सातताल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोठा तांबट- सातताल
सातताल येथे पक्ष्यांची छायाचित्रे काढणारे छायाचित्रकार
तलाव

सातताल हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. सातताल म्हणजे सात तलाव. येथे सात तलाव आहेत, त्यावरून गावाचे नाव सातताल असे पडले.

भौगोलिक वैशिष्ट्ये[संपादन]

सातताल म्हणजे सात तलाव. येथे पन्ना किंवा गरुण ताल, पूर्ण ताल,नल-दमयंती ताल, सीताताल, रामताल,लक्ष्मणताल आणि सुखाताल असे सात तलाव आहेत, त्यावरून गावाचे नाव सातताल असे पडले. सातताल नैनिताल पासून २४ किमी अंतरावर आहे. साततालला पोचण्यासाठी भीमतालहून मार्ग आहे. भीमतालहून सातताल ४ किमी अंतरावर आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात येथे चहाचे मळे होते.हे गाव ओक आणि देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलात वसलेले आहे. येथील तलाव भारतातील सर्वांत कमी प्रदूषित गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे.येथील तलाव स्थलांतरीत पक्ष्यांसाठी नंदनवन आहेत.

हवामान[संपादन]

सातताल येथे उन्हाळ्यात सुखद हवा असते. उन्हाळ्यात तापमान १५ ते ३० अंश सेल्शियस असते.हिवाळ्यात तापमान गोठणबिंदूइतके कमी होऊ शकते.येथे भेट देण्यास सर्वांत चांगले महिने आहेत- मार्च-जून आणि सप्टेंबर-डिसेंबर.जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस पडतो.नोव्हेंबर ते मार्च महिन्यात हिवाळा असतो. तेव्हा तापमान १२ ते २४ अंश सेल्शियस असते.हिवाळ्यात येथे गिर्यारोहकांची गर्दी असते.

जैव विविधता[संपादन]

येथील जैवविविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांच्या ५०० प्रजाती आढळतात. त्यामुळे हे पक्षीनिरीक्षक तसेच छायाचित्रकार यांच्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.तसेच येथे सस्तन प्राण्यांच्या २० प्रजाती आणि फुलपाखरांच्या ५२५ प्रजाती आढळतात.

पक्ष्यांच्या प्रजाती[संपादन]

येथे लाल चोचीचा निळा मगपाय, निळ्या गळ्याचा तसेच तपकिरी डोक्याचा तांबट, सोनेरी गळ्याचा तांबट अशा तांबट पक्ष्याच्या वेगवेगळ्या प्रजाती, खंड्या, राखी डोक्याचा पोपट, तुइया पोपट,मत्स्य गरूड,सूर्यपक्ष्याच्या विविध प्रजाती इ. अनेक प्रकारचे पक्षी आढळतात.

फुलपाखरांचे वस्तुसंग्रहालय[संपादन]

येथे फ्रेडरिक स्मेटासेक यांनी स्थापन केलेले फुलपाखरांचे वस्तुसंग्रहालय आहे. त्यात फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या २५०० प्रजाती आणि इतर कीटकांच्या १००० प्रजातींचे नमुने आहेत.