साबीर शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साबीर शेख (जन्म : नारायणगाव (पुणे जिल्हा), १५ मार्च, १९४५; - कल्याण (ठाणे जिल्हा), १५ ऑक्टोबर, २०१४) हे ठाणे शहरातील शिवसेनेचे एक नेते आणि माजी कामगार मंत्री होते. साबीर शेख यांचे वडील खाटिक आणि त्याचवेळी प्रवचनकार होते. साबीरभाईंचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरी करू लागले, आणि तेथेच कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेत आले. शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह खेडोपाडी नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

ते अंबरनाथ मतदारसंघातून निवडून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत गेले. तेथे ते इ.स. १९९१ ते २००४ असे १५ वर्षे आमदार होते. शिवसेनेच्या राजवटीत ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री झाले.

साबीरभाई एक उत्तम पहिलवान होते. हिंदू धर्म, संत वाङ्‌मय, साहित्य आणि शिवपुराणाचा त्यांनी अभ्यास केला होता. त्या जोरावर ते एक उत्तम वक्ता झाले होते. शिवसेनेची तोफ म्हणून ते ओळखले जात. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना शिवभक्त ही उपाधी दिली होती.