सेंट टॉमस अक्काव्नस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे मध्ययुगातील श्रेष्ठ धर्मशास्त्रज्ञ व तत्त्वचिंतक होते. ह्याचा जन्म इटलीतील नेपल्सजवळ रॉक्कासेक्का येथे झाला. शिक्षण प्रथम माँटी कासीनो येथील बेनेडिक्ट परंपरेतील मठात व नंतर नेपल्स व पॅरिस विद्यापीठांत तसेच जर्मनीतील कोलोन येथे झाले. पॅरिस येथे पोपच्या ‘ राजसभे ’ला जोडलेल्या विद्यापीठांत आणि नेपल्स विद्यापीठांत त्याने धर्मशास्त्र व तत्त्व‍ज्ञान शिकविले. १२७४ मध्ये पोपच्या आमंत्रणानुसार लिआँ येथे जात असताना वाटेत फोसानोव्हा (इटली) येथे त्याचे निधन झाले.

टॉमस अक्वाय्‌नसची ग्रंथरचना विपुल आहे. बायबलची विवरणे, ॲरिस्टॉटल आणि पूर्वकालीन स्कोलॅस्टिक लेखक यांच्या ग्रंथावरील भाष्ये इ. लिखाणाशिवाय अनेक वादग्रस्त तात्त्विक प्रश्नांवर त्याने बरेच स्फुट लिखाणही केले आहे. पण त्याचे सर्वांत प्रसिद्ध व महत्त्वाचे लेखन म्हणजे सर्व ख्रिस्ती सिद्धांतांची व त्यांच्यापासून निष्पन्न होणाऱ्या तात्त्विक सत्यांची सुसूत्रपणे व्यवस्था लावण्यासाठी त्याने लिहिलेली ग्रंथमाला.हिच्यातील सुमा थिऑलॉजिया आणि सुमा काँत्र जेन्तिल ह्या दोन ग्रंथात सेंट टॉमसने आपल्या परिपक्व प्रतिभेने घडवून आणलेला वैचारिक समन्वय आढळून येतो.

टॉमस अक्वाय्‌नसच्या कार्याकडे स्कोलॅस्टिक तत्त्व‍ज्ञानाच्या विशाल प्रवाहाच्या संदर्भात पाहिले पाहिजे.प्राचीन ग्रीक तत्त्व‍ज्ञान आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांचा समन्वय साधणे आणि त्याचे सुव्यवस्थित विवरण करणे, हे ह्या तत्त्व‍ज्ञानाचे उद्दिष्ट होते. हे वैचारिक कार्य सेंट टॉमसने समर्थपणे तडीला नेले.ख्रिस्ती धर्माचे अधिष्ठान असलेले सत्य हे ईश्वराने अनुग्रह करून प्रकट केलेले, केवळ मानवी बुद्धिपलीकडे असलेले असे सत्य आहे. उलट तत्त्व‍ज्ञानात, उदा., ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानात, मानवी बुद्धीला केवळ स्वतःच्या बळावर जे सत्य गवसू शकते, तेवढेच मांडलेले असते. परंतु ह्या दोन प्रकारच्या सत्यांत विरोध संभवत नाही कारण परमेश्वर ह्या दोन्ही सत्यांचा उगम आहे ईश्वराने प्रकट केलेले सत्य केवळ बुद्धीला ज्ञात होणाऱ्या सत्याचा छेद करीत नाही, तर त्याला परिपूर्णता देते, या तात्त्विक भूमिकेवरू

