सदस्य चर्चा:B Ashutosh patil

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत प्रल्हाद महाराज बडवे समाधी, पंढरपूर. ||

आधीच माणसांनी अन् जनावरांनीही भरलेल्या घरात धांदल उडाली होती. गेले कित्तेक दिवस आवर्जुन बाजूला काढून ठेवलेले सामान सुमान, कपडे लत्ते, याचे गठडे करून बांधाबांध संपत आली होती. बांधलेले गठडे गाड्यांवर चढवले जात होते. आलेल्या पै पाहुण्यांनी घर गच्च भरले होते. गेल्या ४ दिवसापासून पंढरीकडे येणाऱ्या साऱ्या वाटांनी येवून पाहुण्यांनी घरात गर्दि केली होती. त्यातली काही जणही आपली गाठोडी गाड्यावर पाठवत होते. कुठे काय ठेवायचे याच्या हरकाम्यांना सुचना होत होत्या. ते ही सगळ्या सुचनांचे मुंडी खाली घालून पालन करत होते.

अंथरूण, पांघरूण, नित्याचे कपडे, जागोजाग मुक्काम पडल्यावर लागणारे सामान, स्वयंपाकासाठीची गरजेप्रमाणे आवश्यक तेवढी भांडी कुंडी, अगदी सगळी नसली तरी गरजे इतकी, हर एक वस्तु, पिठं कुटं, लोणचे, मुरांबे, मसाले आदि शिधा सामुग्री, सारं काही भरून तयार होतं. प्रवासात आवश्यक असणारे धनही चंचीत बांधुन तयार होतं. नित्यपुजा, पाठाची, पोथी, देवपूजेची अन् संध्येची उपकरणे भरून संदुक तयार होती. ती ही गाडीवर चढविण्यात आली. प्रवासाच्या बैलगाड्या ठरविण्यात आल्या होत्या. सोबत जाणते वाटाडे घेतले होते. प्रवासात लागणार म्हणून सारी आपत्कालातील औषधं आजीबाईच्या बटव्यात काढून ठेवली होती. चोराचिलटाच्या भयाचा विचार करून लढावू तरूणांची एक टोळींच बरोबर घेतली होती. त्यांचे सोबत तलवार, भाले, बरच्या होत्या. काठीतली गुप्ती होतीच. तरी कमरेला असले पाहिजेच म्हणून एक धारदार जंबिया तिथेच काढून ठेवला होता. एक एक करता करता. सारे गठडे संदुका गाडीवर चढले. आता केवळ महाराजांचे झाले की निघायचे होतं

निमित्त होते महाराजांच्या काशी यात्रेला जाण्याचे. त्यांचेबरोबर गेल्याने आपलीही काशी यात्रा होईल म्हणून जवळचे आणि लांबचे पाहुण्यासह अनेक परिचित हि निघाले होते. पाहुण्यांनी ही आपली गाठोडी बैलगाड्यात टाकली होती. घरात गर्दि उडाली होती. सोडायला आलेल्यांचीही तेवढीच गर्दि होती. मला इच्छा असूनही शरिर प्रकृतीमुळे येता येत नाही, पण आमचे वतीने काशीविश्वेश्वराला हे सोन्याचे, चांदीचे बेलपान वहा, हि दक्षणा ठेवा, प्रवासात हे करा, हे करू नका, देवाला हे वाहा, क्षेत्रावर हा विधी करा आदि सुचनांचे पालुपद चालू होते. पण एका अर्थाने सगळे निश्चिंत होते कारण महाराजांबरोबर त्यांची काशीयात्रा निघाली होती.

आता महाराजांची सकाळची संध्या, काकड्याचे देवदर्शन, देवपूजा, ज्ञानेश्वरी गाथा वाचन आदी आन्हिक आटोपले. प्रवासात त्रास होवू नये असे हलके, पचनास सुलभ, तेही थोडी अन्न खाल्ले. कमरेचे सोवळे सोडून त्यांनी धोतर नेसले. अंगरखा परिधान केला. डोक्यावर रूमाल बांधायला घेतला. घरातल्यांनी नमस्कार केले. कोणास ठावूक आता कधी येणे होतेय. किती दिवस लागताहेत. देव जाणे.

