सोनटक्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनटक्का

सोनटक्का हे पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अतिनाजूक पाकळ्या आणि मन प्रसन्न करणारा सुवास असणारे फूल आहे. हे फूल साधारणपणे संध्याकाळच्या वेळी फुलते.

ही वनस्पती भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित प्रकारची असून साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज आढळते. ही घराच्या आसपासही लावतात. ही हळद, आले यांच्या कुळातील बहुवर्षांयु वनस्पती आहे.

या झुडपाची उंची साधारण अर्धा ते दीड मीटरपर्यंत असू शकते. पावसाळा आणि हिवाळ्यात याला फुले येतात. फुले सुगंधी, लांब देठाची आणि त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. पाकळ्या इतक्या पातळ आणि नाजूक की हात लावायलादेखील भीती वाटावी. रंग तर इतका शुभ्र पांढरा की आपला हात लागला तर त्या मळतील की काय, असेच वाटावे. उमललेल्या फुलाचा आकार साधारणपणे फुलपाखरासारखा दिसतो, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये याला Butterfly Ginger Lily असे म्हणतात. तीन पाकळ्या ज्या ठिकाणी एकवटतात त्या ठिकाणी म्हणजे फुलाच्या मध्यभागी थोडी पिवळसर झाक असते. परागकणांनी भरलेली पिवळीधमक पिशवी अगदी शोभून दिसते. फुले संध्याकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजून जातात.

श्रमाने किंवा नाराज झाल्याने लगेच कोमेजून जाणाऱ्या स्त्रीला सोनटक्क्याच्या फुलाची उपमा देतात.

फुलांपासून सुगंधी द्रव्ये तयार केली जातात. तसेच पुष्पौषधीमध्ये देखील या फुलांचा वापर केला जातो. अगरबत्ती, साबण आणि सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी या फुलांचा सुगंधी द्रव्यांत वापर होतो. फुले उमलली की जास्त हाताळल्यास खराब होतात म्हणून याच्या कळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या संध्याकाळी उमलतात.

इतर नावे[संपादन]

  • शास्त्रीय नाव : हेडिचियम काॅरोनेरियम (Hedychium coronarium)
  • इंग्रजी : बटरफ्लाय जिंजर लिली

चित्रदालन[संपादन]