक हयात असताना स्वतःच्या हस्तेच केला. पण एव्हढे करूनही भाऊबंदकी टळली नाही. दुसऱ्या हेन्रीच्या मृत्यूपुर्वीच त्याच्यात आणि त्याच्या चारही पुत्रांत कमालीचे कटू युद्ध घडले. यात दुसरा हेन्रीचा थोरला मुलगा मारला जाऊन राज्य पुन्हा दुसऱ्या हेन्रीकडे आले. शेवटी हेन्रीच्या मृत्यूपश्चात त्याचा तिसरा मुलगा रिचर्ड राज्यावर आला. पण दहाच वर्षात त्याचे राज्य दुसऱ्या हेन्रीच्या सर्वात धाकट्या मुलाकडे, म्हणजे जॉनकडे आले.