महाराजांनी विचारले "सगळे झाले का? सामान गाडीवर चढले का?" "होय." एेकताच सगळ्यांना गाडीकडे चलण्याच्या सुचना दिल्या गेल्या. अन् महाराज देवाचे दर्शनाला मंदिराकडे निघाले. सोबत एकजण होताच. डोईला बांधायचा रूमाल हाती ठेवून जड अंत:करणाने महाराजांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर अन् घरात अंतरच नव्हते. केवळ पायऱ्या उतरायच्या. पायऱ्या उतरून एक एक मंडप पार करत महाराज गाभाऱ्यापर्यंत आले. भरल्या हृदयाने देवाचे पायावर मस्तक ठेवले. बोलले "देवा येतो आम्ही. आता दर्शन, भेटी फिरून परत आल्यावर. तुमच्या कृपेने जगलो वाचलो तर पुन्हा पंढरीत दर्शन भेटी होईल. आता येतो. यात्रेला आशीर्वाद द्या . तुम्हीच सांभाळा. सारे तुमचे हाती. येतो."

कितीतरी वेळ त्यांचे मस्तक देवाचे पायावरच होतं. एकदम खांद्यावर हात पडला आणि आवाज आला. "उठ!" हाताने खांदा पकडला, उठवले. महाराजांनी वर पाहिले तर देवानेच खांदा धरलेला. त्यांनी देवाकडे पाहिले देवाचा हात धरला, देव म्हणाला, "कुठे चाललास?" "ते ही इतके दिवस? आणि मला सोडून? का बरे?" काय बोलणार. सर्वज्ञ देवाला काय सांगावे. तरी ही महाराज बोलले, "जन्माला आल्यावर चारोधाम करावे. सप्तपुऱ्या दर्शनाव्या. द्वादश ज्योतिंर्लिंगांचे अभिषेक करावेत. काशी यात्रा करावी. तिथे पितृतर्पण करावे. गयावर्जन करावे. गंगा स्नान करावे. पुण्यक्षेत्र आहे ते. तिथे देवतार्चन करावे. कारण तशी धर्माज्ञा आहे. म्हणून निघालोय काशीला." "शिवाय मागेही तुम्हीच नामदेवरायांना माऊलींसोबत तिर्थाटन करायला सांगितले होते. तसे मी ही चाललो तिर्थाटनाला." देवाचे तोंडून हास्य आले. म्हणाले "चल!" हातीचा हात धरून समोरच्या रंगशिळेपाशी दोघेही आले. देवाने हाताने रंगशिळा उचलली. बोलिले "पहा." "अरे लेकरा मला सोडून कुठे चाललास. हे पहा" अन् महाराज केवळ पहातच राहिले. देवाचे पायतळी साऱ्या विश्वाचा देखावा होता. सारे विश्वरूप दर्शनच होते ते. केवळ अद्भुत. विलक्षण. अगम्य. अलौकिक. महाराजांनी विचारले "देवा हे काय?" देव म्हणाला "जिथे तू जावू इच्छितोय ती काशी! अयोध्या! मथुरा! माया! कांची! जगन्नाथपुरी गया! प्रयाग! पुष्कर अन् तिथला विश्वकर्मा ब्रह्मा! द्वादश ज्योतिर्लिंगे! शंकर भगवान तर माझे ठाई वास करतात. मम मस्तकी त्यानां मी धारण केले आहे. त्यासह सारे इथेच पहा." "हे सगळे इथेच असताना तू कशाला मला सोडून जातोस! " "सारी तिर्थे तर माझे हातीचे पांचजन्यातूनच प्रवाहीत होतात. नित्य माझे दर्शनाने त्यांची पापमुक्ती होते म्हणून सुवर्णापात्रातून माझी आरती करायला ते पंढरीत येतात." जणू देव सांगत होते "तीर्थांचे जे मूळ व्रताचे जे फळ | ब्रह्म ते केवळ पंढरिये||" "अरे सारी तिर्थे आणि व्रते, क्षेत्रे अन् देवही माझ्यापासून आहेत. पंच महाभूते माझे डावे हातीचे पांचजन्यातून निर्माण होतात माझे आज्ञेचे पालन करतात. आणि तू मलाच इथे सोडून काशीला तिर्थयात्रा करायला, अन् तीर्थाटनाला काय चाललास?"

महाराजांना काय पाहावे काय नको. कळेना. मन गोंधळून गेले. दोन्ही डोळ्यांतून घळघळा गंगा यमुना वाहू लागल्या काहि दिसेना. दिसत होता केवळ विठोबा. आणि त्याच्या पायातळीची तिर्थे. क्षेत्रे. दैवते. समजत उमजत होता केवळ विठोबा.

