सुमती मोरारजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमती मोरारजी (इ.स. १९०३ - जून २९, इ.स. १९९८) या भारतीय उद्योजिका होत्या. त्या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या अध्यक्षा होत्या.

जीवन[संपादन]

सुमती मोरारजी यांचा जन्म इ.स. १९०३ साली झाला. सिंधिया स्टीम नेव्हीगेशन या जहाजवाहतूक कंपनीचे मालक नरोत्तम मोरारजी यांच्या पुत्राशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी म्हणजे इ.स. १९२३ साली त्या कंपनीच्या व्यवस्थापन विभागात रूजू झाल्या. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील सत्याग्रही स्वातंत्र्यचळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. उद्योगातून बाहेर पडून त्या इ.स. १९४२ ते इ.स. १९४६ सालांच्या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी झाल्या. त्या काळात त्यांनी भूमिगत होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीला हातभार लावला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या परत कंपनीत रूजू झाल्या. श्रीमती सुमती यांनी इ.स. १९७९ ते इ.स. १९८७ सालापर्यंत कंपनीचे अध्यक्षपद भूषविले. सिंधीया स्टीम नेव्हीगेशन कंपनीच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे इ.स. १९८८ साली सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली. पण त्यांनंतरही इ.स. १९९२ सालापर्यंत मोरारजी अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.

जागतिक जहाज मालकांच्या संघटनेच्या पहिल्या महिला प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला. इ.स. १९७० साली लंडन येथील 'वर्ल्ड शिपिंग फेडरेशन' संघटनेच्या उपाध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील सिंधी निर्वासितांना जलमार्गे भारतात आणण्याचे कार्यात त्यांनी पुढाकार घेतला.

जलवाहतुकीतील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने त्यांना इ.स. १९७१ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

मोरारजी यांचे मुंबईत वयाच्या ९१व्या वर्षी, जून २९, इ.स. १९९८ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.