सावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावा (सावे, हळवी, वरी हिं. शाबन, कुंगू गु. शामो, गाद्रो क. शामे, साबे सं. श्यामाक इं. लिटल मिलेट लॅ. पॅनिकम सुमात्रेन्स, पॅ.मिलिएर कुल-ग्रॅमिनी). फुलझाडांपैकी लागवडीत असलेले हे एक हलक्या प्रतीचे भरड धान्य आहे. ह्याच्या पॅनिकम प्रजातीत सु. ५०० जाती असून त्यांपैकी सु. २३ जाती भारतात आढळतात. गिनी गवत, वरी, गिरनी इ. याच प्रजातीतील असून चारा किंवा हलक्या प्रतीची धान्ये यांकरिता उल्लेखनीय आहेत. कण्व ऋषींच्या आश्रमात हरणांना सावे खाऊ घालीत असल्याचा उल्लेख कालिदासाच्या अभिज्ञान शांकुतलम् नाटकात आला आहे. यावरून साव्याची माहिती सु. दोन हजार वर्षांपूर्वीपासून भारतात आहे. सावा हिमालयात मध्यम उंचीवर जंगली अवस्थेत आढळत असून म्यानमार, आग्नेय आशिया आणि मलेशिया येथेही त्या अवस्थेत तो आढळतो. पॅनिकम सायलोपोडियम (हिं. चिरेकुट्टी) या सर्वत्र आढळणाऱ्या चराऊ गवतापासून साव्याची उत्क्रांती झाली असावी असे मानतात. बिहार, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र येथील लागवडीत साव्याचे अनेक प्रकार नमूद केले गेले आहेत. भारतात सर्वत्र त्याचे उत्पादन आढळते.

वनस्पतिवर्णन[संपादन]

सावा हे वर्षायू, झुपकेदार गवत असून त्याची बारीक पेरेदार खोडे [ संधिक्षोडे ⟶ खोड], ३०–९० सेंमी. उंच असतात व त्यांवर फुलोऱ्यापर्यंत पाने असतात. ती साधी, अरुंद व बरीच लांब (सु. ६० × २५ सेंमी.) असतात. परिमंजऱ्या[ शाखायुक्त मंजऱ्या ⟶ पुष्पबंध] आयताकृती, १५–४० सेंमी. लांब व शाखायुक्त असतात. कणिशके ३-४·५ मिमी. लांब, गुळगुळीत व सपाट असून सस्यफळे (शुष्क व एकबीजी फळे) गुळगुळीत, रेषायुक्त व तपकिरी रंगाची असतात. कणिशे, कणिशके, वनस्पती इत्यादींची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनेलीझ (ग्लुमिफ्लोरी) गणात व ⇨ ग्रॅमिनी (तृण) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

लागवड व संवर्धन[संपादन]

इतर धान्यांच्या दृष्टीने नापीक ठरलेल्या निकस जमिनीवर साव्याचे पीक घेतात. मात्र याला पुरेसा पाऊस आवश्यक असतो. ही जमीन २-३ वेळा नांगरून व कुळवून पावसाळ्यात (जुलै ते ऑक्टोबरात) दर हेक्टरी १२ किग्रॅ. बी फोकून पेरणी करतात. रोपे तयार करून नंतर ती लावली, तर ७२% धान्योत्पादन अधिक होते, असे प्रयोगान्ती आढळून आले आहे. ९ किग्रॅ. अमोनियम सल्फेट आणि ९ किग्रॅ. सुपरफॉस्फेट खत देऊन सऱ्यांत लागवड केल्यास प्रतिसाद चांगला मिळतो. हे पीक शुद्घ किंवा मिश्र स्वरूपात घेता येते. कुंबू, वरी, रागी, हरभरा किंवा तीळ, एरंडी व मोहरी अशा पिकांबरोबर याचे मिश्रपीक चांगले येते. साव्याचे पीक २·५–५ महिन्यांत तयार होते हेक्टरी २२५–५६० किग्रॅ. धान्योत्पादन होते. विशेष अनुकूल परिस्थितीत तेच उत्पादन ९०० किग्रॅ. पर्यंत होते फक्त गवत-पाचोळा ८००–१,००० किग्रॅ. होतो. पी. एम्. २ ही सुधारलेली जाती तमिळनाडूत लागवडीत आहे.

उपयोग[संपादन]

जलद वाढणाऱ्या चाऱ्याची वनस्पती म्हणून साव्याला मोठे महत्त्व आहे. सिंचन उपलब्ध असताना १३८ दिवसांत दोनदा केलेल्या कापणीने त्याचे उत्पादन सु. २१,३०० किग्रॅ. (चारा) होते तसेच ५५ दिवसांत ५,९०० किग्रॅ. हिरवी वैरण उपलब्ध झाल्याची नोंद आहे. हा चारा नरम व बारीक असून तो गुरे आवडीने खातात. मात्र भात व नाचणी यांच्याशी तुलना केल्यास हा चारा कमी प्रतीचा ठरतो.

धान्याच्या सु. २०% भुसकट असते साव्याचे दाणे पांढरे, करडे किंवा तपकिरी असून त्यांना चव नसते. भाताप्रमाणे ते शिजवून खातात. तमिळनाडूत उकड्या तांदळाप्रमाणे त्यावर प्रक्रिया करतात. साव्याचे पीठ करून त्याची मिठाई किंवा रोटी करतात. रुग्णास साव्याचा भात देण्याची पद्घत जुनी आहे. साव्याचा पेंढा राबासाठी वापरतात.

रासायनिक संघटन[संपादन]

साव्याचे रासायनिक पृथक्करण केले असता त्यात पुढील घटक आढळतात : (१) फोलकटासह (टरफलासह): प्रतिशत प्रमाणात पाणी ११·०, प्रथिने ७·२, मेद ४·९, कार्बोहायड्रेटे ६३·८, तंतू ९·६, खनिजे ३·५. यांशिवाय (मिग्रॅ./१००ग्रॅ.मध्ये) कॅल्शियम २४·०, फॉस्फरस ३२०·०, लोह ७·०, थायामीन ०·३४. (२) टरफले काढलेले धान्य : प्रतिशत प्रमाणात पाणी ११·०, प्रथिने ७·१, मेद २·१, कार्बोहायड्रेटे ७७·४, तंतू ०·७, खनिज द्रव्ये १·७. यांशिवाय (मिग्रॅ./१००ग्रॅ.मध्ये)कॅल्शियम १९·०, फॉस्फरस १५९·०, लोह २·६, थायामीन ०·३० कॅरोटीन आणि आयोडीन यांचे लेशमात्र अंश (३८ म्यूग्रॅ./किग्रॅ.) स्टार्चचे प्रमाण ३२·१ टक्के, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन ६७·९ टक्के असते.

संदर्भ[संपादन]

साधा