महाराज उठले म्हणाले "जे आम्ही देखिले आपुल्या नयनी| फिटती पारणी डोळीयांची|" वारंवार पायावर मस्तक ठेवले. किती वार माहित नाही. प्रत्येक तीर्थासाठी एक वेळा. त्या तिर्थस्नानासाठी एकवार. अनेक वार. प्रत्येक तिर्थासाठी अनेकवेळा. वारंवार. अन् या अद्भूततेसाठी वारंवार. भगवंताचे तीर्थरूप दर्शनासाठी एकवार. वारंवार. भगवंताचे सर्वक्षेत्ररूप दर्शनासाठी एक वार. वारंवार. पांडुरंगरायाचे विश्वरूप दर्शनासाठी वारंवार. वारंवार.

कृष्णावतारी गोकुळात बाल कृष्णाने आपल्या मातेला मुखात विश्वरूप दाखविले. तसंच आज पंढरीत भक्ताला देवाने विश्वरूप दाखविले. सकल तीर्थांचे दर्शन, स्नान घडविले. क्षेत्रांचे दर्शन. दैवतांचे दर्शन घडविले. सुस्नात केले. सकल देवांचे दर्शन घडविले. ते ही अगदी पायाजवळ. तेव्हा विश्वरूप दाखविले, आजही विश्वरूप. तेव्हा मुखात दाखविले, आज पायाजवळ. तेव्हा मायला दाखविले. आज माय होवून दाखविले. तेव्हा लेकरू होवून दाखविले आज लेकराला दाखविले. तेव्हा माताप्रेमापोटी दाखविले, आज भक्त प्रेमापोटी दाखविले. तेव्हा निमित्त माती खाण्याचे आज निमित्त काशीयात्रेचे.

महाराजांचे आसवांच्या धारा दोन्ही नेत्रातून घळघळा वाहू लागल्या. मी पतित. मी अपराधी. मी पापी. म्हणून हे परमपावन पाय सोडून चाललो. माझे चुकले. आता चुक सुधारतो.

महाराज उठले सोबतच्याला सांगितले, "गाड्या माघारी बोलवा." आता कोठे जाणे नाही. कारण सकळ तीर्थे तर इथेच भगवद्पायतळी आहेत. मग तिर्थासी जावून काय म्या करावे| वाऊगे हिंडावे पंथे तेणे||" आता मीच काय पण माझ्या पुढच्या पिढ्याही पंढरी सोडून अन्य तिर्थी जाणार नाहीत. आपले तिर्थ विठ्ठल. क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल. देवपूजा.

देवाने प्रकटून सकल तिर्थदर्शन घडवावे अशी विभुती म्हणजे संत श्री प्रल्हाद महाराज बडवे. आमचे कुळाचे भुषण. आमचे मुळपुरूष. त्यामुळे आमचे कुळी तिर्थाटन नाही. ते आज पावेतो.

हि इतकी विलक्षण भक्तीप्राप्त विभुती श्रावण शु||५ चे दिनी १६ व्या शतकी पंढरीत जन्मली. मागचे जन्मीचा भक्त प्रल्हादच जणू. मागे हिरण्यकश्यपूचे जाचातून आपल्या भक्ताचे देवाने रक्षण केले. याखेपी सुलतानी काचापासून भक्ताने देवाचे रक्षण केले. कारण जसे देव कोणाचे देणे ठेवत नाही. ज्याचे त्याचे माप त्याचे पदरात घालतोच. तसे संतही कोणाच्या ऋणात राहत नाहीत. अगदी देवाच्या ही ऋणात. असे विलक्षण देव भक्ताचे हे नाते. पंढरीने ते पाहिले. अनुभवले.

देवाला यांचे शिवाय चैन नाही आणि यांना देवाशिवाय. त्यामुळे देव नित्य रात्रौ प्रल्हाद महाराजांचे घरी येत. मनसोक्त वार्तालाप करीत. सारीपाट खेळत. पुन्हा काकड्याला स्थानी जात. दिवसभर महाराजांना विरह होई म्हणून देवाने आपल्या चरणपादुकाच त्यांना दिल्या.

