हाना आरेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॅना अरेंट या पानावरून पुनर्निर्देशित)
हाना आरेंट
जन्म नाव हाना आरेंट
जन्म १४ ऑक्टोबर, इ.स. १९०६
लिंडन, हानोफर, जर्मनी
मृत्यू ४ डिसेंबर, इ.स. १९७५
न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य
भाषा जर्मन
विषय राजकीय सिद्धान्तवाद

हाना आरेंट (जर्मन: Hannah Arendt) (१४ ऑक्टोबर, इ.स. १९०६ ; लिंडन, हानोफर, जर्मनी - ४ डिसेंबर, इ.स. १९७५ ; न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ही जर्मन अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ व लेखिका होती. तिच्या साहित्यात तिने मानवी समाजातील सत्ताकेंद्रे, राजकारण, अधिकारशाही इत्यादी विषयांचे तात्त्विक विवरण हाताळले आहे.

तत्त्वज्ञान[संपादन]

स्वतःला तत्त्वज्ञ म्हणवून घेणे तिला आवडत नसे, कारण तिच्या मते तत्त्वज्ञानाचा संबंध ‘एकट्या’ किंवा ‘एकट’ माणसाशी (मॅन इन सिंग्युलर) असतो. राजकीय सिद्धान्तकर्ती म्हणणे तिला पटण्यासारखे होते. ‘मी वाचणाऱ्यांसाठी लिहीत नाही, मी स्वतःसाठी लिहिते’ यासारख्या तिच्या विधानांमुळे तिची प्रतिपादने समजून घेणे अवघड होते. तिच्या स्वतःच्या शब्दांत ती ‘कुठल्याही अडथळ्याविना (पूर्वग्रहाविना) विचार’ करते. अस्तित्ववादाचा एक प्रणेता हायडेगर याची ही शिष्या.

दोन लेखनांसाठी हॅना प्रसिद्ध आहे. दि ओरिजिन्स ऑफ टोटलिटॅरिॲनिझम - (१९५१) नाझी आणि स्टॅलिनच्या सत्तेची चर्चा, या लेखनामुळे ‘शीतयुद्धाची विचारवंत’ असे बिरुद तिला चिकटवले जाते.
द ह्यूमन कंडिशन - (१९५८) श्रम, कार्य आणि कृती या मूलभूत कल्पनांची तपासणी करणारा तात्त्विक अभ्यास.

याव्यतिरिक्त क्रांतीचे स्वरूप, स्वातंत्र्य, अधिसत्ता आणि आधुनिक युग या विषयांवर तिने लेखन केलेले आहे. मृत्यूआधी तिने ‘द लाईफ ऑफ द माइन्ड’ या आपल्या ग्रंथाचे दोन खंड लिहून पूर्ण केले होते. यात तिने विचार करणे, इच्छा करणे आणि निर्णय देणे ह्या गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे. विचार करणे म्हणजे एकांतातील संवाद असतो असे ती म्हणते.

ऑन रेव्हल्युशन – मार्क्सवादाविषयीची हॅनाची अप्रीती या पुस्तकातून दिसते. एडमंड बर्कप्रमाणे ती अमेरिकी क्रांतीचा स्वातंत्र्यस्पंदन म्हणून गौरव करते आणि फ्रेंच राज्यक्रांतीला ‘गरजेचा’ आविष्कार म्हणून हिणवते. समकालीन अमेरिकींमध्ये क्रांतीची भावना नाही आणि राजकारणात ते सक्रिय सहभागही घेत नाहीत असेही मत हॅनाने मांडले आहे.