न सेंट टॉमसने हा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

टॉमस अक्वाय्‌नसच्या मताप्रमाणे मन हे स्वभावतः बहिर्मुख असते व म्हणून प्रत्यक्षानुभवात ‘ बाह्य ’ सद्‌वस्तूंचे, त्यांच्या अस्तित्वाचे व स्वरूपाचे, ज्ञान होते. हा अनुभव पुढील सर्व बौद्धिक व्यापारांचा पाया असल्यामुळे त्यांच्याकडून तो पुसला जाऊ शकत नाही किंवा अंधुकही होत नाही. प्रत्यक्षानुभवात प्रतीत होणाऱ्या ह्या सद्‌वस्तूंना अस्तित्व असते.  त्या प्रत्येकीच्या ठिकाणी एक सत्त्व‍ असते व त्यामुळे ती वस्तू अमुक एका प्रकारची वस्तू असते (उदा., एक माणूस, सोन्याचा एक तुकडा इ.). शिवाय तिच्या अंगी काही आगंतुक गुणही असतात. तसेच ह्या वस्तू बदलतात. कधी कधी हा बदल इतका मूलभूत असतो, की एका प्रकारच्या वस्तूचे दुसऱ्या प्रकारच्या वस्तूत रूपांतर होते ह्या बदलाचा उलगडा करण्यासाठी असे मानावे लागते, की वस्तूच्या ठिकाणचे सत्त्व‍ एका द्रव्याशयात नांदत असते व एका सत्त्वा‍ची जागा दुसरे सत्त्व‍ घेऊ शकते. हा द्रव्याशय म्हणजे निर्गुण असे मूलद्रव्य होय.

सेंट टॉमसच्या सुमा थिऑलॉजिया (ईश्वरविद्यासार) या ग्रंथात ख्रिस्ती धर्माचा गाभा असलेल्या, ईश्वराने प्रकट केलेल्या, ज्ञानातील अनेक सिद्धांतांची तार्किक व्यवस्था लावण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीलाच ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे पाच युक्तिवाद किंवा पाच ‘ मार्ग ’ देण्यात आले आहेत. चल, सावयव, अपूर्ण, आपतिक अशा दृश्य वस्तूंचे अखेरीस अचल, निरवयव, पूर्ण आणि अवश्यंभावी असे कारण असले पाहिजे निसर्गात व्यवस्था असल्यामुळे हे कारण म्हणजे व्यवस्था घालून देणारा कर्ता असला पाहिजे, हा या पाच मार्गांचा सारांश आहे. हे कारण आणि कर्ता म्हणजे ज्याला

सेंट टॉमसच्या ह्या पाच मार्गांवर प्लेटो, ॲरिस्टॉटल, इब्न सीना (ॲव्हिसेना) ह्या तत्त्व‍वेत्यांचा बराच प्रभाव पडलेला आहे. आत्मज्ञान आणि प्रेम हे ईश्वराचे गुण. ईश्वर सृष्टीचा निर्माता आहे.आपण ईश्वर म्हणतो तो. म्हणजे कोणत्या तरी उपादानद्रव्यावर संस्कार करून त्याने सृष्टी घडविली नाही, तर सबंधच्या सबंध सृष्टी त्याने स्वतंत्रपणे शून्यातून निर्माण केली. ईश्वर सृष्टीचा कर्ता आहे त्याप्रमाणे भूतमात्रांचा भर्ताही आहे. सर्वांविषयी त्याच्या ठिकाणी प्रेम व करुणा आहे.

माणूस इतर वस्तूंप्रमाणेच मूलद्रव्य आणि त्यात वसत असलेले सत्त्व‍ मिळून बनलेला आहे. माणसाचे हे सत्त्व‍ म्हणजे आत्मा. मानवी आत्म्याच्या ठिकाणी वसत असलेल्या कित्येक शक्तींवरून —उदा., संकल्पस्वातंत्र्य, सामान्य तत्त्वां‍चे आकलन करणे, स्वतःला ज्ञान आहे ह्याचे ज्ञान असणे इ. —आत्मा अतिभौतिक आहे हे निष्पन्न होते. अतिभौतिक असल्यामुळे तो निरवयव असतो व निरवयव असल्यामुळे विघटनाने त्याचा नाश संभवत नाही. ईश्वर त्याचा निर्माता असल्यामुळे ईश्वर त्याचा नाशही करू शकेल पण अतिभौतिक व म्हणून ज्याचे स्वरूप विघटनाच्या पलीकडचे आहे असा आत्मा जर ईश्वराने नष्ट केला, तर अशा स्वरूपाचा आत्मा निर्माण करण्यातील त्याच्या मूळ संकल्पालाच बाध येईल. म्हणून आत्मा अमर आहे.