महाराजांचे भागवत श्रवणाला परमात्मा येवून बसे. इतकी गोडी दोघांत. देव भक्ताचे नातं खरंच काही न्यारं असतं. अशा महात्म्याने वय परत्वे संन्यास घेतला. पुढे जिवितकार्य संपल्याची जाण होताच माघ व|| ११ चे दिनी वयाचे ९८ व्या वर्षी शके १६४० मधे भगवंता समोर मंदिरातच भागवत सांगून समाप्तीला पोथीला नमस्कार करून पोथीवरच देह सोडला. आज तिथे स्मारक वृंदावन आहे. जे आपण सभामंडपात पाहू शकतो.

महाराजांचे और्देहिक चंद्रभागा काठी करण्यात आले. त्यांचे तिर्थ संनिधत्व देह सपर्पणानंतरही अबाधित ठेवले. पंढरी क्षेत्र सहवास देहोतक्रमणानंतरही अबाधित ठेवला. धर्मशास्त्राप्रमाणे संन्याशाला दहन संस्कार नाही त्याचा भुगर्भसंस्कार वा देह गंगार्पण करतात. त्याप्रमाणे पुंडलिका समोर, लोहदंडाचे दक्षिणेला महाराजांचे देहाचे संस्कार करण्यात आले. ज्यातून दोन्ही गोष्टी साधल्या भुगर्भसंस्कार आणि गंगार्पणही. तिथे आज दगडी बैठा चौरस कट्टा असून त्याला परिक्रमेचा मार्गही आहे. वर्षाला पुण्यतिथीदिनी दिंडीने जावून तिथे पूजन केले जाते. नित्य पुजेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रल्हाद महाराजांची श्रेष्ठता ज्ञात असल्याने धर्मसिंधुकार बाबा पाध्येही येथे नित्य समाधी दर्शन करीत. वासकर फडाचे अधिपती वै. हभप अप्पासाहेब वासकरही नित्य परिक्रमेत आवर्जुन महाराजांचे समाधीचे दर्शन करीत त्यांना तर "तू मला विसरलास?" असा प्रल्हाद महाराजांचा दृष्टांत झाल्याने त्यांनी महाराजांचे वाड्यात जावून त्यांचे वंशजांना घरी बोलावून त्याचे पूजनही केले होते. शिवाय श्रावणातील वासकर वाड्यातील उत्सवाचे काल्याची समाप्ती प्रल्हाद महाराजांचे वंशजाकडूनच करण्याचा प्रघात त्यामुळेच अप्पासाहेबांनी सुरू केला. आजही उत्सवाची समाप्ती केली जाते ती महाराजांचे वंशीचे कडून घ्यारे घ्यारे दहिभात| आम्हा देतो पंढरीनाथ| प्रमाणे बडव्यांकडून वासकरांनी काला स्विकारूनच.

नदितीरावरील त्यांचे समाधीचे आजही अनेकजण दर्शन घेतात. ते अलौकिक स्थान. पंढरीत असुन अनेकांना प्रल्हाद महाराजच माहित नाहीत. तर त्यांची समाधी कशी माहित असेल. अनेकांना महाराज माहित आहेत पण समाधी माहित नाही. त्यांचे साठी लेखनप्रपंच. हे वैष्णवपद प्राप्त करणारे भक्तस्थान सर्वांना ज्ञात व्हावे. लोकांनी त्याचे दर्शन करावे. अनुभुती घ्यावी. त्यातून प्रेरणा घ्यावी. शक्ती प्राप्त करावी. पंढरीचे महात्म्य सत्यतेने जाणावे. त्याप्रमाणे वर्तावे. तरच हे स्थान रक्षिल्यासारखे आहे. तेच खरे पुण्यप्रद आहे. तेच उत्कट आहे. ©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.

पंढरपुरातील सरदार वाडे[संपादन]

सरदारांचे वाडे, पंढरपूर.

