स्मृतिचित्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे. ते मराठीतील दर्जेदार आत्मचरित्रांपैकी एक मानले जाते. हे आत्मचरित्र इ.स. १९३४ ते इ.स. १९३७ दरम्यान चार भागांमध्ये प्रथम प्रकाशित झाले. इ. जोसेफीन इन्क्स्टर यांनी त्याचे आय फॉलो आफ्टर (इंग्लिश: I follow after - मी (त्यांच्या) मागे जाते) या नावाने इंग्रजीत भाषांतर केले आहे.

लक्ष्मीबाई टिळक या मराठी लेखिका आहेत. स्मृतिचित्रे हे त्यांचे आत्मचरित्र आहे.केवळ स्त्रियांच्याच नव्हे तर एकूण मराठी साहित्यात या आत्मचरित्राचे मोलाचे स्थान आहे. परंपरागत रीतिरीवाजात वाढलेल्या लक्ष्मीबाई यांचं लग्न त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. घरातील रूढी, परंपरा, चालीरीतींचा पगडा लक्ष्मीबाईंवर बालपणापासूनच होता, त्यामुळे त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. लग्न झाल्यावर नारायण टिळकांनी त्यांना जमेल त्या वेळेत स्वतः शिक्षण दिले. स्मृतिचित्रे या त्यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात त्यांनी या त्यांच्यावर झालेल्या ख्रिश्चन प्रभावाचे वर्णन केले आहे. नारायणराव टिळक हे सदसद्विवेकी बुद्धिवादी आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा प्रभाव लक्ष्मीबाई टिळक यांच्यावर लवकरच पडला. स्मृतिचित्रे या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. त्यांचे पती रेव्ह. ना.वा. टिळक व त्या स्वतः ख्रिस्ती कशा झाल्या याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात, जातिव्यवस्था, धार्मिक द्वेश, विचार-स्वातंत्र्यावर असलेली बंधने यांचे वर्णन आले आहे.