आईशमन इन जेरुसलेम – हे पुस्तक वार्तांकनाच्या स्वरूपात आहे. आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता आज्ञा पाळण्याच्या जनसमूहाच्या वृत्तीची चर्चा तिने केली आहे. कोणत्याही ‘वादात’ तिचे लेखन बसत नाही. समूहवाद्यांच्या अलीकडच्या लिखाणाशीही तिचे साम्य नाही. ती रूपविवेचनवादी असल्याचे म्हटले जाते. मोठे सिद्धान्त किंवा वैश्विक मूल्ये अशा गोष्टींवर तिचा विश्वास नाही. म्हणूनच ती उदारमतवादी किंवा उदारमतवादविरोधी नाही. तशीच ती मार्क्स-वादी- किंवा –विरोधी, राष्ट्र-वादी- किंवा –विरोधी नाही.

उदारमतवादी परंपरेचे टीकाकार बऱ्याचदा तिचा उल्लेख करतात. काही गोष्टी तशा आहेतही : हॅनाची प्रातिनिधिक लोकशाहीवरील टीका; नैतिकता राजकारणापासून अलग आहे असे तिचे मत; क्रांतिपरंपरेचे तिने केलेले कौतुक इ. पण एवढ्यावरून तिला ‘उदारमतवादविरोधी’ ठरविणे चूक होईल. घटनावाद, कायद्याचे राज्य, मूलभूत मानवी हक्क या गोष्टींचे तिने जोरदार समर्थन केले आहे.

एखाद्या परंपरेत बसवायचेच असेल तर हॅना अरेन्टचे विचारांची मुळे अरिस्टॉटलच्या विचारांत सापडतात; आणि नंतर मॅकियाव्हेली, मॉन्टेस्क्यू, जेफर्सन आणि टॉकव्हिल यांच्या भूमिकांमध्ये दिसते त्या नागरी प्रजासत्ताकवादाच्या परंपरेत तिला स्थान द्यावे लागेल. या अभिजात परंपरेनुसार, राजकारणाची समुचित अभिव्यक्ती लोकांनी सार्वजनिक स्थानी एकत्र येऊन सामूहिक हित असलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत चर्चेने निर्णय घेणे ह्यात आहे.

जननक्षमता’ (नॅटलिटी) ही हॅनाची खास संकल्पना आहे. जगात नव्याने काहीतरी आणण्याची प्रवृत्ती असे तिचे वर्णन करावे लागेल.

राजकारणाबाबत भूमिका : नागरी साहचर्य, सक्रिय नागरिकत्व आणि सामूहिक चर्चेद्वारे सर्व राजकीय बाबींसंबंधी निर्णय घेणे.

आधुनिकता[संपादन]

हॅनाची आधुनिकतेची संकल्पना बरीचशी नकारात्मक आहे. अंतर्मुखतेचे खाजगी जग आणि आर्थिक हितवृद्धीचे खाजगी प्रयत्न यामुळे कृती आणि भाषणाचे सार्वजनिक वर्तुळ लोप पावले आहे, एक जग हरवले आहे; पूर्वीच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक या फरकाऐवजी आता ‘सामाजिक’ आले आहे; आधुनिकता म्हणजे नोकरशाहीचे प्रशासन आणि अनामिक श्रम (निवडकांचे वर्चस्व आणि लोकमतातही फेरफाराचे प्रयत्न) असे तिला वाटते. परंपरेच्या मदतीशिवायच आपल्या काळाचे ओझे आपण पेलायला हवे असे ती म्हणते.
आधुनिकतेत भौतिकवाद ठासून भरलेला आहे. त्याच्यामुळे चिकित्सक मीमांसा टाळली जाते. आर्थिक पैलू सोडून आयुष्याला दुसरा कंगोराच नाही असे दाखविले जाते असे हॅनाला वाटते. त्यामुळे आधुनिकतेमुळे नागरी आयुष्य आणि स्वातंत्र्य मर्यादित बनते असे ती म्हणते.