श्रीविठ्ठल आणि पंढरपूर म्हणजे समस्त भक्तांचे माहेर. सकल तिर्थाचे सार. त्यामुळे अनादी कालापासून विद्वान आणि राजसत्ताधारी यांनी पंढरीत वास केला. देवाला दाने दिली. पूजा अर्चा केली. ज्यात शिलाहार, होयसळ, चालुक्य, यादव राजांपासून पेशवाई पर्यंत सर्वांनी देवतार्चन केल्याच्या नोंदी सापडतात. अगदी शहाजीराज्यांनी जिजाऊसाहेबांसह विठोबाला पूजा केल्याचे इतिहास अभ्यासक आदरणीय वै. निनादराव बेडेकर यांनी आमचे भेटीत एकदा सांगितले होते. त्याबाबतचा पुरावाही ते देतो म्हणाले होते. पण त्याआधीच दुर्दैव आडवे आले. आणि एका महत्वाच्या दाखल्याला आपण मुकलो. मात्र कर्नाटकातून शहाजीराजे पुत्रभेटीसाठी ये देशी आले. धर्मशास्त्राप्रमाणे अनेक दिवसांनी, वर्षांनी आप्तांची भेट होत असल्यास ती भेट देवद्वारी, क्षेत्री करावी असे रूढ असल्याने जेजूरीला पितापुत्राची भेट झाली. त्यापूर्वी शहाजीराजे पंढरीक्षेत्री येवून देवतार्चन करून गेलेच्या नोंदी आहेत. शिवाय मंदिरात देवास अर्पण आलेला घोड्याचे, वाहनाचे मालकी बाबतचा वादचा शहाजीराजांनी केलेला निर्णयही एेतिहासिक नोंदीत आपणास पहायवा मिळतो.

शिवकाळात पंढरपूराचे उल्लेख आहेत पण ते म्हणावे एवढे नसून तुरळक आहेत. ते तुरळक असले तरी इतिहास दृष्ट्या मोलाचे आहेत. सन १६५९ मधे अफजलखानाने पंढरीत येवून थैमान घातले होते. मात्र त्याला देव मिळाला नाही. पुढे मिर्झाराजांच्या सोबत केलेल्या तहाप्रमाणे स्वत: शिवाजी महाराज सन १६६५ मधे पुरंदर, फलटण, भाळवणी, मंगळवेढा मार्गे विजापूरावर चालून गेले. ते पंढरपूराजवळून गेले. मात्र पंढरीत आले कि नाही याबाबत कागदपत्रात नोंद सापडत नाही तोवर इतिहास मुका आहे. पुढे तर औरंगशहाने पंढरपूर जवळच्या माचणूर गावी सुमारे ६ वर्षे तळ देवून हिंदुस्थानचा राज्यशकट येथून हाकला. त्याकाळी पंढरीवर हल्लेही केले. याकाळी यवनभयाचे विचारांने विठ्ठलमूर्ती प्रल्हाद महाराज बडवे यांनी नदीपलिकडे देगांवचे पाटीलाकडे १६९५ ते १६९९ पर्यंत सुरक्षित ठेवली. मराठी लष्करही या धामधुमीत पंढरपूरजवळून जाई त्यावेळी येथील देव, आणि ब्राह्मण यांना त्रास देवू नये म्हणून छत्रपती राजाराम महाराजांची सन १६९४ मधे आज्ञा होती. छत्रपती राजारामांनी जिंजीचे मुक्कामामुळे नविन पद योजून ज्यांची पहिली नियुक्ती केली ते पंतप्रतिनिधी प्रल्हाद निराजींनी जे शिवरायांपासून स्वराज्याचे सेवेत होते, त्यांनी सन १६९७ मधे पंढरपूरात नदिला पुंडलिक मंदिराजवळ जीव दिला.

केवल मुसलमानी अमलात सुलतानांकडूनच पंढरीवर धाड पडली असे नाही तर मराठा सरदारांनीही पंढरीची लूटालूट केली आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव तळहाती घेवून शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या सेनापती धनाजी जाधवाच्या नातवाने, रामचंद्र जाधवाने निजामासाठी सन १७६२ क्षेत्रास कहर मांला. मोगलाई मांडली. हिंदूधर्म सोडून यवनांचा धर्म प्रारंभ मांडला. त्याशिवाय देवपरायण अहिल्यादेवींचे वारस यशवंतराव होळकरांचे सरदार फत्तेसिंग माने यानेही सन १८०२ मधे नवरात्रात पंढरपूरावर धाड टाकल्याची नोंद सापडते. आसपासचा मुलुख लुटला. पंढरीत मात्र त्याने पाय टाकला नाही. अशीही नोंद पंढरपूर बाबत सापडते.

