Jump to content

सयाजीराव धनवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सयाजीराव धनवडे (जन्म : कोल्हापूर, ५ जानेवारी १९२८; - कोल्हापूर, ५ जानेवारी १९५८) हे एक रणजी सामन्यांत खेळलेले मराठी क्रिकेट खेळाडू होते. सयाजीरावांचे वडील दत्ताजीराव राजाराम महाराजांच्या काळात ’दरबार सर्जन‘ होते. ते कोल्हापूर संस्थानचे "सिव्हिल सर्जन‘ही होते. इ.स.१९५५मध्ये त्यांचे निधन झाले.

सयाजीराव धनवडे यांनी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र, होळकर, मध्य भारत व राजस्थान या संघांचे प्रतिनिधित्व केल होतेे. ते उत्तम लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. लँकेशायर लीगमध्ये ते ॲक्रिंग्टन व केंडाल क्‍लबकडून खेळले. याशिवाय त्यांना पंतप्रधान इलेव्हन संघातून ईडन गार्डन्सवर खेळण्याचा बहुमानही मिळाला होता. ते राष्ट्रकुल संघाविरुद्धही खेळले.

सयाजीरावांच्या काळात सुभाष गुप्ते अव्वल लेगस्पिनर होते. चंदू बोर्डेही होते, त्यामुळे सयाजीरावांना फार संधी मिळू शकली नाही.

सयाजीराव कोल्हापुरात खासबाग मैदानावरील "केएसए‘च्या (कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन) खेळपट्टीवर सराव करीत होते. त्यांना मानेपाशी चेंडू लागला. थोड्या वेळाने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. सयाजीरावांची वाचा गेली होती. डॉ. भद्रे यांच्याकडून उपचार घेऊन ते घरी आले, पण त्यांना अधूनमधून चक्कर यायची. दोन आठवडे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. अखेर पाच जानेवारीला, तिसाव्या वाढदिवसालाच ते वारले.

सयाजीराव धनवडे यांची प्रथम वर्गीय क्रिकेटमधील कारकीर्द (१८४८ ते १९५७)[संपादन]

 • सामने ३१, धावा ७४९, सर्वोच्च ८२, विकेट १०८.
 • महाराष्ट्राकडून कानपूरच्या मोदी स्टेडियमवर युनायटेड प्रॉव्हिन्सेसविरुद्ध ४० धावांत सहा व १८ धावांत सात गडी बाद अशी कामगिरी.
 • रतलामच्या रेल्वे मैदानावर होळकर संघाकडून राजपुतानाविरुद्ध ५० धावांत सात विकेट अशी सर्वोत्तम कामगिरी.
 • राष्ट्रकुल संघाविरुद्ध पश्‍चिम विभागीय संघात निवड. पुण्यातील सामन्यात विजय हजारे, सदू शिंदे, मधु रेगे, अशा मान्यवरांसह सहभाग. पहिल्या डावात तीन, दुसऱ्या डावात दोन विकेट.
 • लंडन येथील ईडन गार्डन्सवरील राष्ट्रकुल संघाविरुद्धच्या सामन्यासाठी पंतप्रधान संघात निवड. १९५५, ५६, व ५७ अशी तीन वर्षे इंग्लंडमधील लँकेशायर लीगमध्ये सहभाग. गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी.


क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून जखमी/मृत झालेले अन्य खेळाडू[संपादन]

 • फिलिप ह्यूज : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स दरम्यान सुरू असलेल्या मॅचमध्ये सीन एबटचा बाऊन्सर डोक्यावर लागल्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ रोजी याचा मृत्यू झाला.
 • रमण लांबा : १९९८मध्ये भारताचा क्रिकेट खेळाडू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी झाला. उपचारादरम्यान मृत्यू.
 • १९५८-५९मध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू
 • १९६१-६२मध्ये भारताच्या नरी काँट्रॅक्टर यांना वेस्ट इंडीजच्या ग्रिपिथने टाकलेला चेंडू डोक्‍याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने काँट्रॅक्टर यांचा जीव वाचला. एक डोळा कायमचा गेला, पण पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत.
 • २०१२मध्ये सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती.
 • २०१२मध्ये झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूचा एका स्थानिक सामन्यात, जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागल्याने खेळट्टीवरच मृत्यू झाला.
 • २०१३मध्ये प्रीमियर लीगमधील सामन्यात पूलचा फटका मारताना चेंडू दक्षिण आफ्रिकेच्या डॅरिन रँडलचा डोक्यावर आदळला. तो जागीच कोसळला. रुग्णालयात नेल्यावर मृत्यू.
 • इ.स. १९९३ साली एका स्थानिक सामन्यात हूकचा फटका मारताना, चेंडू इंग्लंडच्या इयान फोले या खेळाडूच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला बसला. रुग्णालयात नेल्यावर इयानला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला.
 • जॉर्ज समर्स हा १९७० साली लॉर्ड्‌स मैदानावर एम्‌सीसीच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्याने जागीच कोसळला. काही दिवसांनी रुग्णालयात मृत्यू.
 • अल्क्विन जेनकिन्स हे स्वानसी येथील लीग सामन्यात पंच म्हणून काम करीत असताना २००९ साली एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू डोक्याला लागून जखमी झाले रुग्णालयात निधन.
 • २० एप्रिल, २०१५. अंकित केसरी हा एबी सीनियर नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये भवानीपूर क्लबविरुद्ध मॅच खेळताना १७ एप्रिल २०१५ रोजी मैदानावर झेल पकडण्याच्या नादात आपल्याच संघाचा खेळाडू सौरव मंडल याला धडकला. कलकत्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तीन दिवसांनी मृत्यू पावला. २८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेला अंकित केसरी बंगालचा अंडर-१९ ईस्ट झोन, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ११ आणि बंगाल अंडर २३ टीमकडून क्रिकेट खेळला होता. केवळ २० वर्षीय बॅटसमन अंकित एकूण ४७ मॅचेस खेळला होत्या.