ज्ञानेंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या प्रतिमांपासून माणूस बुद्धीच्या साहाय्याने अमूर्त व सामान्य संकल्पना बनवितो. ह्या सामान्य संकल्पनांचा वापर करून वस्तूंच्या स्वरूपाविषयी निर्णय घेणे (उदा., हा खांब आहे. ) हेही बुद्धीचे कार्य. दृश्य वस्तूमध्ये तिच्या स्वरूपाशिवाय जे अस्तित्व किंवा सत्ता असते, तिचे ज्ञान मानवी बुद्धीला होऊ शकत असल्यामुळे दृश्य वस्तूंपलीकडे जाणारी तत्त्वमीमांसा मानवी बुद्धी निर्मू शकते. उलट विविध प्रकारच्या इंद्रियगोचर वस्तूंच्या स्वरूपाचे ज्ञान मिळविणे, हे विवक्षित विज्ञानांचे कार्य आहे.

माणसाची संकल्पशक्ती स्वतंत्र आहे व म्हणून आपण कसे वागावे हे माणूस ठरवू शकतो. माणसाचा आयुष्यक्रम जसे वागले असता सुखाचा होईल, तसे वागणे म्हणजे नैतिक वर्तन, अशी ॲरिस्टॉटलची शिकवण होती. ख्रिस्ती शिकवणीला अनुसरून सेंट टॉमसने माणसाचे परमोच्च श्रेय म्हणजे सुख नसून मरणोत्तर प्राप्त होणारे ईश्वराचे आनंदमय साक्षात दर्शन होय, ही भूमिका स्वीकारली. हे परमकल्याण केवळ ईश्वराच्या अनुग्रहाने प्राप्त होते पण म्हणून नीती अनावश्यक ठरत नाही. कारण नैतिक वर्तन ईश्वरी अनुग्रहाची आवश्यक बैठक आहे. नैतिक वर्तन म्हणजे मानवी प्रकृतीला अनुसरून, मानवी गरजा लक्षात घेऊन केलेले वर्तन. नैतिक वर्तनामुळे मानवी प्रकृतीच्या साफल्यात सामावलेले सौख्य माणसाला मिळते आणि शिवाय ईश्वरी अनुग्रहाचा मार्गही मोकळा होतो. सेंट टॉमसच्या नीतिशास्त्रात ऐहिक सौख्यावर आधारलेल्या ‍ॲरिस्टॉटल-प्रणीत नीतिशास्त्राचा आणि पारलौकिक श्रेयावर आधारलेल्या ख्रिस्ती नीतिशास्त्राचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. सेंट टॉमसच्या म्हणण्याप्रमाणे ह्या दोहोत विरोध असण्याचे कारण नाही. कारण ज्या ऐहिक प्रकृतीच्या परिपूर्तीत माणसाचे सौख्य वसते, ती प्रकृतीही ईश्वराने निर्माण केलेली आहे.

समाजाचा घटक म्हणून जगणे हाही ईश्वरनिर्मित मानवी प्रकृतीचा भाग आहे. तेव्हा समाज म्हणून एकत्र जगणे, ही माणसांची नैसर्गिक स्थिती आहे. समाजाचे नियंत्रण करण्यासाठी राज्यसंस्था असते व तिला स्वतःचे असे कार्यक्षेत्र असते. पण व्यक्तींच्या ऐहिक व पारलौकिक कल्याणाला विघातक असे तिच्याकडून काही घडता कामा नये आणि ह्या कल्याणाला पोषक असे तिचे कार्य असले पाहिजे.