नॉर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॉर्मन स्कॅँडिनेव्हिया द्वीपकल्पातील व्हायकिंगांची एक टोळी. नॉर्मन शब्द नॉर्थमेन किंवा नॉर्समेन याचेच अपभ्रंश रूप असावे. संपत्तीचा हव्यास, अधिकाराची हाव, साहसाची आवड इ. कारणांमुळे नवव्या-दहाव्या शतकांत ह्या व्हायकिंग गटाने प. यूरोपातील अनेक देशांत धुमाकूळ घातला. स्कॅंडिनेव्हियाच्या डेन्मार्क भागातून सुरुवातीस फ्रान्समध्ये व नंतर द. इटली, सिसिली, इंग्लंड इ. प्रदेशांत नॉर्मन टोळ्या पसरल्या.

विस्तार[संपादन]

स्कॅंडिनेव्हियाच्या डेन्मार्क भागातून सुरुवातीस फ्रान्समध्ये व नंतर द. इटली, सिसिली, इंग्लंड इ. प्रदेशांत नॉर्मन टोळ्या पसरल्या. नवव्या शतकाच्या प्रारंभी ह्या लोकांनी फ्रान्सवर हल्ले करण्यास सुरुवात केली व पुढे त्यांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर व नद्यांच्या खोऱ्यांत वसाहतीही स्थापन केल्या. सुमारे शंभर वर्षांत सीन नदीच्या परिसरातील मुलूख यांनी व्यापला. यालाच पुढे नॉर्मंडी म्हणजे नॉर्मनांचा प्रदेश हे नाव पडले. ९११ मध्ये नॉर्मन पुढारी रॉलो याला फ्रॅंक राजा तिसरा चार्ल्स सिंपल याने ड्यूकचा दर्जा देऊन आपल्या सेवेत दाखल करून घेतले. याच्या बदल्यात याच सुमारास नॉर्मन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला व फ्रेंचांच्या अनेक चालीरीतीही अंगीकारल्या असाव्यात. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रशासक व धर्मप्रसारक म्हणून प्रशंसनीय कामगिरी केली. धर्मयुद्धांतही अनेक नॉर्मन योद्ध्यांनी मोठे नाव कमाविले. अकराव्या शतकाच्या सुरुवातीस नॉर्मन पुढारी तॅंक्रेदचा मुलगा रॉबर्ट गीस्कारने द. इटलीत आपले बस्तान बसविले. तॅंक्रेदचा दुसरा मुलगा रॉजर याने सिसिलीतून मुसलमानांना हुसकावून लावले. कालांतराने याचा मुलगा दुसरा रॉजर याने दोन सिसिलींचे राज्य स्थापन केले.

रॉलोच्या वंशातील ड्यूक विल्यम हाच पुढे विल्यम द काँकरर म्हणून प्रसिद्धीस आला. इंग्लंडच्या एडवर्ड द कनफेसरने आपल्याला राज्याचा वारसा दिला असून दुसरा वारस वेसेक्सचा हॅरल्ड याचीही आपल्या हक्कास मान्यता आहे, असे विल्यमचे म्हणणे होते. १०६६ मध्ये एडवर्डच्या निधनानंतर हॅरल्डला राजपद मिळाले. तेव्हा विल्यमने इंग्लंडवर स्वारी केली आणि हेस्टिंग्जच्या लढाईत हॅरल्डचा पराभव करून तो इंग्लंडच्या गादीवर बसला. अशा रितीने यूरोपमधील अनेक देशांत नॉर्मनांची सत्ता स्थापन झाली व मध्ययुगीन यूरोपच्या घडणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कालांतराने नॉर्मन फ्रान्स, इंग्लंड आणि इटली यांच्या मूळ लोकांत मिसळून गेले. अँग्लो-सॅक्सन व नॉर्मन यांच्या मिश्रणाने इंग्लंडमधील आजचा इंग्लिश समाज विकास पावला.