शंभुछत्रपतींचा पुत्र २ रा शिवाजी तथा शाहु महाराज सातारा यांचे अभयपत्राने देवाची रानावनातली वणवण थांबली आणि देव सिंहासनी कायमचे विराजमान झाले. कारण पराक्रमी मराठ्यांनी दिल्लीवर आपला धाक बसविला. या धामधुमीत थोरले बाजीराव, त्यांचे पुत्र नानासाहेब, माधवराव पेशवे यांचे मुक्काम अनेकवार पंढरीत पडले होते. दुसरा बाजीराव तर विविध वेळी मिळून सुमारे २७० दिवस पंढरीत राहिला आहे. त्याने सन १८०९ साली पालखीतून आलेल्या माऊलींसोबत वाखरी ते पंढरी अशी आषाढ शु|| १० ला पायी वारीही केली आहे. माऊलींसोबत पायी वारी करणारा हा पहिला पंतप्रधान. सोबत अर्थातच ढमढेरे, आवटी, विंचूरकर, पुरंदरे, बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे, शेलूकर आदि सरदार होते. त्याची अनेक राजकारणे पंढरीत शिजली. काही पुर्णत्वालाही नेण्यात आली.

१८१२ सनात ब्रिटिशांनी मराठी सत्ता संपविण्यासाठी म्हणून केलेल्या चाली चा परिपाक म्हणून दुबळ्या बाजीरावा बरोबर करार केला तो पंढरीतच. बडोदेकर गायकवाडांचा वकिल गंगाधर शास्त्री बाजीरावाचे भेटीला पंढरीत आला. त्यातच त्याचा मुडदा पडला. राजकारणी इंग्रजांनी आण मात्र डेंगळ्यावर घेतला. पुढे मराठी सत्तेच्या पतनाची अखेरची लढाईही पंढरी जवळचे आष्टीत जाली. ज्यात सेनापती बापू गोखले पडले आणि मराठी सत्ता संपुष्टात आली. अशाप्रकारे पेशवाईच्या काळी पंढरपूर म्हणजे महत्वपूर्ण ठिकाण झाले होते. कारण वर वर्णित अशा अनेक महत्वपूर्ण घडामोडी पंढरपूरात घडत होत्या. अशा अनेक घटना पंढरीने पाहिल्या.

अध्यात्माने रंगलेल्या पंढरीत तीर्थक्षेत्र म्हणून पेशवाईत अनेक सरदार, दरकदार आणि मान्यवरांचे मुक्काम असत. कधी पेशवाच पेशवे सरदारांना पंढरीत भेटीसाठी बोलावे. टाळ पखवाजाच्या आवाजाने गरजणारे पंढरपूर याकाळी तलवारीच्या खणखणाटाने गरजत होते. कीर्तन, प्रवचनाच्या आवाजा एेवजी राजकारणी डावपेचाचे आवाज त्यामुळे इथे घुमत होते. वारकरी बांधवाच्या ऐवजी लढवय्या हत्यारबंद शिपायांच्या गडबजाटाने पंढरपूर वहात होते. वाळवंटात वारकरी खेळीयासोबत हत्तीची साठमारीही होत होती. पहायला पंतप्रधान पेशवे अवतरत होते. मराठ मुलुखाची अध्यात्मिक राजधानी असणारे पंढरपूर जणू राजकारण्यांची राजधानी बनली. दुसरं पुणं झाले होतं. त्यामुळेच सततच्या वास्तव्यासाठीची गरज म्हणून अनेकांनी पंढरीत आपलेसाठी वाडेच बांधले.

खासा पेशवे माधवरावांच्या आज्ञेने बांधलेला सरकार वाडा, तसेच महाद्वार घाटाचे दोन्ही बाजूचे अहिल्याबाईंनी बांधलेला राम मंदिराचा होळकर वाडा, बायजाबाईंनी बांधलेला द्वारकाधिश मंदिराचा शिंदे सरकार वाडा आपण मागे विस्ताराने पाहिला. पण त्याहून अनेकांनी आपले मर्जीनुरूप, जागा अन् गरजेचा विचार करून पंढरीत वाडेही बांधले. बहुधा हे सारे वाडे तेथील हत्ती, घोडे, माणसे याच्या राबत्याचा विचार करता पाणी पाहुन नदीकाठी आहेत. वा नदिचे जवळ आहेत.

पंढरपूरातून गोपाळपूरा कडे जाताना डाव्या बाजूला थोडे गावाबाहेर पडले की सरदार घाडगेंनी वाडा बांधला. त्यात आपली पुजेची देवी म्हणून अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची स्थापना केली. काळच्या उदरात वाडा गेला त्याची अर्धीमुर्धी दगडी तटबंदी प्रमाणेची भिंत अन प्रवेशद्वार शिल्लक आहे. बाकी पडझड झालीय. मात्र देवी स्थान शिल्लक आहे तेही घाडग्यांची देवी या नावे. आजही इथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होतो. नुकतेच या देवी मंदिराचा जिर्णोद्धार मदन विश्वनाथ बडवे अन् त्यांचे बंधूंनी केला आहे.