स्वातंत्र्य[संपादन]

मुक्तता (लिबर्टी) आणि स्वातंत्र्य यांच्यात हॅना फरक करते. तिच्या मते मुक्तता म्हणजे छळाची अनुपस्थिती असते तर स्वातंत्र्य म्हणजे ‘स्व’चे प्रत्यक्षीकरण होय.
उदा० १९४७ मध्ये भारतात जे घडले त्यामुळे भारतीय ब्रिटिश अमलातून मुक्त झाले, पण भारतीय स्वतंत्र आहेत असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा भारतीय आपल्या इच्छा-आकांक्षांप्रमाणे राज्य करण्याच्या परिस्थितीत असतील.
हॅनाच्या मुक्तता आणि स्वातंत्र्य ह्या संकल्पना प्रत्यक्ष लोकशाहीच्या संकल्पनेशी निगडित आहेत. नागरी आयुष्यात व्यक्ती सक्रियपणे सहभागी होते तेव्हाच स्वातंत्र्य आविष्कृत होते असे तिला वाटते. अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण असा सूर इथे निघतो.
पारंपरिक विचारप्रवाहांनुसार स्वातंत्र्याचा विचार व्यक्ती आणि वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भात केला जातो. हॅना मात्र स्वातंत्र्याचा विचार व्यक्तीच्या सामाजिक जीवनाच्या संदर्भात करते. तिच्या या भूमिकेची मुळे प्राचीन ग्रीसमध्ये आढळतात.

सत्तेबाबत भूमिका[संपादन]

सार्वजनिक-राजकीय हेतूंसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची क्षमता म्हणजे ‘सत्ता’ होय. शक्ती, ताकद किंवा हिंसा यांपासून सत्ता वेगळी म्हणून पाहिली पाहिजे. शक्ती ही वैयक्तिक बाब आहे तर सत्ता ही वैयक्तिक बाब नसून काही समाईक राजकीय हेतूंसाठी एकत्र आलेल्या अभिकर्त्यांचा तो गुणधर्म आहे. ताकद ही नैसर्गिक बाब आहे, सत्ता मात्र तशी नाही. सत्तेबाबतची हॅनाची भूमिका ‘संरचनावादी सिद्धान्त’ म्हणून ओळखली जाते.
अरेन्टच्या मते, सत्तेची विधिमान्यता एखादा राजकीय समूह स्थापन करण्यासाठी लोक प्रारंभी एकत्र येतात ह्या तथ्यातून जन्म घेते आणि भाषण, इतरांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे अशा बाबींमधून व्यक्ती जेव्हा समूहाशी सुसंगतपणे वागते तेव्हा ती या विधिमान्यतेवर पुन्हा संमतीची मोहर उमटवीत असते.

हिंसा[संपादन]

हिंसेमध्ये छळाचा वापर दिसून येतो. सत्ता ही छळावर नव्हे तर संमती आणि विवेकी समजुतींवर आधारलेली असते.

सर्वंकषतावाद[संपादन]

हॅनाची सत्तेची भूमिका तिची सर्वंकषतावादाची भूमिकाही स्पष्ट करते. ती सर्वंकषतेची कडवी विरोधक आहे. सर्वंकषतावाद हे ‘शतकाचे संकट’ आहे असे तिने म्हटले आहे. प्राधिकारवाद (ऑथरिटॅरिअनिझम) आणि सर्वंकषतावाद यांमध्ये तिने भेद कल्पिला आहे. प्राधिकारवादात जबाबदारी अंतर्भूत असते असे ती म्हणते. हिंसा आणि तत्त्वप्रणालीच्या बळावर हुकूमशाही फोफावते; तत्त्वप्रणाली स्वतंत्र विचारक्षमतेला मारक असते असेही हॅना म्हणते.
हॅना अरेन्टचे विचार पचनी पडण्यास काहीसे कठीण आहेत पण प्रत्यक्ष लोकशाहीची थोर प्रणेती अशी तिची सार्थ ओळख आहे. उद्वेग, अधिष्ठानवादाला विरोध आणि लेखनातील व्यामिश्रता या गोष्टींसाठी तिच्यावर टीका केली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "हाना आरेंट हिच्या साहित्यकृतींचे इंग्लिश व फ्रेंच अनुवाद" (इंग्लिश व फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "हाना आरेंट कलेक्शन (हाना आरेंट संग्रह)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)