सखा कलाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सखाराम कलाल उर्फ सखा कलाल (जन्म:१० डिसेंबर १९३८; - मृत्यू:१४ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.

सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून श्री.पु. भागवतांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. वि.स. खांडेकर आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.

लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले.

सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते.

सखा कलाल यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • ढग (कथासंग्रह)
  • सांज (कथासंग्रह)