त्यालगत पंचमुखी मारूती जवळ होळकरांनी श्रीविठ्ठल आणि श्रीरामासाठी लागणार म्हणून तुळशीबागेची निर्मिती केली. ज्यात आज अश्विनिता गॅस कंपनीचे गोडावून आहे. पंढरीत आजचे सरकारकडून पहिल्यांदा नव्हे तर पूर्वीपासून तुळशीबागेची निर्मिती होती. असे हे स्थान. बहुधा ते पाहूनच नवे सरकार पंढरीत तुळशीवन निर्मू पाहतेय.

गोपाळपूर रस्त्यावर जाताना पेशव्यांचे मामा सरदार रास्ते यांचा मोठ्या पटांगणाचा भव्य वाडा होता. आमचे पितामहांचे मामा तळघट्टी रास्तांचे कारभारी होते. ते तिथेच रहात. रास्त्यांनीच थोरली तालिमीसाठी जागा बक्षीसपत्राने दिली. तालमीची उभारणी केली. आज वाड्याचे ठिकाणी खर्डेकर आणि वासाडे महाराज मठ आहे.

चंद्रभागा घाटाजवळ सरकार वाडा. त्याचे उत्तरेला एेन नदी तीरावर चंद्रभागा घाटावरच बडोदेकर गायकवाडांचा दोनमजली वाडा होता. तिथेच आता सारडा भवन उभारले आहे. तेथून उत्तरेकडे येता कासार घाटावर माणकेश्वर सरदारांचा वाडा होता. तोच आता वै. पुज्य गंगुकाका शिरवळकरांचा वाडा आहे.

शेजारीच महाद्वार घाटाचे दक्षिणेला भव्य दोन चौकी शिंदे सरकार यांचा वाडा त्यात द्वारकाधिशाचे मंदिर आहे. घाटाचे दुसरे बाजूला होळकरांचा वाडा आणि राममंदिर. त्याचे उत्तरेला होळरकांचे दिवाण पळशीकरांचा वाडा. बहुधा हाच आता देहुकर महाराजांचे फडाचा वाडा आहे. या दोन्हीचे मधे होळकरांचे रथ पालक्या ठेवणे साठी ची अन् घोड्याची पागा होती तिथे आता महाद्वार पोस्ट अन् गोसावी समाजाची जागा आहे.

पेशव्यांचे खाजगीकडचे कारभारी सरदार खासगीवाले यांचा भव्य टोलेजंग वाडा कुंभारघाट ते दत्त घाट परिसरात होता. या वाड्यात पेशव्यांनी भोजन केले होते. अन् त्या भोजनात खासगीवाल्यांनी ज्वारीच्या कण्याचे भोजन घातले होते. जे पेशव्यांनां नवखे होते म्हणून त्यांनी या पदार्थाची चौकशी हि केली. खाजगीवाल्यांनी आपल्या पांडुरंगाला हाच नैवेद्य असतो सांगितल्याने पेशव्यांनी देवाचे नैवेद्यासाठी कौठाळीच्या जमिनी लावून दिल्याचा मजेशीर दाखला या वाड्याबाबत आहे. पंढरपूर भेटीत तत्कालिन सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरूजी तेथेच निवासाला होते. खासगीवाल्यांनी इथेच आपले देवघर करून त्यातील विठोबाची रथयात्रा सुरू केली. त्याचे खर्चासाठी जमिनीच्या नेमणूकाही केल्या. त्या रथासाठी बडवे, देवधर, नातू, रानडे, कर्वे, जोशी, हरिदास, चातुर्मास्ये आदींच्या देवकामाची आणि मानापानाच्या व्यवस्था केली. त्याशिवाय गावच्या बारा बलुतेदारांनाही रथयात्रेत मान दिले. हि रथयात्रा पारंपारिक पद्धतीने आजही चालू आहे. या खाजगीवाल्यांनीच चातुर्मास्ये महाराजांना संतपूजा भावनेने जागा दिली ज्यात आजही महाराजांचा निवास आणि कीर्तनसेवा चालू आहे.

