Jump to content

हिराजी गोमाजी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये ब्रिटिशांविरोधात मोठी चळवळ उभी राहिली. आझाद दस्ता हा त्यापैकीच एक. स्वातंत्र्यासाठी आग्रही असणा-या तरुणांची फळी उभारण्यात भाई कोतवाल यशस्वी झाले.

या आझाद दस्त्याची ब्रिटिशांनी मोठी धास्ती घेतली होती. या संघटनेच्या सदस्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी इनाम लावले होते. त्यातून फितुरी झाल्याने भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना ब्रिटिशांनी पकडले. या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला येत्या २ जानेवारी रोजी ७२ वष्रे पूर्ण होत आहेत.

माथेरानमध्ये भाऊसाहेब राऊत यांनी देशप्रेमाची ज्योत तरुणांच्या मनात जागवली. महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची हाक दिली. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर माथेरानमधून भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी आंदोलनासाठी उपस्थित होते.

मुंबई हे आर्थिक केंद्र होते. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या काही वाहिन्या कर्जत, अंबरनाथमधून जात होत्या. भिवपुरी येथील टाटा पावर स्टेशनमध्ये तयार झालेली वीज मुंबईला ज्या टॉवरच्या मदतीने पुरवली जाते, तो टॉवर पाडल्यास ब्रिटिशांना धक्का बसेल. असा विचार भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यातील प्रमुख मानिवलीच्या गोमाजी पाटील यांनी मांडला.

वांगणीजवळील डोणे येथील पायलन (टॉवर) २२ सप्टेंबर १९४२ रोजी पाडण्याचा निर्णय झाला. नेरळजवळील मानिवली भागात भगत मास्टर, मुंबई येथील रामलाल श्रीवास्तव, भास्कर तांबट, देशमुख आदी तरुण मंडळींनी वीस ते पंचवीस सहका-यांसोबत दिवसा टॉवर पाडण्याची योजना अमलात आणली. हे क्रांतिकारक रात्री भूमिगत होऊन दिवसा योजना राबवत होते. त्याला ग्रामस्थांचाही पाठिंबा होता.

हळूहळू विजेचे पायलन (टॉवर) तोडले जाऊ लागल्याने वीज खंडित होऊन ब्रिटिश सरकार हैराण झाले. त्यांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी इनाम लावले. आझाद दस्त्यातील सदस्यांच्या कुटुंबीयांना मारहाण, अटक करणे, त्रास देणे सुरू केले. त्यात आगरी समाजातील गोमाजी रामा पाटील यांचे पुत्र हिराजी पाटील हे सुद्धा होते. त्यांना ब्रिटिशांनी पकडले.

नेरळमधून कल्याणला आणले. मात्र, हिराजी यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेतली व आझाद दस्त्यात सामील झाले. त्यावेळी त्यांचा मुक्काम मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या जंगल भागात होता. यावेळी येथून दूध भाकरी नेणा-या एका आदिवासी महिलेकडे एक चिठ्ठी भाई कोतवाल यांनी बोरगाव येथील पाटील नावाच्या व्यक्तीना देण्यासाठी पाठवली.

मात्र, ही चिठ्ठी ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी फौजफाटा घेऊन सिद्धगड गाठले व आझाद दस्त्याच्या सदस्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म मिळाले.

या गोळीबारात भास्कर तांबट देखील जखमी झाले होते. त्यांना त्यानंतर चार दिवसांनी वीर मरण आले. भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन्ही हुतात्म्यांचा बलिदानदिनी प्रामुख्याने कर्जत आणि मुरबाड या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.