खासगीवालेंचे या वाड्या समोरच त्यांचाच अजून एक वाडा होता. ज्याला लिमयेचा वाडा म्हणत असत. जो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पंढरीत जळका वाडा नावाने तो ओळखला जाई. आता येथे नपा वाहनतळ आणि मुकबधिर शाळा चालते. त्याला लागून सरदार ताकभातेंचा वाडा आहे. त्या शेजारीच सरदार फडके यांचाही वाड होता. तिथेच हल्ली अमळनेरकर महाराजांचा मठ आहे.

१८१८ ला मराठेशाहीच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत हार झाल्याने सरदार अत्रे आणि सरदेशमुख आपल्या मुळ गावी गेलेच नाहीत ते नाथचौक परिसरात वाडा बांधून राहिले. त्यांनीच काही जागा माउली चरणी अर्पिली. तेथे आता माऊलींचे पादुका मंदिर असून आषाढी वारीला आळंदीहून आलेल्या पालखीचा इथेच मुक्काम असतो. त्यापूर्वी माऊलींचा मुक्काम बडव्यांकडे असायचा. त्याची सारी व्यवस्था बडव्यांचे दिवाणजी नेर्लेकर पहायचे. त्यामुळेच माऊलींची पंडरी मुक्कामी आषाढ त्रयोदशीला पुजा करण्याचा मान बडव्यांचे वतिने आजही नेर्लेकर करतात. अन् आळंदीला प्रस्थानवेळीही नेर्लेकरांचाही मानपान केला जातो. या माऊली मंदिराचे समोरच सरदार शितोळे अंकलीकरांचा वाडा असून तिथे आषाढी यात्रेत सोहळ्याबरोबर आलेल्या अश्वांचा मुक्काम १० पासून १५ पर्यंत असतो. सरकार हि देवदर्शनार्थ अन् काळी पंढरीत आल्यास इथेच मुक्कामी असतात.

सरदार पटवर्धन तर पंढरपूरच्या आंबे गावचे रहिवासी झाले. तिथे त्यांनी गढी बांधली. तरी पंडरपूरता पटवर्धनाचे अनेक वाडे आहेत. त्यांच्या सांगली शाखेने बांधलेला वाडा म्हणजे आजचे आपटे उपलप प्रशाला आणि पद्मसाळी धर्मशाळा होय. तसेच जमखंडीकर पटवर्धनाचा वाडा म्हणजे आजचा लक्ष्मीनारायण भट्टडांचे निवासस्थान आणि महाद्वार शाॅपिंग सेंटर होय. आपल्या उपाध्याला वाडे देणारे दाते आपण पाहतो मात्र पटवर्धनाचे उपाध्ये असणाऱ्या बडवे यांनी ही जागा आपल्या यजमानाला दिल्याची वैशिष्ट्यपूर्ण एेतिहासिक घटना घडल्याचे अनेक बुजुर्ग या वाड्याबाबत बोलताना सांगतात.

याशिवाय लोकमान्य टिळकांचे जीवनात गाजलेले ताई महाराज प्रकरणातील सरदार पंडितांचाहि पंढरीत वाडा होता. विणे गल्लितील गुळवाडा म्हणजे तो होय. आज इथे भावे महाराज मठ आहे. सरदार महिपतराव कवड्यांची गढी गुरसाळ्यात होती. पश्चिमद्वार ते चौफाळा रस्त्यावर सरदार कवडे यांचा वाडा होता. त्यांनी तो आपले बडवे म्हणून आमचे पूर्वजांना दिला होता. जो आमचे आजोबांचे आजारपणात निरूपायांने आम्हास विकावा लागला. त्याचे आता ३ विभाग होवून १ रस्त्यात गेला १ मधे गवळी अलंकार राहतात. तर एकात बडवे आहेत.

याशिवाय स्वराज्याचे निष्ठावान, गंगाघर शास्त्री प्रकरणाचे मेरूमणी म्हटले जाणारे त्रिंबकजी डेंगळे, तसेच पेशवाईचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांचेही पंढरीत वाडे होते असे म्हणतात. त्याशिवाय अजून कुणा कुणाचे वाडे पंढरीत होते ते आज आपल्याला फारसे ज्ञात नाही. उद्याच्या अभ्यासात ते ही अज्ञात वाडे समोर यावेत. ज्यामुळे पंढरीचे जुने वैभव पुनश्च पंढरपूरकरांना अनुभवता येईल. © आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर